श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मैत्रीण… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… आत्त्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेली आशा दिड तास उलटला तरी आली नव्हती. काळोख पसरू लागला होता आणि वासंतीताईना टॉयलेटला जायचं होत.. त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं.. परत परत त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे होत… आशा येईल आणि आपल्याला टॉयलेटला नेईल म्हणूंन त्या गेटकडे पहात होत्या.. मोठा निश्वास सोडत होत्या… त्यांची ही परिस्थिती पाहून त्यान्च्याच वयाची एक स्त्री पुढे आली..
‘तुम्हाला काही हवं आहे काय?
त्या स्त्रीचा त्यांना एकदम आधार वाटला..
‘होय हो.. मला आधाराशिवाय चालता येत नाही.. माझी मदतनीस आशा..’पाच मिनिटात येते.. म्हणून गेली ती आलेलीच नाही.. मला टॉयलेटला जायचंय हो.. नाहीतर गडबड होईल..
‘चला.. मी तुम्हाला नेते..
ती स्त्री पटकन पुढे आली आणि तिने वासंतीताईचा हात पकडला आणि त्यांना ती हळूहळू टॉयलेटकडे घेऊन गेली.
दोघी टॉयलेटमधून बाहेर आल्यावर वासंतीताई म्हणाल्या..
‘सहा महिन्यापूर्वी मला प्यारालिसिसचा अटॅक आला आणि डावी बाजू लंगडी झाली.. त्यातून मी आता सावरतेय.. एक बाई ठेवली मी.. माझ्यासाठी… मला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते ना.. मुलगा सून माझ्या घरातच राहतात.. पण ती दोघे नोकरी करतात.. सुनेचे हिडीस फिडीस चालू असतेच..पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली.. हल्ली थोडी थोडी फिरते मी.. संध्याकाळी त्या बाई बरोबर या पार्क मध्ये थोडा वेळ येते.. जरा बदल होतो..
‘पण गेली कुठे बाई तुमची?
‘हल्ली ती अशीच करते.. मला इथे सोडते आणि जरा जाऊन येते असे सांगून नाहीशी होते.. तिचे खूप नखरे पाहिले मी.. आता तिला हाकलूनच लावणार?
‘कुठे राहता तुम्ही?
‘त्या अश्वमेघ सोसायटीत.. दोनशे एक नंबरमध्ये..
‘माझा पण बंगला त्याच भागात आहे.. चला मी सोडते तुम्हाला..
त्या स्त्रीने वासंतीबाईचा हात पकडला आणि हळूहळू त्याना पार्कबाहेर आणले.
‘तुमचे नाव?
‘मी सुधा.. सुधा नाईक.. बँकेत नोकरी करायची मी. माझे मिस्टर प्रोफेसर होते पुण्यात. मला एकच मुलगी.. डॉक्टर आहे ती. जावई वकील आहेत.. दोघे माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर प्रॅक्टिस करते.जावई इथल्या कोर्टात. चला माझ्याघरी..तुम्हाला आमचे घर दाखवते.
सुधाताई वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरी घेऊन आल्या.
येताना वासंतीबाईंना आशा दिसलीच.. एका झाडामागे एका पुरुषाला खेटून थट्टामस्करी जोरात सुरु होती.. वासंतीबाईचा जळफळाट झाला… तिला हाकलून लावायचेच असे त्यानी ठरविले.
सुधाताईंनी वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरात आणले… बंगल्यात आत जाता जाता उजव्या बाजूला त्यान्च्या मुलीचे.. प्रज्ञाचा दवाखाना दिसत होता.. तिचे पेशंट बाकावर बसले होते..
‘या.. ताई.बसा..
त्या घरात गेल्या बरोबर का कोण जाणे पण वासंतीताईना समाधान आणि शांती वाटली.
वासंतीताई कोचवर बसताच सुधाताई किचनमध्ये गेल्या आणि दोन सरबताचे ग्लास घेऊन आल्या..
