श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “वाचाल तर वाचाल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
वाचाल तर वाचाल, हे कुठेतरी माझ्या वाचण्यात आलं. पण त्याचा खरा अर्थ मला नंतर समजला. वाचाल तर वाचाल यात काय वाचायचं, ते बरोबर वाचलं आहे का, याचबरोबर जे वाचलं, त्याचा अर्थ काय, आणि ते वाचलेलं नक्की कुठे, कधी, आणि कसं वापरायचं हे समजून घेतलं पाहिजे. उगाचच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करून चालत नाही.
काय झालं, सुंदर अक्षर हा एक दागिना आहे, असं माझ्या वाचण्यात आलं. मी लगेच एका कागदावर एक चांगलं वाक्य लिहीलं. आणि कागद बायकोला म्हणालो बघ तुझ्यासाठी एक दागिना.
कागदाकडे बघत बायकोने एक तुच्छ कटाक्ष टाकला. तसेही आता लग्नाला बरीच वर्ष झाल्याने अशाच कटाक्षाची सवय झाली आहे. हल्ली पूर्वीसारखा… म्हणजे ‘ ‘तसा ‘… कटाक्ष टाकणे कटाक्षाने टाळलं जातं. तेव्हा जाणवणारे कटाक्ष असायचे. आता जाणीव करून देणारे कटाक्ष असतात.
काय लिहीलं आहे इतकं त्या कागदावर… काही अर्थ लागतोय का? … वाचणं आणि वाचलेलं बरोबर लिहीणं यात फरक आहे… एकतर तुम्ही धांदरटपणे वाचलंय, किंवा लिहितांना वाचलेलं दिसत नाही… काय म्हणते मी… काही फरक पडतोय का… या वाक्यात तीने मी काय वाचलंय, आणि काय लिहिलं आहे, यासह माझ्यात पडलेले फरक एका वाक्यात स्पष्ट केले.
शाळेत असतांना परीक्षेत थोडक्यात फरक स्पष्ट करा… असा एक प्रश्न असायचा. आज तोच प्रश्न आम्हाला दोघांनाही विचारला असता तर आम्ही आमच्याच बद्दल थोडक्यात पण विस्तृत स्वरुपात फरक जाणवेल इतके फरक सांगीतले असते.
काय लिहीलं आहे ते जाऊ दे… अक्षर बघ… सुंदर अक्षर हा एक दागिना आहे असं वाचलेलं आठवलं आणि म्हणूनच हा अक्षराचा दागिना खास तुझ्यासाठी… माझा केविलवाणा प्रयत्न…
हा… दागिना… काय करावं… अक्षर तेही सुंदर आणि तुमचं… काही संबंध आहे एकमेकांशी. तुुम्ही चार गोष्टी लिहीलेला कागद दुकानदाराला दिला तर तो कागद हातात धरतो, आणि शेेजारच्या मेडिकल स्टोअर मधल्या माणसाकडून वाचून घेतो. नाहीतर परत देत तुमच्याच कडून वाचून घेतो. तो मेडीकल स्टोअरवाला… त्याला सगळ्यांची अक्षरं समजतात. पण एकदातर तुमचाही कागद त्याने समजत नाही म्हणून परत केला होता… वर नवीनच औषध दिसतयं असा मिश्किल शेराही मारला…
शाळेत चुकीचं ऊत्तर लिहिल्यामुळे शिक्षकांनी काही जणांना गुण दिले नसतील. कारण लिहिलेलं चुकीचं आहे हे त्यांना समजलं असेल. पण तुमचं लिहीणं न समजल्याने व काहितरी बरोबर असेल असा (गैर) समज झाल्याने थोडेतरी गुण पडले असतील. यात माझ्या अक्षराचे सगळे दोष झाकून गुण तेवढे उघडे पडल्याचं लक्षात आलं.
आता मी एक वाक्य सांगते. नवरा हा सुध्दा एक दागिना असतो. आणि दागिना मिरवला जातो. आहे तुमच्यात काही तुम्हाला मिरवण्यासारखं… गणपतीच्या मिरवणूकीत सुध्दा तुम्हाला बोलवत नाही… काय तुमच्या अक्षराचा कागद मिरवायचा.
एकतर तुम्ही कागदावर लिहीलेलं वाक्य ग्रामीण भाषेतलं आहे. आणि चुकीच्या पध्दतीने लिहून तुम्ही त्याचा अर्थच बदलला आहे. काही अर्थ आहे का याला. मग मी तिच्या बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला.
वाक्य होतं “आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना” आणि मी लिहीलं होतं, “आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना” आता काय… सगळच बिघडलं होतं… पण वाचाल तर वाचाल याचा अर्थ समजला… आणि लिहीण्याचा सुध्दा.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



