श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “तो एक हुतात्मा वीर!” ☆ श्री संभाजी बबन गायके

तो काही बेसावधपणे पावलं टाकत चाललेला नव्हता. पायांखालच्या गवताचा आवाज झाला तरी काही बिघडणार नव्हते. जंगलाची वाट त्याच्या पायांखालची होती… ओळखीची तर होतीच. त्या जंगलाचा तोच तर तारणहार होता. कुणी तिथल्या हत्तींची त्यांच्या दातांसाठी हत्या तर करत नाही ना, चंदनाच्या झाडांची लाकडे कुणी बेकायदेशीरपणे तोडून विक्री तर करत नाही ना, कुणी जंगलाच्या जागेवर अतिक्रमण तर करत नाही ना? हे पाहणे त्याचे कर्तव्यच होते आणि अधिकारसुद्धा.

देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी शासनाने स्वतंत्र सेनेची निर्मिती केलेली आहे… वनसेना… वनसेवा! यांतील कर्मचारी, अधिकारी जणू सीमेवर लढणारे सैनिकच. आय. एफ. एस. अर्थात इंडियन फॉरेस्ट सर्विस नावाने या सेनेचे कार्य सुरु असते. या सेनेत भरती होण्यासाठी स्पर्धात्मक निवड प्रक्रिया असते.

त्याच्या सोबत त्यादिवशी एक साथीदारसुद्धा चालत होता. हा साथीदार पूर्वाश्रमीचा चंदन तस्कर, हत्ती-हत्यारा. पण त्याने तो काळा धंदा आता सोडला होता…. आणि त्याच धंद्यात असणा-या त्याच्या भावालाही तो आता शरण आणणार होता…. होय, त्याचा मोठा भाऊ… वीरप्पन! याच्या नावाचा अर्थच मुळी होता… शूर पिता… किंवा शूर थोरला भाऊ! पण याचे शौर्य केवळ नावापुरतेच मर्यादित होते. हत्तीच्या दातांना जगभरात मोठी मागणी असते. श्रीमंत लोक यांपासून विविध शोभेच्या वस्तू बनवून घेतात. हत्ती नैसर्गिकरीत्या मेल्यावर त्याच्या या दातांचा हवा तसा उपयोग करून घेणे मान्य. पण त्यासाठी जिवंत हत्तीची निर्घृणपणे हत्या करणे, किंवा त्यांना पकडून त्यांचे दात उपटून घेणे… हे किती क्रौर्याचे काम! पण वीरप्पन हे काम बिनदिक्कतपणे करीत असे. शिवाय चंदनाच्या लाकडासही विविध कारणांनी बाजारात उत्तम किंमत मिळते. वने ही देशाची संपत्ती असतात. त्यांत असलेल्या संपत्तीवर अर्थातच देशाचा अधिकार असतो. पण वीरप्पन चंदनचोर होता. पुष्पा चित्रपटात चंदन चोरी करणारा नायकाच्या भूमिकेत दाखवला आहे…. हे आपल्या समाजाचे दुर्दैव!

वीरप्पनने ५००हून अधिक हत्ती मारले होते. १९४ कोटी ८८ लाख, ५३ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड त्याने चोरून विकले होते. या त्याच्या बेकायदेशीर कामांत आडवे येणा-या सुमारे १५० ते १८० लोकांना त्याने निर्दयपणे ठार मारले होते… यात निम्मे पोलिस अधिकारी, वनरक्षक होते… त्याने एकाच भूसुरुंग स्फोटामध्ये तब्बल २२ पोलिस कर्मचारी ठार मारले होते! या कुकर्मातून मिळालेल्या प्रचंड पैशांतील काही भाग तो स्थानिक लोकांना देत असे… आणि हे भुकेकंगाल लोक त्याला मोठा दानशूर मानीत… त्याच्यासाठी हेरगिरी करीत!

