सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ शेपूट बहाद्दरांचे शेपूट – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – शेपूटबहाद्दरांनी शेपूट हलवण्याची कला, सडक छाप हीन पातळीवरून उचलून, ललित कलेच्या पातळीवर पोहोचवली, या विषयावर एक लेख लिहा. ’ वगैरे…)
आता इथून पुढे – –
शेपूटबहाद्दरांच्या महान शेपटीच्या सन्मानार्थ ‘शेपूट विद्यपीठाची स्थापना झाली.
इथे विद्यार्थ्यांना एम. फिल. आणि पी. एचडी. ची डिग्री प्रदान केली जाऊ लागली.
अनेक विद्वानांनी या विषयावर डी. लिट. ही मिळवली. बी. ए. आणि एम. ए. च्या स्तरावर ‘शेपूटबहाद्दरांची महान शेपूट’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाऊ लागली.
सरकारने शेपूट हलवण्याच्या अधिकाराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी;राष्ट्रीय शेपूट आयोगाची स्थापना केली. याला कायद्याचा दर्जा देण्यासाठी सरकारने अखिल भारतीय शेपूट हलवा; अधिकार संरक्षण विधेयक; संसदेत प्रस्तुत केले. ते शेपूट मतांनी पारीतही केलं. सरकारने संसदेच्या संयुक्त अधिवेशनात, देशात ;शेपूट-तंत्र सुदृढ करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. सर्व पक्षांचे या विषयावर एकमत झाले.
अनेक वरिष्ठ फिल्म -निर्देशकांनी अनेक भाषांमधून; शेपूटबाजीवर अनेक चांगल्या फिल्म्स बनवल्या. ज्यांना पुढे शेपूटबहाद्दरां च्या नावाचा सन्मान मिळाला.
या फिल्म्समधून दाखवली जाणारी शेपूटबाजी जनतेत अतिशय लोकप्रिय झाली.
शेपूटबाजीचे नवे नवे हातखण्डे लोकांपर्यंत पोचवण्याच्या बाबतीत या फिल्मवाल्यांचे योगदान अभूतपूर्व होते. यापैकी अनेक फिल्म्समध्ये शेपूटबहाद्दरांनी नायकाचे कामही केले.
बाजारात शेपूटबहाद्दरांचे शेपूट-मय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या महान शेपटीचा महिमा वर्णन करणारी पुस्तके, सी. डी. , आणि कॅसेट यांना पूर आला. शेपटीच्या सन्मानार्थ आरत्या आणि भजने गाऊ जाऊ लागली.
‘आम्हाला शेपूट शक्ती द्या हो, शेपूट विजय मिळवेल.
दुसऱ्याच्या शेपटापूर्वी, आमची शेपूट विजय मिळवेल.’
एक समांतर अर्थव्यवस्था अस्तित्वात आली, जी शेपूटबहाद्दर आणि त्यांच्या शेपटावर अवलंबून होती.
शेपूटबहाद्दरांच्या हलणाऱ्या शेपटीमुळे प्रेरित होऊन देशातील डॉक्टर आणि संशोधक सखोल संशोधनात गर्क झाले, की माणसाला शेपटी पुन्हा कशी उगवेल?
अनेक नवीन घोषणांचा जन्म झाला. जशा- ‘गर्वानं म्हणा, आम्ही शेपूटवाले आहोत. ’ टी. व्ही. वरती नवनवीन जाहिराती येऊ लागल्या. उदा. ; त्याची हलणारी शेपूट आपल्या शेपटापेक्षा वेगवान कशी? ‘
आपली शेपूट वेगाने हलवण्यासाठी आजच घ्या, ;शेपूटचूर्ण; ‘सगळ्या राष्ट्रात असं होऊ लागलं, की ज्यांना आपलं काम करून घ्यायचंय, ते काम करणाऱ्याच्या पायजम्यात नाडीप्रमाणे प्रवेश करू लागले. लोक आपलं काम करून घेण्यासाठी पायपुसणी बनले. दुसऱ्याच्या पायातील जोडे बनले. काम होताच असे शेपूटधारी दुसऱ्यांना ठेंगा दाखवून पसारही झाले. प्रत्येक सभ्यता आणि संस्कृती कोणत्या ना कोणत्या काळात उत्कर्षाच्या शिखरावर पोचते. सध्याच्या काळात शेपूटबाजी संस्कृती आपल्या चरम उत्कर्षावर पोचलेली होती.
या शेपटीमय वातावरणात शेपूटबहाद्दर हसले, की वसंत यायचा, ते उदास झाले की पानगळ सुरू व्हायची. शेपूटबहाद्दर खोकायचे, तेव्हा वादळ यायचं. शेपूटबहाद्दर
शिंकायचे तेव्हा, भूकंप व्हायचा. ते रडायचे, तेव्हा नद्यांना पूर यायचा. ते हसायचे, तेव्हा मोर नाचू लागायचे. ते नाराज व्हायचे, तेव्हा ढग गडगडू लागायचे. शेपूटबहाद्दर ज्या दिशेने आपली जगप्रसिद्ध शेपूट हलवत चालायचे, तो रस्ता व्हायचा. ते ज्या बाजूंनी आपली शेपूट ओढून घ्यायचे, तो भाग ओसाड व्हायचा.
या शेपूटमय वातावरणात सरकारने नोबेल पुरस्कार देणार्या समितीला शिफारस केली, की प्रत्येक व्यक्तीला शेपूट हलवण्याचा मार्ग सरळ आणि सुगम बनवण्यात श्री. शेपूटबहाद्दरांचे महत्वपूर्ण योगदान बघता, त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जावे. यामुळे नोबेल पारितोषिकाचा सन्मान वाढेल.
शेपूटबहाद्दरांपासून प्रेरणा घेऊन घेऊन आता शेपुट हलवणे, लघु आणि कुटिरोद्योग बनत चालला होता. देशातील घराघरात आता शेपूट – क्रान्ति आली होती. माणसांच्याद्वारे आपली अदृश्य शेपूट हलवण्यासाठी नवनवीन शोध लावले जात होते. आता ही गोष्ट सिद्ध झाली होती, की शेपूट हलवण्यात आपले देशवासी सगळ्या जगात अव्व्ल ठरले होते. देशासाठी ही गौरवाची गोष्ट होती.
एकदा शेपूटबहाद्दरांना शहरातील सगळ्यात प्रतिष्ठित असलेल्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. तिथे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांच्या महान शेपटीकडे मोठ्या लालसेने पाहू लागले. या ठिकाणी शेपूटबहाद्दरांनी मोठे जोरदार भाषण केले.
प्रिय विद्यार्थ्यांनो, शेपूटबाजीचा रस्ता मोठा कठिण रस्ता आहे. परंतु आपल्या आत, जर चमचेगिरी, खुशामतखोरी, जी हुजुरी ची बीजं असतील, तर आपल्याला लोणी लावण्याच्या कलेपासून कोणीच थांबवू शकणार नाही. आपण माझंच उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. माझे वडील एक साधे-सुधे प्रामाणिक शाळा-मास्तर होते. ते कुणापुढे शेपूट हलवायचं, म्हणजे पाप समजत होते. मी अशा बेकार खानदानात जन्माला आलो. परंतु अशा बिकट परिस्थितीतही मी हार मानली नाही. माझ्या आत, शेपूटबहाद्दर बनण्याची लालसा होती. मी निष्ठापूर्वक शेपूट हलवण्याच्या सन्माननीय कामाला जुंपलो. आपल्या पित्याच्या बेकार मूल्यांच्या विरुद्ध जाऊन मी शेपूटबाजीचा मार्ग चोखाळला. यामुळे माझे वडील नाराज झाले. पण मी शेपूटबाजीच्या महान कार्यासाठी वडलांबरोबरचे संबंध संपुष्टात आणले. माझ्या वडलांना आऊटडेटेड आयडियालिझमचा किडा चावला होता. ते सुधारू शकत नव्हते. त्यामुळे मी माझा मार्ग स्वतः तयार केला.
दिवस- रात्र मी शेपूट हलवून हलवून, येणाऱ्या समस्यांवर कल्पकतेने नाविन्यपूर्ण तोडगा काढत पुढे गेलो. आपणही माझ्याप्रमाणेच अवसरवादी बना. शेपूट हलवा आणि नाव कमवा. ’
मुलाना शेपूटबहाद्दरांच्या शेपटाविषयी विलक्षण आदर वाटू लागला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण एकाकी अचानक अनर्थ ओढ़ावला. आपलं उपदेशपार भाषण करून शेपूटबहाद्दर जसे सभागृहच्या बाहेर पडले, तशी ही दुर्घटना झाली. पापणी लवते न लवते तोच हे प्रकरण झालं. काही लोक यासाठी शेपूटबहाद्दरांच्या विरोधकांना जबाबदार धरतात. त्यांचं म्हणणं, शेपूटबहाद्दरांच्या विरोधकांनी दहावीच्या काहीं मुलांना पैसे देऊन त्यांच्याकरवी हे काम केलं गेलं विरोधी लोक या गोष्टीचं खंडन करतात. ते म्हणतात, आमचा या घटनेशी काही संबंध नाही. ’ सत्य एवढच आहे, की जो अनर्थ व्हायचा तो झालाच.
अस झालं की, शेपूटबद्दर ऑडिटोरियमच्या बाहेर पडले आणि अर्थशास्त्राच्या वर्गातील मुलांनी त्यांची शेपटी धरून जोरात ओढली आणि… ती महान विश्वप्रसिद्ध शेपूट, शेपूटबहाद्दरांच्या शरीरातून निघून त्या मुलांच्या हातात आली.
सगळे सुन्न झाले. हे राम! हे काय झालं? तेव्हा कुठे हे रहस्य उलगडलं, की इतकी वर्षे शेपूटबहाद्दर एक विशेष प्रकारची रबराची नळी, नकली शेपूट लावून फिरत होते आणि अवघ्या विश्वाला फसवत होते. मग काय? सगळ्या देशात हलकल्लोळ माजला. त्यामुळे झालेल्या अतीव दु:खामुळे काही लोकांनी आत्महत्या केली. अनेक ठिकाणी तोड-फोड झाली. आगी लावल्या गेल्या. सगळा देश हलला. हे तर होणारच होतं. जेव्हा कुठे मोठी शेपूट पडते, तेव्हा पृथ्वी हालते. सारं विश्व डळमळतं.
शेपूटबहाद्दरांच्या विरोधकांनी म्हंटलं, ‘आम्हाला पहिल्यापासूनच माहीत होतं की शेपूटबहाद्दरांना शेपूट उगवणं हे सगळं प्रकरण म्हणजे खूप मोठा फ्रॉड आहे. या सगळ्या आरडा-ओरड्यात त्या व्यक्तीचं म्हणणं न ऐकल्यासारख केलं गेलं. एका टी. व्ही. चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘शेपूट तर सगळ्याच, खुशामतखोरांना, हांजी हांजी करणार्यांना, चमच्यांना असते. पण ती अदृश्य असते.
दिसत नाही. शेपूटबहाद्दरांच्या शरीरावर उगवलेली शेपूट त्या अदृश्य शेपटांचं प्रगटीकरण तेवढं होतं.’
– समाप्त –
मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय
मो: 8512070086
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






शेपूट बहाद्दूर, अनोखी कल्पना,अनोखा लेख.भावानुवाद खूप छान साधला आहे