‘घ्या.. बाहेरून आल्यावर तहान लागते ना, म्हणून प्रज्ञा सरबत तयार ठेवते.
वासंतीताईंना कौतुक वाटले… नाहीतर आपल्या घरी सकाळी गारढोण झालेला चहा.. संध्याकाळी आशाच्या मनात असेल तर चहा.. नाहीतर दोन बटर..
एवढ्यात डॉ. प्रज्ञा घरात आली.. आई सोबत अजून तिच्याच वयाची बाई पाहून ती म्हणाली..
‘मी केबिन मधून पाहिले, आई तुझ्यासोबत कोण ग या बाई?
‘ ही माझी मैत्रिण ग.. वासंती..
वासंतीबाईंनी चमकून पाहिले… जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली..’ही माझी मैत्रिण..
वासंतीताईच्या डोळ्यात पाणी आले.. नवरा गेल्यावर हल्ली बरेच दिवसात कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोलले नाही.. आणि ही सुधा पटकन बोलून गेली.. ही माझी मैत्रिण..
वासंतीताई इतक्या भावुक झाल्या हे पाहून सुधा त्यान्च्या जवळ आली..
‘, माझे काही चुकलं काय वासंती?
‘नाही ग सुधा.. अस प्रेमाने माझ्याशी कोण बोलत नाही ग.. सगळे हिडीसफिडीस..
‘तूझ्या घरी मुलगा आणि सून आहेत ना?
‘आहेत.. पण आहेत म्हणायचे.. दोघेही नोकरी करतात.. पण मुलाचा पगार कमी, त्यामानाने सुनेचा जास्त.. म्हणून सून जातायेत सुनावत असते मला आणि नवऱ्याला.माझा मुलगा पण तिच्याच हाताने पाणी पिणारा.. आई पेक्षा सासूवर प्रेम करणारा.. जोपर्यत मी खमकी होते.. तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते.. पण मला अटॅक आला आणि मी परावलंबी झाले, पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होते, माझी भाची आली धावून सांगलीहून.. आपल्या छोटया मुलाला सासूकडे ठेवून.. उपकार झाले त्या वसूचे.. वसुमती.. तिनेच केले माझे. पंधरा दिवस रात्र आणि दिवस राहिली माझ्यासोबत. हॉस्पिटलचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते ग.. नवऱ्याची पेन्शन मिळते मला.. पण मायेचे कुणी हवे का नको? त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळतं नाही म्हणून सांगितले.. मुलगा कपिल दोन दिवस येत होता.. पण वसु आली म्हंटल्यावर तो पण येईनासा झाला.
‘मग हॉस्पिटलमधून तू घरीच गेलीस ना?
‘हो.. शेवटी माझे घर ना ते..बिल्डिंगमध्ये कामाला बाई येते.. तिच्या ओळखीने ही आशा मिळाली.
जवळजवळ सहा महिने आहे सोबत.. घटस्फोटीत आहे.. सुरुवातीला बरी होती पण सुजाताच्या नादाला लागून आता बिघडली.. गेले आठ दिवस मला पार्कमध्ये सोडते आणि नाहीशी होते…. आता आपण येताना दिसली ती.. कुणा पुरुषाला चिकटून बसली होती.. असले धंदे हिचे?
‘पण हा आशा गेली तर.. पुन्हा तुला प्रॉब्लेम नाही होणार?
‘मी मुलाला सांगते.. कुणीतरी दुसरी बाई बघ, नाहीतर तूझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग..बघू आईसाठी काय करतो ते..
‘बर.. वासंती.. तुझा मोबाईल दे.. त्यात माझा नंबर सेव्ह करते.. काहीही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर.. मी धावत येईन किंवा प्रज्ञाला पाठवीन..चल तुला आता तुझ्या घरी सोडते..
