श्री दिवाकर बुरसे

??

☆ इयर एण्ड आणि न्यू इयर सेलिब्रेशन… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

इसवी सन २०२५ चा अखेरचा महिना… डिसेंबर बघता-बघता संपेल आणि २०२६ हे नवं वर्ष उजाडेल. जगभरात नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे.

परवा सोसायटीतली मुलं आली, म्हणाली,

“आजोबा! सोसायटीला २५ वर्षं पूर्ण होतायत. म्हणून यंदाचं इयर-एण्ड, ख्रिसमस आणि न्यू इयर आम्ही जरा हटके सेलिब्रेट करायचं ठरवलंय! मेंबर्सकडून कलेक्शन चाललंय. तुम्ही किती देणार? ”

हसलो, “कल्पना उत्तम आहे. वर्गणी नक्की देईन… पण एक सूचना आहे, समारंभ ख्रिसमसला नको, आपल्या नववर्ष म्हणजे पाडव्याला करू या का? कारण आपलं ‘भारतीय’ नवसंवत्सर तर चैत्र प्रतिपदेपासून सुरू होतं. इंग्रजी वर्षाचा शेवट ३१ डिसेंबरला असतो, पण ती त्यांची कालगणना, आपली नाही.”

साकेत म्हणाला, “पण आजोबा, जगभर डिसेंबरच वर्षाचा शेवट मानतात! ”

“हो रे! कारण इंग्रजी कॅलेंडर जगभर लोकप्रिय झालंय. का? तर एकेकाळी ब्रिटिश राजवट जगात सर्वत्र पसरली होती. ‘ज्यावर सूर्य मावळत नाही’ असं त्यांच्या साम्राज्याबद्दल म्हटलं जायचं. त्यामुळे त्यांच्या ख्रिस्ती कालगणनेचा प्रसार जगभर झाला. आता ते साम्राज्य कुठं उरलंय? तरीही ही कॅलेंडरपद्धती ‘गुलामगिरीच्या जुन्या खुणां’ जगभर टिकून आहेत. ”

मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल!

मयूर म्हणाला, “ओss, म्हणजे हे इंग्रजी कॅलेंडर आहे तर! ”

प्रिया चकित. “म्हणजे आपलं कॅलेंडर वेगळं? म्हणजे चैत्र, वैशाख असतं तेच काय? ”

साकेतचा उत्सुक प्रश्न, “आजोबा, इंग्लिश महिन्यांची नावे कशी पडली? अर्थ काय? ”

मीही उत्साहात—“अगदी सांगतो! आधी इंग्रजी कॅलेंडर समजू न घेऊ, मग आपलं. चालेल? ”

“वाss आजोबा, चालेल काय, पळेल! ”

सगळी मुलं पुढे सरकली.

इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर

पोप ग्रेगरी १३ वे यांच्या नावावरून ‘ग्रेगोरियन’ कॅलेंडर नाव पडलं. याचंच पुढे ‘न्यू स्टाईल’, ‘ख्रिस्ती’ किंवा ‘इंग्रजी’ कॅलेंडर असं नाव पडलं. आता यातील महिन्यांची नावं आणि त्यांचे अर्थ झटपट पाहूया…

इंग्रजी महिन्यांची नावे व अर्थ

१) जानेवारी (January)

लॅटिन Janurius →रोमन देव Janus (दोन तोंडे—मागे-पुढे पाहणारा). म्हणून नवीन वर्षाकडे पाहत जुने वर्षही आठवण्याचे प्रतीक.

२) फेब्रुवारी (February)

लॅटिन Februarius → ‘शुद्धीकरण’. रोमन लोक या महिन्यात प्रायश्चित्त आणि आत्मशुद्धीचे विधी करीत.

३) मार्च (March)

मार्स—युद्धदेव. या महिन्यात दिवस-रात्र समसमान होण्याचा काळ.

४) एप्रिल (April)

लॅटिन Aperire → उघडणे/उमलणे. युरोपात वसंताची चाहूल.

५) मे (May)

वसंतदेवी Maia हिच्या नावावरून.

