सौ. वंदना अशोक हुळबत्ते
जीवनरंग
☆ मोबदला… भाग – १ ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
तिन्हीसांजेच्या वेळी सुधा गॅलरीत खुर्ची टाकून बसली होती. गावाकडच्या सारखी घरट्याच्या ओढीने परतणारी पाखर तिला शहरात कुठे दिसतं नव्हती. दिवसभर रानात चरून घरी परतनारी जनावरे… त्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज तिला इथे ऐकू येत नव्हता. डोंगरा आड जाणारा तो पिवळसर तांबूस सूर्याचा गोळा तिला इथे कुठे दिसतं नव्हता. दिसत होती फक्त रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि घाईघाईने घरी परत जाणारी माणसे. या मोठ्या शहरांतील माणसांना घाईगडबडीचा शापच असतो की काय? बघावं तेव्हा ही माणसं गडबडीत असतात. त्यांच्याजवळ जरा मोकळा वेळ नाही. प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर चालतो. हा विचार सुरू असतानाच
” सुधा… सुधा… ” अशी हाक ऐकू आली “आले….. आले…. ” म्हणत ती खुर्चीतून सावकाश उठली. हळूहळू पावले टाकत घरात गेली.
“पाणी…. पाणी.. ”
“आले…. आले…. जरा… धीर… धरा.. ” भांड्यात पाणी घेऊन सुधा काॅट जवळ आली. ” हंं.. आ… करा… ” राघवने मोठ्या मुश्किलीने आ केले. हळू हळू पाण्याचे चार घोट पाजले. जवळच्या नॅपकिनने तोंड पुसले. “अजून काही हवा आहे का? “
राघव मानेने नको म्हणाला. जवळच्या खुर्चीत बसत सुधाने ‘जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है ‘ राघवचे आवडते गाणं मोबाईल वर लावले. या गाण्या भोवती अनेक आठवणी होत्या. त्या आठवणीत हरवताच तिला डोळा लागला. दारावरच्या बेलने तिची झोप मोड झाली. तिने दार उघडले. मधु आला होता.
” काय म्हणतात आमचे यंगमन? कशी काय आहे तब्येत? ”
” आज सकाळपासून झोपून आहेत बघं. “
” आता बोलतं करतो त्यांना. बोला जेवायला काय करू? बाय द वे दुपारचा डबा वेळेत मिळतो ना? “
” तू सोय केलीस म्हटल्यावर शंका नाही. बरं गरम गरम खिचडी कर. आज तूप मेतकूट खिचडी खाऊ. तू रोज येऊन गरम खायला करतोस. गरम खायची सवय लावली आहेस तू. कोणत्या जन्मीचे पुण्य केले म्हणून. तुझे… “
” उपकार पुराण चालू होणार असेल तर मी निघतो… तू… “
“मला तसं म्हणायचं नव्हतं. “सुधाच्या डोळ्यात पाणी आले. तसा मधु जवळ आला त्याने सुधाचे डोळे पुसले ” मी इतका परका आहे का? ” सुधाने त्याला जवळ घेतले. ” तू आहेस म्हणून आम्ही चार दिवस चांगले बघतं आहोत. श्री ची तर आशा केव्हाच सोडली आहे. तू त्या दिवशी वेळेला धावून आलास म्हणून हे आज दिसतात. नाही तरी… मी आज कुणाच्या तोंडाकडे बघित असते. “
” बोलून पोट भरणार असेल तर मी निघालो घरी. ” असं म्हणत मधु बाहेर जायचे नाटक करतो. मग स्वयंपाक घरात शिरतो.
सुधाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आज घडल्या सारखा उभा राहतो. सुधा आणि राघव बॅकेतून पैसे काढून बाहेर पडले रिक्षा घेण्यासाठी एकमेकाच्या साथीने रस्ता क्रॉस करत असताना भरधाव गाडीने दोघांना उडवले. जेव्हा शुध्द आली तेव्हा सुधा हॉस्पिटलमध्ये होती. शेजारी राघव नव्हता मधु होता. राघवच्या डोक्या मार लागला होता. शस्त्रक्रिया करावी लागली होती. मधुने आम्हीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्याच्या प्रसंगावधान मुळे आम्ही दोघे जिवंत होतो. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यानेच घरी आणले होते. स्वतःच्या मुलापेक्षा जास्त काळजीने त्याने सगळं केलं. तो घरातील प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होता. आधार देत होता. अपघात झाल्यावर श्री ला फोन केला होता. तो कुठल्यातरी महत्वाच्या प्रोजेक्टसाठी आऊट ऑफ स्टेशन होता. मला वेळ मिळाला की मी येऊन जाईन असा मेसेज त्यांनी पाठवला तेव्हा पहिल्यांदा मला असे वाटले आपण न घर का न घाट का झालो. दोष कुणाला देणार? आता बोलून उपयोग काय? गप्प बसण्या शिवाय पर्याय नव्हता. वीस वर्षा पूर्वी आपण घेतलेल्या निर्णयांचा हा परिणाम होता. ती घटना ही डोळ्या समोर ताजी झाली.
“मला वाटते आई आप्पा तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर शहरात यावं. आता तुमचं वय झालं आहे. इथं राहून काय करणार? नातवंडां सोबत राहिलात तर तुमचा वेळ चांगला जाईल. आपण एकमेकांन सोबत असू. माझ्याबरोबर येण्यात तुम्हाला काय अडचण आहे? ” श्री बाबांना शहरात येण्यासाठी तयार करत होता.
“तुझं हे म्हणणं मला पटत नाही. अरे आमचं आयुष्य गावात गेलं. आम्ही दोघे कुठे आहोत? जिवाभावाची चार माणसं आमच्या शेजारी आहेत. इथं शेतीवाडी आहे, गुरढोर आहेत. आमचं मन इथे चांगलं रमत. या गावाशी आमची नाळ जुळली आहे. शहरात येऊन आम्ही काय करणार? शहरात आम्हाला कोण ओळखतं? आम्ही तुझ्याबरोबर अजिबात करणार नाही. “
“तुम्ही इथं मी तिथं. माझं लक्ष तुमच्यावर कसं राहणार? मला तुम्ही दोघे हवे आहात. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करू दे. “
“आहो… मी काय म्हणते… श्रीच्या बोलण्याचा विचार करा. मलाही नातवंडा बरोबर राहायच आहे. ” लेकाची बाजू आईने उचलून धरली.
“तुला जायचं असेल तर तू जा. मी काही गाव सोडून येणार नाही. इथं त्याच्या वाचून आपलं काही अडत नाही. शहरात जाऊन नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ तुझ्यावर येईल तेव्हा मला दोष देऊ नकोस. “असे म्हणत आप्पा घरा बाहेर गेले. आप्पांचा हा निर्णय ऐकून श्री निराश झाला.
रात्री जेवताना कोणीच कोणाशी बोलले नाही. दुसऱ्या दिवशी श्री न बोलताच निघून गेला. ही गोष्ट आईच्या जिव्हारी लागली. नवऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न केला पण ते काही तयार होईनात. तेव्हा सुधाने आपले शेवटचे अस्त्र बाहेर काढले. म्हणजे अबोला धरला. शेवटी आप्पांना माघार घ्यावी लागली. शेतीवाडी घरदार विकून शहरात लेकाकडे राहायला गेले.
शहरातील एका उंच इमारतीत श्रीचा फ्लॅट होता. सर्व सुविधानी परिपूर्ण असे एक मोठे बंदिस्त घर. जमीनीशी जरा ही संबंध नाही. सुधाला, राघवला या घरात बांधल्या सारखे झाले पण मुला खातर जुळवून घेतलं. नातवा बरोबर हळूहळू आप्पांची चांगली कट्टी जमली. आई आप्पांना खुष बघून श्रीला खूप आनंद वाटला. आनंदाचं झाड आगंणात बहरलं आहे असं श्री ला वाटले.
सगळं सुरळीत सुरू असताना एके दिवशी श्री हातात बुके आणि मिठाईचा बॉक्स घेऊन घरी आला. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. तो खूप खुष दिसत होता. आल्या आल्या आई आप्पांना नमस्कार केला.
“आप्पां आज माझे स्वप्न पूर्ण झालं. मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. ऑफिस मला जर्मनीला पाठवत आहे. “
“बाळा आम्हाला तुझा अभिमान वाटतो. कमी वयात हे यश तू मिळवलंस. “असं म्हणत आईने त्याच्या तोंडावरून हात फिरवत मुका घेतला. त्याला आशीर्वाद दिला. तो दिवस खूप आनंदात गेला.
– क्रमशः भाग पहिला
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