सुधाबाईंनी आपला फोन वासंतीबाईच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्यांनी हाताने त्यांना उचलले आणि हळूहळू त्यांच्या घरी पोचवले. त्यांच्या घरी लॅचने घर उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्याना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या.
आशा पार्कमध्ये गेली.. तेव्हा वासंतीताई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली.. किल्लीने दार उघडले तर बाई बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या.. त्या कडाडल्या..
‘कुठे फिरत होतीस?
‘, कुठ न्हाई..
‘मग पार्कच्या बाहेर कुणाला चिकटून उभी होतीस?
‘माजा भाव व्हता..
‘मग भावाला काय चिकटून बसायचं? मी बघितलं तुला… चालती हो.. किल्ली ठेव आणि परत मला तोंड दाखवू नकोस..
‘मला सुजाताबाय ने काम दिलाया… तेसनी बोलली तर मी जाईन.. आशाने त्याना जेवण दिले नाही आणि ती निघून गेली.
.
वासंतीबाईंना आशाचा भयंकर राग आला होता.. आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते..’मला सुजाताताईंनी काम दिलय.. बेशरम.. मला पार्कमध्ये सोडून याराला चिकटते? पुन्हा तोंड पहाणार नाही हीच’.. मनातल्या मनात वासंतीबाई बडबडत होत्या.
लॅचने दार उघडले आणि त्त्यांची सून सुजाता आत आली.. चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली..
‘तुम्ही आशाला उद्यापासून कामावर येऊ नको अस सांगितलंत? मग कोण करणार तुमच? मी घरी राहू शकत नाही.. माझ्या पगारावर हे घर चाललंय.. तुमच्या मुलाचा पगार तो किती?
‘अग पण ती मला पार्कमध्ये एकटं सोडून तिच्या यारा बरोबर चाळे करत होती..
‘मग काय झाल? ती घटस्फोटित आहे माहिती आहे ना? तिला पण काही भावना असतील… मुंबई सारख्या शहरात बाई मिळतं नाही.. तुमचे काही चालू देणार नाही मी.. आशा उदया पण येईल… तिच्यामुळे मला घरकामात मदत होते.. भांडी कपडे होतात..
‘तू थोडे दिवस रजा घे.. तुझ्या आईच्या आजारपणात घेतलीस तशी..
‘माझ्या आईच्या आजारपणात रजा संपली माझी.. आता नाही मिळायची.. उद्या आशा येईल.. तिच्याचकडून काय ती सेवा करून घ्या.
वासंतीबाईचा नाईलाज झाला.. थोडयावेळाने त्यांचा मुलगा कपिल आला आणि गार झालेले जेवण टेबलावर ठेऊन गेला.. त्या मुलाशी काही बोलू पहात होत्या.. पण त्यांचे न ऐकता तो बाहेर गेला.
दहा वाजता सून आली.. त्यांना एकदा बाथरूमला नेऊन आणलं आणि ती झोपायला गेली.
सकाळ झाली.. वासंतीताई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पहात राहिल्या.. आठ वाजता सून आली आणि त्याना बाथरूमला घेऊन गेली. ती गेली ती गेलीच.. त्या चहा नाश्त्याची वाट पहात राहिल्या. थोडया वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला.. त्यांनी ओळखले.. दोघे नोकरीवर गेले. आता आपण..
साडेनऊला आशाने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्याना भूक लागली होती.. तहान लागली होती… त्या हाक मारत राहिल्या.. आशा.. आशा.
पण आशा बाहेर ढिम्म होती. मोबाईल वर गाणी ऐकत होती.
बारा वाजले.. आज वासंतीताईची आंघोळ राहिली. तहान लागली पण पाणी मिळतं नव्हते.. भूक लागली होती. त्यांना बाथरूमला जायचे होते.. घाई लागली होती.
त्या हाक मारत राहील्या..’आशा.. आशा ग.. मला बाथरूमला ने ग.. नाहीतर..
एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




