सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ खिचडी… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

कडाक्याच्या थंडीचा एखादा दिवस…

किर्लोस्करवाडीला आजोळी कार्यक्रम असलेला..

दुपारचं गोडाचं भरभक्कम जेवण झालेलं..

आग्रह करकरून वाढलेलंं..

” पोरांनो, आता जरा पडा दुपारचं “… आया.. मावश्या.. माम्यांच्या दटावण्याला न जुमानता सगळ्या ढेरपोट्यांनी अंगणात धूम ठोकलेली असायची…

लपंडाव, विषामृत, डबाऐसपैस… या मंतरलेल्या विश्वात सूर्यदेव कधीचे आपल्या घरी परतलेले…

मागे मिट्ट काळोख सोडून.. नि थंडीला आवतण देऊन..

पुढे आलेली पोटं आपापल्या जागी परत गेलेली नि सकाळच्या जेवणानं झोपी गेलेल्या कावळ्यांना आता जाग आलेली असायची..

सगळा पोरवडा ” भूक.. भूक ” करत त्या भल्या थोरल्या स्वयंपाकघरात शिरायचा

नि

 फक्त “नाक” या एकमेव इंद्रियाची जाणीव रहायची…

थंडीमुळे बंद दारं-खिडक्या नि पेटलेल्या चुलीच्या आश्वासक उबेनं भरलेलं ते स्वयंपाकघर स्वर्गीय गंध लेवून बसायचं…

चुलीवरच्या मोठ्या पितळी पातेल्यात रटरट शिजणा-या खिचडीचा दरवळ सारा भवताल भारून टाकायचा..

आंबेमोहर तांदुळ, गावरान मूगडाळ, माम्यांनी नुकताच केलेला ताजा ताजा गोडा मसाला, परसातला हिरवागार कढीपत्ता नि आजीचं सिग्नेचर म्हणून तिने स्वत: पाट्यावर वरवंट्यानं वाटलेलं जिरं-खोबरं…! !

विश्वातली सारी अत्तरे फिकी पाडणारा हा सुगंध..! !

त्या पाठोपाठ कढीवर नाहीतर टोमॅटोच्या किंवा आमसुलाच्या सारावर “चर्र.. ” आवाज करत मादक गंधनिर्मिती करणारी.. तूप, जिरे, हिंग, मिरचीची जिवंत फोडणी..

जठराग्नीला अजूनच पेटवणारी…

बसकुरांवर बसलेली गोल पंगत..

आम्हा भावंडांची नि माहेरवाशिणींची..

ही खिचडी खास आजीच्या हातची.. तिच्या लेकींसाठीची..

मामींनी वाढलेली फिकट पिवळी वाफाळती खिचडी..

त्यावर पांढरं शुभ्र ओलं खोबरं.. हिरवीगार कोथिंबीर.. शेजारी धम्म पिवळी लिंबाची फोड, लिंबाचं नाहीतर कैरीचं लालचुटुक लोणचं, तळलेली सांडगी मिरची, पोह्याचा गुलाबी पापड नि वाटीत पिवळीधम्म कढी नाहीतर लालचुटुक टोमॅटोचं सार किंवा सुरेख 

आमसुली रंगानं सजलेलं आमसुलाचं सारं..

डोक्यावर जिरे नि कोथिंबीर मिरवणारं.. गरमागरम..

गंधाच्या सोबतीला रंगांची उधळण..

चांदीच्या तामलीतून खिचडीवर पडणारं रवाळ साजून तूप.. विड्याचं पान घालून आजीनं आदले दिवशीच कढवलेलं…

खिचडीशी मीलन होताना अजूनच न्या-या सुवासाची निर्मिती करणारं…

कुणीही सहज हरवून जावं.. अशी ही रंग.. गंधयात्रा..

त्यापाठोपाठ स्वादांनी घातलेली भूल…

खिचडीचं ते मोठ्ठं पातेलं काही मिनिटांत रिकामं व्हायचं!

साठ-पासष्ठ वर्षे रांधण्यात रमलेले आमच्या आजीचे अन्नपूर्णेचे हात साध्याशा खिचडीला दैवी स्वाद-गंध बहाल करत.

ती रात्र अमृताची होऊन जाई…

नि

खिचडी थेट काळजातील आठवणींच्या कप्प्यात रुतून बसे..! !

माझी आईही खिचडी अतिशय छान करायची.

” फक्त तुझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी कर… ” आईला पाहुण्यांची फर्माईश असे..

संक्रांतीच्या आदले दिवशी आई आवर्जून खिचडी करायची..

नि

बाबांना आवडायची म्हणून भरली वांगी.. कृष्णाकाठची…

रसनेबरोबरच मनही तृप्त व्हायचं.! !