१२ सप्टेंबर, १९५४ रोजी आंध्रप्रदेशातील राजमुंद्री गावात पंडीलापल्ली श्रीनिवास यांचा जन्म झाला. आंध्र विद्यापीठात लाईफ सायन्सेस विषयात एम. ए. ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या या उमद्या युवकाचं झाडांवर, प्राण्यांवर अतिशय प्रेम होते. त्यांचेच संरक्षण करण्यची संधी देणारी नोकरी त्याने पत्करली… पण त्यासाठीही मोठी स्पर्धा असते! १९७९ मध्ये श्रीनिवास वन संरक्षण अधिकारी बनले. कर्नाटक राज्यात चामराजनगर या प्रचंड जंगल असलेल्या भागात नेमणूक असल्याने त्यांची गाठ तेथील हस्तीदंत तस्कर, चंदनचोर यांच्याशी पडली.

श्रीनिवास यांनी या सर्व चोरांची कुंडलीच तयार केली. त्यांची नावे, पत्ते, छायाचित्रे, त्यांचे काळे कारनामे यांची जंत्री तयार करून ती प्रसिद्ध करवली. त्यामुळे लवकरच अनेक तस्कर, चोर पकडले गेले. या कामगिरीमुळे श्रीनिवास साहेब बढती मिळून डी. सी. एफ. अर्थात डेप्युटी कन्सर्वटर ऑफ फॉरेस्ट झाले.

या दरम्यान वीरपन्न हा फुटकळ, चिंधीचोर तस्कर होता… पण त्याच्या कारवाया वाढीस लागल्या होत्या… एक भस्मासुर आकार घेत होता! १७ नोव्हेंबर, १९८६.. भारतात सार्क देशांची बैठक होत होती. याचवेळी श्रीनिवास यांनी वीरप्पनला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी गजाआड केली! बुडीपडागा जंगलातील वनखात्याच्या कैदेत वीरप्पनला चौदावे रत्न दाखवताच त्याने त्याच्या साथीदारांची नांवे सांगितली… आणि त्या माहितीचा उपयोग करून घेत श्रीनिवास साहेबांनी तस्कर, चोर यांच्यावर प्रचंड वेगाने कारवाई केली…. कोट्यावधी रुपयांचा माल हाती लागला… अनेक चोर पकडले गेले….! या कामांत श्रीनिवास साहेब व्यग्र असताना वीरप्पन कैदेतून फरार झाला… भस्मासुर निसटला होता! हत्ती, माणसे आणि वनाधिकारी, पोलिस यांचा जीव आता धोक्यात आलेला होता!

वास्तविक चूक इतर अधिका-यांची होती… कुणीतरी फितूर झाले असावे…. पण याचा सारा दोष स्वत:वर घेत पी. श्रीनिवास साहेबांनी वीरप्पनला पुन्हा पकडण्याचा विडा उचलला!

वीरप्पन कर्नाटक, आंध्र, केरळ या जंगलांतून अक्षरश: बेफाम वावरत होता. त्याने आपली टोळी पुन्हा उभी केली. गावकऱ्यांना पैसे देऊन तर कधी धाक दाखवून त्याने त्याच्या कामात सामील करून घेतले. विरोधात जातात अशी नुसती पुसट शंका जरी आली तर तो थेट ठार मारत असे.. ज्यांची हत्या केली, त्यांची शिरे कापून झाडांना टांगून ठेवली जात… बलात्कार, अपहरणे तर नित्याचीच झाली होती. एवढेच काय एका प्रसिद्ध सिनेअभिनेत्याचे अपहरण करून त्याने खंडणीही उकळली होती. पण सर्वांत वाईट गोष्ट झाली ती म्हणजे वीरप्पन (काही) लोकांचा हिरो बनला… त्याच्या बापाचे काहीही जात नव्हते… बेकायदेशीर मार्गाने (लोकांचा) लुटलेला पैसा, त्या पैशांतील अगदी नगण्य भाग तो लोकांच्या ‘कल्याणा(? )साठी दान देत असे… रॉबिन हूड म्हणत लोक त्याला… लुटलेल्या पैशांतून दान म्हणजे एक विनोदच!

वीरप्पन ज्या गोपिनाथम नावाच्या गावात जन्माला आणि वाढला… त्याच गावात श्रीनिवास साहेब जाऊन राहू लागले… नीडर होऊन. त्यांनी स्थानिक जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. शरण आलेल्या तस्करांना जंगलातच राखणदारांच्या जबाबदा-या दिल्या. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, दूर संचार यांबाबत मार्गदर्शन, साहाय्य उपलब्ध करून दिले…. एवढेच नव्हे तर प्रसंगी स्वत:चे पैसे खर्च करून वनसेवक, स्वयंसेवक यांच्यासाठी घरे उभारून दिली! कित्येकदा श्रीनिवास साहेब जखमी गावकरी लोकांवर स्वत: वैद्यकीय उपचार करीत.. ते त्यांनी खास शिकून घेतलेले होते! सामान्य लोकांना यापेक्षा वेगळे हवे असते तरी काय? पण यामुळे वीरप्पन चिडून जाणे स्वाभाविकच होते. त्याने श्रीनिवास साहेबांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होतीच. प्रसारमाध्यमांनीसुद्धा वीरप्पनला मोठे करण्यात कसर ठेवली नाही! आता वीरप्पन कुणाच्याही माथ्यावर हात ठेवून त्याला भस्म करू शकत होता. त्याला सर्व आधुनिक सोयीसुविधा जंगलात विनासायास प्राप्त होत… उत्तम कपडे, औषधे, टीवी त्याला उपलब्ध होत! एका पत्रकाराने तर जंगलात जाऊन त्याची मुलाखतही घेतली होती!

श्रीनिवास साहेबांना मदत करू पाहणा-या अनेक लोकांच्या वीरप्पनने क्रूर हत्या घडवून आणल्या. त्याचा सामना पी. श्रीनिवास नावाच्या ध्येयवेड्या माणसाशी होता… सत्यान्वेषण.. अर्थात सत्याचा शोध.. हा श्रीनिवास यांचा श्वास होता… लोकनायक जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता… अहिंसा हे हिंसेवरचे प्रभावी उत्तर आहे… असा त्यांना विश्वास होता! श्रीनिवास यांनी वीरप्पनच्या चाळीस पैकी सुमारे तीस लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले होते… या लोकांवर जरूर ती कायदेशीर कारवाई झालीच… पण श्रीनिवास साहेबांनी या सर्वांना न्याय मिळेल, त्यांचे पुनर्वसन होईल याची दक्षता घेतली… त्यामुळे अनेक लोक गुन्हेगारीपासून परावृत्त झाले… साहेबांनी वीरप्पनच्या मारी नावाच्या बहिणीला स्थानिक रुग्णालयात नोकरी मिळवून दिली. ज्यांचे मतपरिवर्तन करण्यात साहेबांनी यश मिळवले… त्यात वीरप्पनचा सख्खा भाऊ, अर्जुनसुद्धा होता!

९ नोव्हेंबर, १९९१. श्रीनिवास साहेबांना वायरलेस मेसेज आला…. वीरप्पन शरण येण्यास तयार आहे! पण अट एकच… साहेबांनी एकटेच, नि:शस्त्र त्याच्या भेटीस त्याच्या लपण्याच्या ठिकाणी जाऊन त्याची भेट घ्यायची… मगच तो शस्त्र खाली ठेवणार! माणूस सुधारू शकतो यावर श्रीनिवास साहेबांचा पूर्ण विश्वास आणि अनुभवही होता… ते एकटेच पायी निघाले. पूर्वी त्यांच्यासोबत स्पेशल टास्क फोर्सचे सशस्त्र जवान असत, पण जुलै महिन्यात त्यांचा एस. टी. एफ. सोबतचा कार्यकाळ संपला होता.. त्यामुळे अधिकचे संरक्षण काढून घेण्यात आले होते…. होते ते कमी करण्यात आले होते…! श्रीनिवास यांना वाटेत अर्जुन भेटला, वीरप्पनचा भाऊ…. जो आधीच शरण आला होता… पण गेल्या महिन्याभरापासून गायब होता… साहेबांनी त्याला वाट दाखवायला सोबत घेतले… वाटेत रात्र झाली… साहेब वीरप्पनच्या चुलत्याच्या घरी मुक्कामी राहिले…!

साहेबांनी वरिष्ठांना मेसेज केला… “मला खात्री आहे वीरप्पन निश्चित शरण येईल.. देव माझ्यासोबत आहे! “

वीरप्पनच्या लपण्याच्या ठिकाणापासून केवळ सहा मैल अंतर राहिले होते… रस्ता अरुंद होता… दाट झाडी… श्रीनिवासन नीडर, जंगल त्यांचे ओळखीचे…. आभाळ शांत होते. मात्र त्यांच्या पायांखालचे गवत आज निराळाच आवाज करीत होते…. अर्जुन मागे राहिला होता काही पावले… तेवढ्यात झाडांच्या आडून रायफली धडाडल्या….. गोळ्यांचा रोख श्रीनिवास साहेबांवर होता…. नेम चुकले नाहीत…. साहेब रक्ताच्या थारोळ्यात कोसळले…. जंगलातील पाखरे घाबरून आभाळात उडाली…. झाडे थरारून उठली… आणि हळहळली! वीरप्पनने त्याचा भस्म करणारा हात या निष्पाप, प्रामाणिक आणि सहजी विश्वास ठेवणा-या माणसाच्या माथ्यावर अलगद, फसवून ठेवला…. राख व्हायला विलंब नाही लागला…. पण ही राख नव्हे काळी रांगोळी होती विश्वासघाताची!

काळ या अपराधासाठी वीरप्पनला कदापि क्षमा करणार नव्हता! पिसाळलेल्या श्वानाला मिळाणारा मृत्यू त्याला पुढे मिळणार होता… पण त्याने एक शूर वाघ मात्र जाळयात फसवून मारला होता… देशाच्या संपत्तीचे प्राणपणाने रक्षण करणारा एक सैनिकच त्याने मातीस मिळवला होता…… एक शूर अधिकारी धारातीर्थी पडला होता.. वय अवघे ३६ वर्षे! वीरप्पन केवळ श्रीनिवास यांची हत्याच करून थांबला नाही…. त्या क्रूरकर्म्याने साहेबांचे शीर धडावेगळे करून ते झाडाला टांगले… इतरांना जरब बसावी म्हणून…. साहेबांचा प्रतिशोध, बदला घ्यायचा म्हणून!

हे बलिदान पुढे देशाला समजले… व्यवस्थेला कळाले….. सीमेवर लढणा-या, देशात देशासाठी हाती शस्त्रे धरून लढणा-या सैनिकांना, अधिका-यांना देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार दिला जातो… कीर्ती चक्र! साहेबांना चंदनाच्या लाकडांत पूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला!

श्रीनिवास यांच्या मातोश्रीं पी. जयलक्ष्मी यांनी तत्कालीन राष्ट्रपती महोदय श्रीमान आर. वेंकटरमण यांच्या हस्ते दिल्लीत लाडक्या लेकाला मरणोत्तर जाहीर झालेले कीर्ती चक्र स्वीकारला.

पी. श्रीनिवास यांचा हौताम्य दिवस, १० नोव्हेंबर हा दिवस वन हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.

वीरप्पन नावाचा विषारी कीटक पुढे कित्येक वर्षे त्याच्या कोषात लपून बसला होता…. त्याला १८ ऑक्टोबर, २००४ रोजी ‘ऑपरेशन कुकून’ मध्ये यमसदनी पाठवण्यात यश मिळाले… एक भस्मासुर मातीत मिळाला होता… पण त्याने त्याच्या जीवनकालात मोठा हाहा:कार माजवून ठेवला होता… पी. श्रीनिवास साहेबांनी वीरप्पनला शरण आणण्यासाठी दाखवलेले शौर्य अलौकिक होते… दुर्दैवाने पी. श्रीनिवास साहेबांच्या कामगिरीची माहिती सामान्य जनतेला अजूनही पुरेशी नाही… त्यासाठी हा लेखन प्रपंच.

– – आणखी एखाद्या भारतीय माणसाला ही कहाणी सांगावी. जयहिंद! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted