श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळे कवी …. वेगवेगळे बाज!… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
गांवाहून घरी परततांना गाडी चुकली. खरं म्हणजे आमचीच वेळ चुकली. गाडी वेळेवरच येऊन गेली होती. शेवटी जवळच्या मार्गाने – पायवाट, रस्ता – असं करत करत घरी दाखल झालो. नाही म्हटलं तरी सात-आठ मैलांचा फटका पडलाच. घरी आल्यावर तांब्याभर पाणी ढोसलं तेव्हा कुठे बरं वाटलं.
– – – बस्. प्रसंग घडला तो एवढाच. वेगवेगळ्या कवींनी तो कसा वर्णिला असता त्याची झलक!!
☆ बाज रघुनाथ पंडितांचा – ☆
(शार्दूलविक्रीडीत)
कालापव्यय व्यर्थ कारणवशात्
होवोनि तत्कारणे
गेलो तैलरथा मुकोनि नशिबी
येई महाचालणे
मार्गी कंटकयुक्त शाख तरुची
तैसी क्षते वीवरे
हाटाया श्रम कंठशोष अवघा पाणी पिणे हे बरे
☆
☆ बाज वामन पंडितांचा – ☆
(दिंडी)
कटिक वेगे देखिली दूर जाता
निबिड कांतारी मार्ग लुप्त होता
मनी केला निर्धार चालण्याचा
समय वाचविण्या त्वरे धावण्याचा
(शिखरिणी)
प्रयत्ने धावावे, पद पळविता
मार्गहि सरे
श्रमतिल बहु कष्टे चरण अणि की
शक्तिहि नुरे
तृषेने कंठासी बहुत पडता
शोषहि जरी
मुखे लावोनीया सुगड अवघे
रिक्तच करी
☆
☆ बाज मोरोपंतांचा – ☆
(आर्या)
समय अलक्षित होता
चुकला वाहनप्रबंध जो केला
श्रम शमण्यासि जलाचा
प्राशन केला संबंध तो पेला
बाज रामदास स्वामींचा
वाहन चुकता रडू नये
बोल नशीबा लावु नये
एक्या जागी थांबु नये
प्रयत्न कधिही सोडु नये
सदा सर्वदा राम डोळा दिसावा
पथाच्या वरी वीवरीही पहावा
खडे आणि कांटेहि त्या राघवाचे
अरे मन्न घ्यावे सदा नाम वाचे
बहू चालता तैल लावे पदासि
बहू शोषता कंठ प्यावे जलासी
श्रमे भागताही करी फक्त तर्क
करी ना उपायासि तो येक मूर्ख
☆
☆ बाज विंदांचा – ☆
हा रस्ता अटळ आहे
खड्ड्याशिवाय, चिखलाशिवाय‘
काट्याशिवाय, श्रमाशिवाय
उखडलेल्या खडीशिवाय
वितळलेल्या डांबराशिवाय
जिवंत प्रेते, मर्तिक जीव
पाहू नको, डोळे शीव
गर्दीमधल्या गाड्या चुकवुन
धडधाकट घरी पोचलास
डोके, हात, पाय शाबुत
राखुन अख्खा शिल्लक ऱ्हायलास
श्रमक्षुधा शमनासाठी
लोटाभर पाणी प्यायल्यास
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
बाज मर्ढेकरांचा
पाय चालुनी फुटक्या दमले
दुखरे रस्ते, माज माजले
चावत बसलो नुसतिच काडी
कधिची सुटून गेली गाडी
शिशिरर्तूने गळले पान
करूनिया निजलो जलपान
☆
☆ बाज मंगेश पाडगांवकरांचा – ☆
(वात्रटिका)
बसगाडी
एखाद्या वात्रट पोरीसारखी
माझ्याकडे बघून हसली
दांत काढून कवटाळिण मग
नाक खाजवत निघून गेली
सरळ चालत सुटलो झपझप
अर्ध अंतर चालून आलो
मोडकी बस रस्त्यात दिसता
हुर्यो करून भरपूर हसलो
घरासि येता व्याकुळ जीवा
लोट्यात मोडकी गाडी दिसली
चावून चावून पाणी प्यालो
भली मोठी खोड मोडली
☆
☆ बाज – ग्रेसांचा – ☆
ती गेली तेव्हा मणभर
धूळ उडाली होती
डोळ्यास पाठमोरी
जातांना दिसली होती
रस्त्यातच गमले मजला
खस्त्यांची धुळकट वाट
खोलित एकटा माझ्या
पाण्याचा लोटा होता
पोचताच दिसला लोटा
उघडाच रिकामा होता
ज्यातून मिळावे पाणी
तो नळहि नागडा होता
☆
श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