खिचडी प्रचंड आवडणा-या माझ्यासाठी माझ्या लग्नातही सीमांतपूजनाला खिचडी होतीच…

थोडीशी मसालेभाताकडे झुकणारी मस्त चमचमीत गरमागरम खिचडी, भरपूर तूप, कच्ची पपई घातलेली चवदार कढी, भरली वांगी, पु-या नि आटवलेल्या दुधात मस्त केशर, बदाम घालून केलेली शेवयांची खीर…

आमच्या मिरजेच्या दत्त कार्यालयातल्या या चविष्ट मेन्यूनं सासरच्या स्वा-यांनाही खूश करून टाकलं होतं…

खिचडीचं मंगळागौरीतलं स्थान आगळच्…

श्रावणातली मंगळागौरीची पूजा..

सकाळचं पुरणपोळीचं सज्जड जेवण..

संध्याकाळपासून बरसणा-या रिमझिम श्रावणधारा..

ओल्याचिंब तनमनाने नि तळव्यावरचा मेंदीचा ओला रंग घेऊन रात्रीचे खेळ खेळायला आलेल्या वशाळ्या..

मंगळागौरीची आरती पार पडते..

पंगत बसते..

पानात गरमागरम आळणी खिचडी, तूप वाफाळती कढी किंवा सार, मटकीची उसळ,

भाजणीचे वडे, दही, हिरवीगार चटणी, चकली, लाडू, करंजी वाढली जाते..

” करा गं सुरुवात पोरींनो “… एखादी प्रेमळ काकू बोलते नि तिच्या पाठीवर प्रेमळ हात फिरतो..

” सावकाश आणि पोटभर जेव हं… खिचडी आवडते नं? “.. त्या अनोळखी काकुंच्या वाणीतून त्या नवविवाहितेला आईचे शब्द ऐकू येतात..

लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिच्या आवडीच्या खिचडीचा गरम घास तिला मिळत असतो…

एरवी थंड घास घशाखाली उतरवायची सवय तिने लग्नानंतर लावून घेतलेली असते..

काकुंच्या मायेच्या शब्दांनी तिचे डोळे वाहू लागतात.. आईची अतीव आठवण येते..

अश्रू खारट असले तरी ते तो खिचडीचा घास गोड करून जातात…

माझ्या सासुबाईही खिचडी अतिशय चविष्ट बनवत..

खिचडीसाठी त्या कच्चा गरम मसाला बनवून ठेवत असत.

कच्चा मसाला, दालचिनीची काडी नि बडिशेप घालून केलेली त्यांच्या हातची मऊसूत खिचडी लाजवाब…

ती खाल्ल्यानंतर मला माझ्या हातच्या खिचडीचा कॉम्लेक्सच यायचा..! !

गुजराती खिचडी नि कढी हे वेगळच प्रकरण..

माझ्यासारख्या अस्सल खिचडीप्रेमींनी मनापासून आवडणारं..

मी गुजराती थाळी खायला जाते ते केवळ या मऊमऊ खिचडी नि कढीसाठी…! !

चोवीस वर्षांपूर्वीची गोष्ट…

आम्ही नवरा बायको दोघेच होतो..

वेलीवर फूल उमलायच्या प्रतीक्षेत होतो..

पण पदरी निराशा येत होती..

रविवार होता.. सुट्टीचा दिवस..

संध्याकाळची वेळ.. उदास वाटत होतं..

आजारी आजारी वाटत होतं कारण नसताना..

उगीचच अक्कलकोटला गेलो..

परत आलो..

बाहेर जेवायचं ठरलं..

” मी फक्त मुगडाळ खिचडी खाईन.. “

” सोलापुरात कुठली मुगडाळ खिचडी मिळायला हॉटेलात.. ” नवरा चक्रावला..

” गुजराती थाळीत असते खिचडी ” त्याच्या डोक्यात प्रकाश..

सोलापुरातलं गुजराती थाळी मिळणारं एकमेव हॉटेल ” रसिक ” गाठलं.

” नेहमी खिचडी असते, पण आज नाहीये ” वेटरचं उत्तर..

नव-यानं थाळी घेतली..

मला जेवावसच् वाटत नव्हतं.

मी तशीच बसून राहिले..

” आपण डॉ. ****** नं? “

एक वयस्क गृहस्थ शेजारी येऊन उभे राहिले.

” हो “..

” मी ******… हे हॉटेल माझं आहे. मला पोटाचा फार त्रास होतोय. तुम्हाला दाखवायला यायचय.. “

ते गृहस्थ तिथेच खुर्ची घेऊन बसले नि त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सांगू लागले…

” भाभी का जेवत नाहीयेत? “

” त्यांना बरं वाटत नाहीये. खिचडी खायची होती पण आज नेमकी हॉटेलमधे नाहीये. “

” अरेरे.. असं झालं का? “

असं म्हणत ते आजोबा अचानक गेले नि पाच मिनिटात एक डबा घेऊन परत आले.

” घ्या ताई… माझं पोट बरं नसल्यानं मी घरातून खिचडीचा डबा माझ्यासाठी आणलाय. तुम्ही यातली खिचडी घ्या. चालेल नं? “

संकोच वाटत होता पण एवढ्या प्रेमानं दिलेल्या खिचडीला नाही म्हणता येईना..

ती चविष्ट नि आपलेपणानं दिलेली खिचडी अमृतासमान भासली..

” आवडीनं खिचडी खाणार त्याला देव खिचडी देणार “… असा काहीसा तो अनुभव..

स्वामी समर्थांनीच कदाचित दिलेला तो खिचडी प्रसाद…

त्यानंतर आठ दिवसांत मी गरोदर असल्याची गोड बातमी कळली…

मला खिचडीचे डोहाळे लागले होते..

नऊ महिने मी रोज खिचडी खायचे..

पण निसर्गाची लीला पहा…

जी लेक पोटात असताना रोज खिचडी मागायची..

ती पोटातून बाहेर आल्यावर मात्रं खिचडीचा कणही तोंडाला लावत नाही..! !

हॉटेलात मिळणारी डाळखिचडी चांगली असते.. पण घरच्या सात्त्विक खिचडीची सर तिला नाही..! !

एखादा पावसाळी दिवस असतो..

नवरा नि लेक गावाला गेलेले असतात…

उदास वाटत असतं..

मी मऊसर खिचडी रांधते..

आता मी हेल्थ कॉन्शिअस झालेली असते..

त्यामुळे त्यात मी समस्त भाज्यांची मांदियाळी घालते..

पापड भाजते..

कढी करण्याइतका उत्साह नसतो..

ताकाचा मठ्ठा बनवला जातो..

ताटलीत गरमागरम खिचडी येते..

त्यावर कॅलरीचा विचार न करता तूप पडतं.

लोणचं नि पापडही ताटलीत येतो..

पावलं आपोआप दारातल्या पाय-यांकडं वळतात..

पायरीवर बसून नजर आकाशाकडे जाते…

काळे काळे ढग आभाळात इकडून तिकडे वेगाने जात असतात…

आठवणींसारखे…

ऊन ऊन खिचडीचा एक घास तोंडात जातो..

चुलीवर खिचडी रांधणारी आजी आठवते..

दुस-या घासाला आईची प्रेमळ मूर्ती डोळ्यासमोर येते..

तिस-याला सासुबाई दिसू लागतात..

रसिकचे मालकही डोळ्यांसमोर उभे राहतात..

इतक्यात जोराचा पाऊस पडू लागतो…

माझं अगणं, माझी बाग सगळं ओलंचिंब होतं..

अन् कसं कुणास ठाऊक…

पण माझा चेहराही ओलाचिंब झालेला असतो..! !

तर अशी ही खिचडी…

भारताचा राष्ट्रीय पदार्थ..

पौष्टिक नि सात्त्विक परीपूर्ण आहार…

कोणत्याही ऋतुत, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी खाता येणारा..

शुभकार्यात नि दिवसकार्यातही चालणारा..

दात न आलेल्या नि समस्त दातांनी रजा घेतलेल्या… अशा कुणालाही खाता येणारा वैश्विक पदार्थ..

घटकपदार्थ बदलले की चवही बदलते.

म्हणून प्रत्येकाच्या खिचडीची चव वेगळी..

तसं पहायला गेलं तर कुणालाही सहज बनवायला येणारा हा पदार्थ…

पण मीठ, तिखट, मसाला… सगळं कसं योग्य प्रमाणात पडायला लागतं…

आणि हो..

खिचडीचं शिजणंही योग्य प्रमाणातच हवं..

कमी शिजली तर कच्ची राहते

नि 

जास्त शिजली तर चिखल होऊन जातो..

आणि मुख्य म्हणजे ती शिजल्या शिजल्या लगेच खावी लागते..

ऊन ऊन असताना…

नाहीतर बेचव होऊन जाते…

आयुष्याचंही असच असतं.. नाही का?

खिचडीसारखीच प्रत्येकाच्या आयुष्याची चव निराळी..

पण तरीही…

दु:ख, राग, प्रेम, आनंद, चिंता, अभिमान… सगळं कसं योग्य प्रमाणात पडावं लागतं…

नि

सारं काही वेळेवर व्हावं लागतं…

तरच…

ऊन ऊन खिचडीसारखं आयुष्य चविष्ट होतं…

नि

कळायच्या आत खिचडीचं पातेलं रिकामं होतं…

तसं आयुष्यही…

हसत खेळत संपून जातं…! !

 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted