सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ संध्याछाया भिवविती ???? ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आयुष्याच्या सांजवेळी ‘संध्याछाया भिवविती ‘अस न वाटता,

‘संध्याछाया सुखविती ‘. असं वाटलं तर आयुष्य किती सुखकर होईल. “••••

काल ताईकड़े गेले होते. आज ताईला जेष्ठ नागरिक संघात या विषयावर बोलायचे होते. ताई म्हणजे मुद्दे सूद बोलणार, अभ्यासपूर्ण तयारीने मैदानात उतरणार. आपल्या ड्रेसिंग वर, बॉडी लँग्वेज वर, आवाजावर ती व्यवस्थित लक्ष देते. शंभर दोनशे ज्येष्ठांसमोर बोलणे म्हणजे काही थट्टा नाही. सर्वच विचारांनी परिपक्व, अनुभवाने श्रीमंत असणारा हा वर्ग, आपले मत मांडण्यात समर्थ असतो. त्यांना पटलं तर ठीक, नाहीतर स्पष्ट सांगणार, असा हा वर्ग समोर असणार, म्हणजे तयारी पण त्याला साजेशीच असायला हवी. भाषण आणि तेही पुण्यात, जेथे चुकीला माफी नसते. ••••

ताई म्हणजे भरपूर आत्मविश्वास. , जपून शब्द वापरणार, दुसऱ्यांच्या मताचाही मान ठेवणार व पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार. मग ते भाषण देणे असो, कोणाला घरी जेवायला बोलविणे असो, नाहीतर कोणाशी फोनवर बोलणे असो. ती पूर्ण विचार करते. स्पष्ट विचार, दुसऱ्यांचे पण ऐकणे, त्यांच्या घरच्या चांगल्या वाईट घडलेल्या गोष्टी लक्षात ठेवून, ती आपल्या बोलण्यात त्यांचा उल्लेख करते. तिच्या अशा वागण्याने आपोआपच एक छान बॉन्ड तिचा तयार होतो. माणसे जमविणे व जपणे, दोन्ही जमते तिला. देवाने रूप देताना थोडी कंजुषी केली असली, तरी व्यक्तिमत्त्व प्रभावी असण्यासाठी आवश्यक गुण मात्र भरभरून दिले आहेत. सर्व जण ताई कडे आदराने बघतात. ••••

प्रत्त्येक वेळेस मी ताईकडून काही तरी नवीन चांगले शिकतेच. ••••

ताई म्हणाली, •••आजचा विषय थोडा वेगळाच आहे. आयुष्याची संध्याकाळ आनंदी होण्यासाठी सुरवातीपासूनच आदर्श जीवन जगलो तरच शक्य आहे ते. पण असं कुठे होतं का ?? हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आयुष्यात आपली गाडी खूप पूढे गेलेली असते. चूका होऊन गेलेल्या असतात. काही अनावधानाने, तर काही दूरदृष्टी नसल्याने, तर काही सळसळत्या रक्तामुळे. ••

वयही कमी असतं. या वयात ज्या गोष्टी समजतात, कळतात त्या पुर्वी कुठे समजायच्या. ?? आपल्याच नादात होतो. वाऱ्यासारखे बेभान. ••••

म्हणतात ना, ••••

घरच्या ज्येष्ठां सोबत रोज दहा मिनिटे जरी बसलं तरी आयुष्याची समीकरण सहज समजतात. पण कुठे?? कोणाजवळ वेळ असतो का तेंव्हा ? वयाप्रमाणे अनुभव येत गेले. ठोकर/ टक्के टोणपे खाल्ले, त्या बरोबर धुंदी उतरत गेली. तसतसे आठवत गेले, •••

अरे !! खरंच ! आजोबा बरोबर म्हणत होते. हेच तर सांगयचे नेहमी ते. बरे असो, •••

जेष्ठ झाल्यावर नोकरीतुन निवृत्त झाल्यावर जेंव्हा वेळ मिळतो, स्वतः कडे बघायला, मागे वळून बघायला. तेंव्हा खूप गोष्टी लक्षात येतात. त्याचवेळी दार उघडून बघावं, तर म्हातारपण दारातच उभे असल्याचे लक्षात येते. म्हणजे संध्याछाया फेज सुरू झालेला असतो तर. •••

रिकामा वेळ म्हणजे नको नको ते आठवत. कितीदा चूकलो, किती दा बळी पडलो, तेंव्हा का स्टंड घेतला नाही ?? तेंव्हा रागवायलाच हवं होतं. , स्पष्ट ‘नाही ‘ म्हणायलाच हवं होतं. तेथे घर घेणे चुकलेच, तेथे पैशाची गुंतवणूक ही चुकली. ज्यांना भाव दिला, आपलं मानलं ते तर काम झाल्यावर सहज दुर्लक्ष करून निघून गेले.

गरज संपली तसं नातंही संपलं. व्यायाम तर कधी केलाच नाही. ••••

” ढल जाती हैं हर चीज, अपने वक्त पर,

बस एक व्यवहार और लगाव ही हैं जो कभी बूढ़ा नहीं होता. “••••

हे सर्व कळत असत पण वळत नसतं. •••

 मधल्या फेज मध्ये अनेक गोष्टींची उलाढाल चालू असते. नोकरी, पैसा, मुलं, शिक्षण यांची गुंतागुंत होत असते. आवश्यक व अनावश्यक गोष्टी समजण्यात गफलत होत असते. विचारांत स्पष्टता नसते. पैसे जोडण्याच्या नादात नात्यांची सर्व्हिसिंग राहुन जाते. व्यक्तिगत अडचणी आणि त्या ओलांडत पूढे जाताना काही गोष्टी मागे सुटतात. हे करू? की ते करू? यात खूपदा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येत नाही. नोकरी, घर परिवार, आप्त, मित्र मंडळ म्हणजे work- life- balance यांचा समन्वय साधताना गडबड झालीच. खूप दूरचे बघण्यात एवढे बिझी होतो, की समोर दिसणाऱ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा राहूनच गेला. ••••

आता असं वाटत,

” We were Growing old but we were not growing up. “••••

असं बहुतेक प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असावं. ••••

हे सत्य कळत, तेंव्हा मात्र खूप उशिर झालेला असतो. •••••

आता स्वतः वरच हसावं का रडाव?? कळत नाही. खरंच एवढी धावाधाव करायची गरज होती का ?? एवढं जमवायला जीवाचे रान केले. खरतर गरजच नव्हती. नाती सांभाळताना माझ्या वागण्याने माझी मुलं सुद्धा नाराज झाली. चुकलंच माझं. •••

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे होती. एकतर विचार न करता कृती केली किंवा फक्त विचारच करत बसलो, कृती करायचे राहूनच गेले. ••••

खूपदा निर्णय घेताना तात्पुरता विचार केला गेला. त्याचा ‘long term effect ‘ काय होऊ शकतो ??हा विचारच केला नाही. ••••

आता विचार करून काय उपयोग ?? जे झाले ते होऊन गेल. •••

पण आता पूढे काय ?? आयुष्याची संध्याकाळ आनंदी जायला आता तरी व्यवस्थित ठरवू या. •••

आता वेळही आहे व समजही आहे. तरी चूका होणारच नाही, याची शाश्वती मात्र आजही देता येणार नाहीच. ••••

आता ठरवलंय घरातल्या जमलेल्या वस्तूंचा किंवा मनातल्या विचारांचा योग्य विनियोग करायचा. आता पर्यंत आपल्या ‘ईगोमुळे’ म्हणा किंवा ‘संकुचित वृत्ती’ मुळे म्हणा काही गोष्टी राहुनच गेल्या. आता जमेल तेवढा मनातला’ emotional account clear ‘करायचा. प्रत्येक दिवस ‘occasion ‘ समजून साजरा करायचा. •••

आयुष्याच्या या फेज मध्ये आपले ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व सांभाळून येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगाला शांत राहून तोंड देणे. हेच आपण करू शकतो. थोडा संयम, थोडी सहनशीलता व थोडे दुर्लक्ष करणे हे नियम मात्र पाळावे लागतील. •••

सुख आणि यशाच्या मागे धावताना अर्ध अधिक आयुष्य तर संपलं. परंतु अपयश आणि मिळणाऱ्या दुःखाने जगायच कस ?? याच मार्गदर्शन उत्तम केले. तरी बरं आपल्या सारखे सामान्य परिवारातील देवभीरू लोक बऱ्यापैकी नियमानुसारच वागतात. ••••

ताई म्हणाली, ••••अग !! किती बोलत बसलेय मी. भाषणाची तयारी करायची आहे ना मला. ••••

मी म्हंटल, ••••अग ! आत्ता जे बोललीस तेच सांग ना. झाली की तयारी. ••••

प्रत्येकाची जीवन कहाणीच सांगितली की तू. थोड्या फार फरकाने असंच घडतं प्रत्येकाच्या आयुष्यात. युगानुयुगे हे असंच तर चक्र चालू आहे. ••••

खरं आहे. यालाच जीवन ऐसे नाव. •••

म्हणतात ना, ••• 

“पछतावा अतीत नहीं बदल सकता,

और चिंता••• भविष्य नहीं सँवार सकती । 

इसलिए वर्तमान का आनंद लेना ही जीवन का सच्चा सुख हैं।” •••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
ज्योती कुळकर्णी अकोला
0

संध्याताई मनमंजूषेतून छान व्यक्त झालात!