डाॅ. विष्णू वासमकर

? विविधा ?

☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

सुधीर रसाळ हे मराठी साहित्य आणि समीक्षाविश्वातील एक महत्त्वाचे नाव. सुमारे 60 वर्षे त्यांनी मराठी साहित्यव्यवहारात आपल्या समीक्षात्मक लेखनाने मोलाची भर घातली आहे. ‘कविता आणि प्रतिमा’ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक ग्रंथ 1982मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने साहित्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणारा एक समीक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.   ‘काही मराठी कवी जाणिवा आणि शैली’, ‘वाङ्मयीन संस्कृती’, ‘मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप’, ‘मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्मक वाङ्मय’, ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’, ‘पार्थिवपूजक पु‌. शि. रेगे, ‘समीक्षा आणि समीक्षक’, ‘कवितायन : विंदा करंदीकर यांची कविता’, ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ इत्यादी अनेक समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आजही त्यांचे लेखन चालू आहे. किंबहुना वयाच्या नव्वदीनंतरही ते तितक्याच निष्ठेने समीक्षालेखन करत आहेत. ‘संवादातून साहित्यशोध’  हा त्यांच्या मुलाखतींचा संग्रह प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी नुकताच पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने संपादित केला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा आपल्याला विचार करायचा आहे.

डॉ. सुधीर रसाळ

सुधीर रसाळ हे मर्मग्राही स्वायत्ततावादी समीक्षक आहेत . मराठी समीक्षेची सुरुवात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. मराठीतील इतर आधुनिक साहित्यप्रकारांप्रमाणेच  समीक्षेची बीजे प्राचीन काळात सापडत असली तरी 1872 नंतर मराठी समीक्षेने आधुनिक रूप धरायला सुरुवात केली, असे म्हणता येईल. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात साहित्याचा विचार प्रामुख्याने जीवनवादी आणि कलावादी दृष्टिकोनातून होत राहिला आहे. जीवनवादी समीक्षक साहित्याचा मानवी जीवनाच्या संदर्भात विचार करतात.  तर कलावादी समीक्षक साहित्याचा कलेच्या दृष्टीने विचार करतात. कलावादी समीक्षकांची मराठीमध्ये एक परंपरा दिसून येते. या परंपरेचे मर्ढेकरपूर्व आणि मर्ढेकरोत्तर असे दोन भाग होतात. मर्ढेकरपूर्व कालखंडात काही समीक्षक साहित्याचा कलावादी  दृष्टिकोनातून विचार करत असले तरी मर्ढेकरांच्यापासून साहित्याचा विचार निखळ कलावादी दृष्टिकोनातून होऊ लागला. मर्ढेकरोत्तर कालखंडात स्वतः मर्ढेकर, पु.शि.रेगे, वा. ल.कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, माधव आचवल, प्रभाकर पाध्ये आणि सुधीर रसाळ यांसारखे समीक्षक साहित्याचा कालावादी दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करू लागले. मराठीतील कलावादी समीक्षकांवर पाश्चात्त्य साहित्यशास्त्रातील इमॅन्युअल कांट आणि विश्वचैतन्यवादी विचारवंत यांचा प्रामुख्याने प्रभाव दिसतो.

डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेवर सुरुवातीच्या काळात मराठीतील गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुळकर्णी यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. नंतर अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्यावधी कालखंडात उदयास आलेल्या ‘न्यू क्रिटीसिझम’ (नवी टीका) या  रूपवादी चळवळीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.  न्यू क्रिटिसिझम या चळवळीचे नाव जॉन क्रो  रॅन्सम यांच्या 1941 च्या ‘द न्यू क्रिटिक्स’ या पुस्तकावरून पडले आहे. आय. ए. रिचर्ड्स, क्लींथ ब्रुक्स, जॉन क्रो, डब्ल्यू के विमसॅट आणि मोनरो ब्रियर्डस्ली हे न्यू क्रिटीसिझमच्या चळवळीतील  प्रमुख विचारवंत होते.  साहित्याचे कार्य एक स्वयंपूर्ण एक सौंदर्यात्म वस्तू म्हणून कसे करते हे शोधण्यासाठी त्यांनी कवितेचे बारकाईने वाचन करण्यावर भर दिला. ही समीक्षापद्धती साहित्यकृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी केवळ ग्रंथाच्या अंतर्गत रचनेवर लक्ष केंद्रित करते. लेखक, इतिहास, समाज यांसारख्या बाह्य घटकांना ती महत्त्व देत नाही. भाषेतील गुंतागुंत, विरोधाभास आणि संदिग्धता यांचा ती बारकाईने अभ्यास करते. या पद्धतीचा मुख उद्देश साहित्यकृतीला एक स्वयंपूर्ण स्वतंत्र कलाकृती मानून तिचे विश्लेषण करणे  हा होता. या सर्वांच्या संस्कारातून सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका तयार झाली आहे.