६) जून (June)

देवी Juno—गृहस्थी आणि विवाहाची संरक्षिका.

७) जुलै (July)

ज्युलियस सीझरच्या जन्मामुळे त्याच्या नावावरून.

८) ऑगस्ट (August)

आगस्टस सीझरने स्वतःच्या नावावरून दिले.

९) सप्टेंबर (September)

लॅटिन Septem—सात (जुन्या रोमन कॅलेंडरात हा सातवा महिना असे).

१०) ऑक्टोबर (October)

Octo—आठ.

११) नोव्हेंबर (November)

Novem—नऊ.

१२) डिसेंबर (December)

Decem—दहा.

“कळलं ना? ”

कौस्तुभ—हो आजोबा, भारी! ”

मी: “आता भारतील कालगणा समजून घेऊ”.

भारतीय कालगणना

मी पुढे सांगू लागलो—

“आता आपलं भारतीय पंचांग—ह्यातली नावं खगोलशास्त्रावर आधारित आहेत. ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते, त्यावरून मासाचे नाव. ”

भारतीय महिने व नक्षत्रे

चैत्र – चित्रा

वैशाख – विशाखा

ज्येष्ठ – ज्येष्ठा

आषाढ – पूर्वाषाढा/उत्तराषाढा

श्रावण – श्रवण

भाद्रपद – पूर्वाभाद्रपदा/उत्तराभाद्रपदा

अश्विन – अश्विनी

कार्तिक – कृत्तिका

मार्गशीर्ष – मृगशीर्ष

पौष – पुष्य

माघ – मघा

फाल्गुन – पूर्वा/उत्तरा फाल्गुनी

“हे बघा, ही मांडणी तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि लक्षात ठेवायला सोपी वाटते ना? ”

मी तिथी समजावू लागलो—

“सूर्यापासून चंद्र १२° सरकला की एक तिथी. अमावस्या म्हणजे सूर्य-चंद्र एकत्र—‘अमा’+‘वस’ म्हणजे जवळ राहणं. दोन पक्ष—शुक्ल (चांद्रकला वाढते) आणि कृष्ण (कला कमी होते). ”

तिथी, पक्ष, पौर्णिमा—सगळं मुलांना अचंबित करून गेलं.

“वार कसे ठरतात? ”

अक्षयचा प्रश्न— ही होरा काय भानगड आहे आजाबा? ”

मी हसलो— “‘अहोरात्र’ मधून ‘हो’ आणि ‘रा’ घेतलं की होतो—होरा! सूर्योदयाचा पहिला होरा ज्या ग्रहाचा, त्या ग्रहावरून दिवसाचं नाव पडलंय —

रवि रविवार

सोम सोमवार

मंगळ मंगळवार

बुध बुधवार

गुरु गुरुवार

शुक्र शुक्रवार

शनि शनिवार

वार रात्री २ ते २:३० या काळात बदलतो—हे वेगळंच वैज्ञानिक वैशिष्ट्य! ”

संवत्सर

भारतीय संवत्सरांची नावं—प्रभव, विभव, शुक्ल… अशी साठ. अशा ६० वर्षांचा संच पूर्ण झाला की पुन्हा पहिलं वर्ष—‘प्रभव’ येतं.

शालिवाहन शक + ७८ = इसवी सन.

शेवटी मी म्हणालो—

“मित्रांनो, आपली कालगणना जगातली सर्वश्रेष्ठ का म्हणतात, ते समजलं? त्यामुळेच नववर्ष पाडव्यालाच साजरं करावं असं मी म्हणालो! ”

मुलं एकाचवेळी— “होss एकदम पटलं आजोबा! ”

सोसायटीचा रौप्यमहोत्सव चैत्र प्रतिपदेलाच साजरा करायचं एकमतानं ठरलं. विराजने माझ्या नावाची ५०१ ची पावती हातात देत म्हटलं—

“थँक्यू आजोबा! सी यू इन द कमिंग न्यू इयर… ‘ पराभव नाम संवत्सर, शालिवाहन शक १९४८! बाय! ”

सगळी मुलं खिदळत निघाली… आणि माझं मन भरून आलं!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted