सौ. अर्चना गादीकर निकारंगे
🌸 जीवनरंग 🌸
☆ संग्राह्य… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
सकाळची वेळ होती. काम उरकून जान्हवी जरा सोफ्यावर येऊन बसली. जयेश म्हणजे तिचा नवरा मघाशीच कामावर गेला होता. डायनिंग टेबलवर पालवीचा अभ्यास चालू होता त्यामुळे नुसता पसारा दिसत होता. यावर्षी ती चौथीत गेली होती. नुकतीच शाळा चालू झाली होती. तिथे जवळच आसावरी ताई त्यांच्या पोथी वाचनात दंग होत्या. उकाड्याने हैराण व्हायला झाले होते. जान्हवीने खिडकीजवळचा फॅन लावला. पाच दहा मिनिट जरा बसून तिला पालवीला शाळेसाठी तयार करायचे होते. जयेशच्या डब्याला पोळीभाजी देण्याच्या निमित्ताने तिचे पोळीभाजीचे काम अगोदरच आवरले होते. पण आता त्या तिघींसाठी तिला वरण भाताचा कुकर लावायचा होता व बिटाची कोशिंबीर पण करायची होती.
बघता बघता जान्हवीच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती. पालवीच आता नऊ वर्षांची होणार होती. जयेशचे वडील अनिल राव आणि आई आसावरी ताईंनी जान्हवी लग्न होऊन सासरी आल्यावर कधी तिला सुनेसारखी नाहीतर स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागणूक दिली होती. दोन वर्षांपूर्वी अनिल राव वारले होते. सरकारी नोकरीत उच्च पदावर राहून ते निवृत्त झालेले होते आसावरी ताई पण मराठी विषयाच्या काॅलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या सुध्दा निवृत्त झाल्यावर आपला वेळ देवाधर्मात, झाडांची देखभाल करण्यात व्यतीत करत होत्या. गाण्याची आवड असलेल्या, बागकामाचा छंद असलेल्या
अशा चौफेर व्यक्तिमत्वाच्या होत्या. जान्हवीच्या आईने जेवढे संस्कार करुन उरले असतील तेवढे त्यांनी तिच्यावर केले होते. घरातील धार्मिक कार्यांतील रीतीभाती असोत, स्वयंपाकाची वेगळी पदधत असो आणि मराठी भाषा बोलण्यातील उच्चार असोत त्यांनी तिला चूक बरोबर समजावून सांगितले होते. त्यापाठी उपहासाची भावना नसून प्रेमच होते आणि हे सर्व जान्हवीने पण मोठ्या मनाने समजून घेतले होते.
आमटीला फोडणी देऊन जान्हवीने पालवीला आवाज दिला. ” पलू, चल लवकर. आवर आता शाळेत जायच आहे की नाही? उशिर झाला तर स्कूल बस निघून जाईल. तिथपर्यंत पालवीने पण अगोदरच दप्तर भरून शाळेचा युनिफाॅर्म घातला होता. आता जेवायचे तेवढे राहीले होते. ” हे काय ग मम्मा, मी तर तयार पण झाले. ” दे ना लवकर जेवायला. ” अस म्हणून पालवीने डायनिंग टेबलची खुर्ची बाहेर काढली व ती बसली. आज लेकीला तयार पाहून जान्हवीने जरा हुश्श्य केले. पुढच्या दहा मिनिटांत ती पालवीला गेटवर स्कूल बसमध्ये बसवून आली. आसावरी ताईंचे देवाचे वाचन आटोपल्यावर त्या दोघी जेवण आटोपून आपापल्या खोलीत आराम करायला गेल्या.
संध्याकाळी मात्र जान्हवीने हाॅलच्या गॅलरीत उभ राहूनच पालवीच्या बसची वाट पाहायचे ठरविले होते. थोड्याच वेळात बस गेटवर आली. बसमधून पालवीला उतरलेले पाहून जान्हवी दार उघडायला गेली. कारण तिला ठाऊक होते की पालवीला दार उघडेस्तोवर धीर नसतो. आज नाचत नाचत पालवी घरात शिरली. तिचे हे वागणे रोजचेच असायचे. घराबाहेर पडल्यापासून घरात शिरेपर्यंत तिच्याबरोबर काय काय झाले? तिला कोण काय बोलले? हे सगळे इत्थंभूत आजी व आईला सांगितल्याशिवाय तिचा दिवस जात नसे. आज पण ती दप्तर कसेबसे जागेवर ठेवून ” आजी, आजी ” करत आसावरी ताईंकडे गेली. त्या तिला थोड्या रागावून म्हणाल्या, ” पलू, किती वेळा तुला सांगायच बाहेरुन आल्यावर पहिल्यांदा हात-पाय धुवायचे. आम्ही दोघी कुठे पळून जाणार असतो का? मग सांग तुला काय सांगायचे आहे ते. ” पालवी पटकन बाथरूमचा दरवाजा ढकलून आत जाऊन पाय धुऊन आली. ” आजी, काय झाल सांगू तुला? ” आज मीराने डब्यात पुरणपोळी आणली होती, तिने मला पण दिली. मग मीसुध्दा माझ्या डब्यातले आप्पे तिला देऊ केले. जान्हवी तिथे बसून हे सर्व ऐकत होती. पालवी पुढे आजीला म्हणाली, ” आजी आणि बरं का? आमच्या मराठीच्या टीचर आहेत ना त्यांनी काहीतरी मोठ वाक्य म्हटल होत. मला ना त्याचा अर्थ सांग ना ग. काय बर होत ते? ” अस म्हणून ती आठवण्याचा प्रयत्न करु लागली. तिला तस विचार करताना पाहून जान्हवी व आसावरी ताई एकमेकींकडे पाहून हसल्या. पलू आनंदाने जोरात ओरडली. ” आठवल मला. पेरावे…? काय होते ते बर? ” नाही आठवत पालवी थोडी नाराज होऊन म्हणाली. आसावरी ताई तिला जास्त निराश न होऊ देता म्हणाल्या. ” अग बाळा, तुला असच म्हणायच आहे का की पेरावे तसे उगवते? ” पालवीने एक जोरात टाळी वाजवून म्हटले, ” हो ग आजी, अगदी बरोबर. तुला कस माहिती आमच्या टीचरनी अस म्हटलेल.? आणि याचा अर्थ ग काय असतो? पेरावे म्हणजे काय? ” आसावरी ताई हसून तिला म्हणाल्या, ” बस बाळा माझ्याजवळ. मी तुला सांगते त्याचा अर्थ काय आहे तो. ” पालवी येऊन त्यांच्याजवळ बसली. आसावरी ताईंनी आजीच्या वात्सल्याने पालवीच्या पाठीवरून हात फिरवला व त्या तिला म्हणाल्या, ” बर का पालवी, पेरावे तसे उगवते म्हणजे जस एखादा धान्य पेरणारा कोण? सांग बर ” पालवी झटकन म्हणाली ” शेतकरी. ” ” बरोबर. तो जमिनीची नांगरणी झाल्यावर जे धान्य पेरतो तेच धान्य धरणीमाता परत पिकांच्या रुपात आपल्याला देते. आता पुढे रोजच्या आयुष्यात आपण माणस जशी चांगली किंवा वाईट कृती करतो. तशी फळ आपल्याला मिळतात. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणून बाळा वडीलधारी माणस लहान मुलांना सांगत असतात, कधी कोणाला उलट बोलायच नाही, वाईट बोलायच नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. दुखवायचे नाही ते म्हणूनच. ” पालवी गंभीर होऊन आजी सांगत असलेला शब्द नी शब्द लक्ष देऊन ऐकत होती. पालवी ही मुळातच शांत स्वभावाची होती. तिची आजी काहीतरी चांगले सांगतेय हे तिच्या बाल मनाला कळत होते. टीचरने सांगितलेल्या त्या वाक्याचा अर्थ असा आहे हे कळल्यावर ती पुढची काही मिनिटे विचार करत राहिली. आपली आजी किती हुशार आहे तिला काहीही विचारा तिला सर्व माहीत असत असा विचार मनात येऊन ती नकळत आजीवरच्या अभिमानाने ताठ बसली. तिथे बसून ऐकत असलेल्या जान्हवीला पण सासूबाईंचा सार्थ अभिमान वाटला. जान्हवीच्या माहेरच्यांमध्ये त्यांना आदर होता. जान्हवी विचार करू लागली. ” मीसुध्दा पलूला एवढ्या साध्या, सोप्या भाषेत समजावू शकले नसते. आई खरच ग्रेट आहेत. लहानांशी कस बोलाव त्यांना सोप्या भाषेत कस समजवाव हे त्यांना अगदी छान कळत. ” रात्री झोपायला खोलीत जाताना तिने आसावरी ताईंना त्यांच्या त्या खुबीबद्दल मनापासून धन्यवाद दिले. त्यावर त्या म्हणाल्या, ” अग, अंगची शिक्षिका आहे ना मी, लहान मुलांना व्यवस्धित समजावून सांगण्यात मी माझे आयुष्य सत्कारणी लावले आहे. ” अस म्हणून त्या खोलीत जाऊ लागल्या. त्यांना पाहून जान्हवी विचार करू लागली. ” खरच किती सुंदर विचारांनी परिपूर्ण आहेत ह्या? मनाच्या हार्ड डिस्कवर हयांच्या ह्या विचारांना नक्की संग्राह्य करून ठेवायला हव. ” आणि ती स्वतःशीच हसली.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