1950 च्या दशकाच्या अखेरीस रसाळ यांचा पहिला समीक्षालेख प्रसिद्ध झाला. या लेखातून प्रकट झालेली त्यांची साहित्य विषयक सिद्धान्ताधिष्ठित भूमिका अधिक प्रगल्भ होत गेली ती जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथातील समीक्षालेखनापर्यंत टिकून राहिलेली दिसते. सैद्धान्तिक लेखनाचे सातत्य त्यांच्या सर्व ग्रंथातून प्रत्ययाला येते. एखाद्या व्यक्तीच्या मनोभूमिकेत कालांतराने बदल होण्याची शक्यता असते. मात्र सुधीर रसाळ यांची भूमिका अविचल राहिली. सुधीर रसाळ यांचे महाविद्यालयीन शिक्षक हे बहुतांशी जीवनवादी होते. मात्र सुधीर रसाळ यांच्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा आणि गंगाधर गाडगीळ यांची समीक्षा यांचा प्रभाव अधिक राहिला. कलावादी भूमिकेत काही उणिवा असल्या तरी वाङ्मय व कला यांचा विचार सौंदर्यमूल्याच्या संदर्भातच केला गेला पाहिजे आणि कलाकृती म्हणूनच कलाकृतीला स्वीकारले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे . कलाकृती ही सौंदर्यनिर्मिती आणि सौंदर्यप्रत्यय देत असली तरी तिला इतर अंगेही असू शकतात आणि त्यांचे संस्कार आपल्यावर होऊ शकतात. परंतु हे संस्कार करणं हे त्या कलाकृतीचे उद्दिष्ट असू शकत नाही असे ते आग्रहाने आजही मांडतात. समीक्षेची निर्मितिप्रक्रिया सांगताना ते म्हणतात, “माझा विचार अंतर्गतदृष्ट्या सुसंगत असतो त्याचा  तात्त्विक समीक्षेकडून वाङ्मयाकडे नव्हे तर वाङ्मयाकडून तात्त्विक समीक्षेकडे प्रवास होत असतो. किंबहुना हा प्रवास दुहेरी असतो. एकीकडे तात्त्विक समीक्षा तुम्हाला मदत करीत असते. तर दुसरीकडे तिला आव्हान देणारी कलाकृती तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते. या पद्धतीने प्रत्येक समीक्षकाचा समीक्षाविचार सिद्ध होत असतो. ही प्रक्रिया ज्या समीक्षाकाबाबत थांबते तो समीक्षक म्हणूनही थांबलेला असतो”. यातून समीक्षेतून निकष जसे सिद्ध होतात तसेच श्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती चांगल्या साहित्यकृतीचे  निकष समीक्षेला देत असते, हे डॉ.रसाळ सुचवितात. गंगाधर गाडगीळ यांच्या संदर्भात लिहिताना स्वायत्ततावाद आणि कलावाद या दोन वेगळ्या संकल्पना ते मांडतात. त्यांच्या मते स्वायत्ततावादामध्ये अशी भूमिका घेतली जाऊ शकते की, वाङ्मय हे एकप्रकारचं सत्य असतं, वाड्मयामध्ये नैतिकता असू शकते. वाड्मयामध्ये जीवनाचा अर्थपूर्ण असे दर्शन घडवलं जाऊ शकतं आणि तरीही वाङ्मय हे स्वायत्त असतं. अमेरिकेतील न्यू क्रिटिसिझमच्या चळवळीतील साहित्यविचार जसा रसाळ यांना योग्य वाटतो तसाच गंगाधर गाडगीळांचा आशयाला महत्त्व देऊन मांडलेला कलावादी विचारही त्यांना योग्य वाटतो. अशी भूमिका स्वीकारून रसाळांनी केलेले समीक्षालेखन आपल्या वेगळेपणाने नजरेस भरते. डॉ. रसाळ यांची भूमिका जिला ते स्वायत्ततावादी भूमिका म्हणतात तिचे वेगळेपण असे की सामाजिकता आणि कलावाद या भूमिका तिला परस्परविरोधी वाटत नाहीत. डॉ. सुधीर रसाळ यांची ही भूमिका ललित साहित्याला योग्य न्याय देणारी भूमिका आहे, याचा प्रत्यय येत राहतो.

—-*—–

‘संवादातून साहित्यशोध’ या प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी संपादित केलेल्या डॉ. सुधीर रसाळ यांच्या मुलाखतींच्या संग्रहाचा प्रकाशन समारंभ छ. संभाजीनगर येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा डॉ. वि.दा. वासमकर यांनी घेतलेला शोध.

—-+—-

© डाॅ. विष्णू वासमकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted