सौ राधिका भांडारकर
☆ हिरवा चाफा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
दिवाळीच्या निमित्ताने खरोखरच कंबरडं मोडेपर्यंत साफसफाई करून झाली. डबे घासले, जाळी जळमटं झाडली, खिडक्या काचेची तावदानं, पंखे दिवे, अगदी सारं काही मायक्रो फायबरचे नवे कोरे फडके पार काळे होईपर्यंत पुसपुस पुसले. सारे काही घास घास घासले. म्हटलं पुरे झालं आता. अंमळ जरा शांत बसुया. फायलींचे कपाट नंतर आवरूया पण मग पुढच्या क्षणी वाटलं एकदा का विश्रांती घ्यायचं ठरवलं तर न जाणो पुन्हा परत उरलेली सफाई होईल की नाही मग राहिलं की राहूनच जातं त्यापेक्षा कामात काम होऊन जातं आणि फायलींचे कपाट नीट लावण्याचा माझा संकल्प जवळजवळ वर्षापूर्वीचाच आहे. यावर्षी तरी हे काम करूच या.
मंडळी! माझं कसं आहे ना मी कुठलेही काम अत्यंत व्यवस्थित आणि मनापासून जीव लावून करते. चाल ढकल मला आवडतच नाही. मी सगळ्या फाइल्स काढल्या. कपाट रिकामं केलं आणि फडकं घेऊन आतल्या सर्व फळ्या पुसायला घेणार इतक्यात एका जुन्या फाईल मधून एक अगदी जीर्ण झालेला कागद सरकून माझ्या जवळच येऊन पडला मी तो उचलला आणि दुसऱ्याच क्षणी एका हवेच्या झोक्याबरोबर माझं मन कसं नकळत हलकेच तरंगू लागलं. कागद जुना असला तरी कागदावरची वळणदार अक्षरं मात्र अजूनही मोगऱ्याच्या फुलांसारखी टवटवीत भासली. त्यावर लिहिली होती एक सुरेख कविता. कुणीतरी वेड्या मनानं माझ्यासाठी त्या काळात लिहिलेली,..
मी आहे असाच आभाळ बावरा पक्षी
ती आहे तशीच सुबक नाजूक नक्षी
मी उगाच उडून उधळतो रंग
ती लडिवाळ लाजरी सावरते अंग
मी मुक्त मोकळा करतो कहर
ती हळूच पंखावर पसरते पदर
मी तिला चिडवायचे शोधत राहतो
बहाणे
ती समंजस हुशारीने चुकवते सारेच निशाणे
मी भेटायला येताना वाजवत नाही
पाऊल
तिला कशी कोण जाणे बरोबर लागते चाहूल
शब्द सहज सुचतात तिच्यावर लिहिता लिहिता
निशिगंधाच्या फुलासारखी उमलून येते कविता
असे काहीसे आहे तिचे माझे मैत्र
माझ्या कोऱ्या कागदावर तिचे रंगचित्र।।
तसं म्हणायला गेलं तर कच्चीच होती ती कविता! अगदीच मुक्त विखुरलेले कसलाच काव्यशास्त्र भाव नसलेले ते शब्द पण तरीही वाचता वाचता माझ्या उमलत्या वयावर वर्षानुवर्षे चढत गेलेली वार्धक्याची धूळच जणू काही झटकली गेली. त्यावेळी झटकले होते या काव्यमय शब्दांना, त्या हळव्या प्रेमालाही, किती बेदरकारपणे, गर्विष्ठपणे, तुच्छपणे या भावनांची घोळक्यात खिल्लीही उडवली होती मग असे असतानाही मी हा कागद इतकी वर्ष का जपून ठेवला? की तो सहज अनाहूतपणे माझ्या आयुष्यात मलाही नकळत सोबत राहिला आणि आज आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर तो पुन्हा त्याच अर्थ भावनेने का बरं त्या शब्दांसकट त्या भावनांसकट फडफडत राहिलाय ? खरं म्हणजे त्या शब्दांच्यामागचा चेहराही आता आठवत नाही पण लपविलेल्या त्या भावनांचा सुगंध मात्र हिरव्या चाफ्यासारखा मनाच्या प्रवाहात असा अवचित दरवळला.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





