श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “चढदी कला” ☆ श्री संभाजी बबन गायके

पंजाबला पूर काही नवा नसला तरी गेल्या ३७ वर्षांत एवढा मोठा विनाशकारी पूर पंजाबने अनुभवला नव्हता. परंतु संकटे अनुभवण्यात आणि त्यांचा सामना करण्यात पंजाब नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहिलेला दिसतो! याचे कारण आहे त्यांनी अंगीकारलेली विचारसरणी. विपरीत परिस्थतीतही मानसिक संतुलन टिकवून ठेवणे, संकटाला मोठ्या काळजाने सामोरे जाण्याची त्यांना गुरुंनी दिलेली शिकवण ते प्रत्यक्ष आचरणात आणताना दिसतात.

श्री गुरु गोविंदसिंग यांचे चार पुत्र.. साहिबजादे… त्यातले दोन मुगलांविरुद्धच्या धर्मयुद्धात वीरगती प्राप्त करते झाले तर अन्य दोघांना भिंतीमध्ये चिणून मारले गेले. ही बातमी गुरुजींच्या कानांवर पडली तेंव्हा ते शोकाकुल झाले नाहीत… आपली मुले धर्मरक्षणाच्या कामी आली याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले.. हे अतिशय प्रेरणादायी आहे.

पंजाबी भाषेत चढदी शब्दाचा अर्थ आहे उन्नत होत जाणारी आणि कला म्हणजे ऊर्जा! या शब्दाचा खरा अर्थ आहे तो म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक मन:स्थिती. गुरु नानक देव म्हणतात… नानक नाम चढ़दी कला तेरे भाने सरबत दा भला! अर्थात परमेश्वराच्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण होते!

चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो, त्याचे तेज उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहते… तशी माणसाने मन:स्थिती ठेवावी. संकटे येतात तशी जातात… पौर्णिमेनंतर चंद्र क्षीण क्षीण होत जातो तसा तो पुढे वर्धिष्णूही होत राहतो. वनवासाच्या काळात सीख सैनिकांनी केवळ भाजलेले चणे खाऊन दिवस काढले आणि त्या चण्यांना ते बदाम म्हणत. घोड्याच्या रिकिबी यालाच ते आपले घर संबोधत असत.

संकटात, युद्धात पंजाबी मनांची असाधारण सहनशक्ती जगाने अनुभवली आहे. पंजाबी कुणापुढे हात पसरण्याच्या नेहमी विरोधात असतात. आताच्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेक पंजाबी कलाकार, व्यावसायिक स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले दिसतात. रेल्वे कोचमध्ये लागणारे भाग बनवणा-या कारखान्यात आठवडाभरात तब्बल शंभर बोटी बनवण्यात आल्या ज्या सातशे किलो वजन वाहून नेऊ शकतात.. यासाठी मालक प्रीतपाल सिंग हंसपाल यांनी एक पैसाही आकाराला नाही. क्रिकेटपटू युवराज सिंग याने ४२ कोटी रुपये किंमतीचे ६०० Tractotors मोफत देऊ केले आहेत. गायक करण औजला याने त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाची सर्व जमा रक्कम पूरग्रस्त निधीत देण्याची घोषणा केली. रामसिंग राणा यांनी त्यांच्या पाच हॉटेल्सचे एक वर्षाचे सर्व उत्पन्न निधीत देऊ केले आहे. ही रक्कम दोन कोटी पर्यंत जाईल. कॅनडा मधील खाजगी रेडीओ केंद्रांनी मोठी रक्कम जमवली आहे. ही यादी मोठी आहे.. आणि त्यात आणखी भर पडत चालली आहे. केंद्रसरकारने सुद्धा नुकतीच १६०० कोटी रुपयांची साहाय्य राशी घोषित केली आहे.

देशातील आणि देशातील इतर बातम्या जास्त प्रसिद्ध होत गेल्याने पंजाब मध्ये आलेल्या या आपत्तीकडे उर्वरीत देशाचे फारसे लक्ष गेल्याचे दिसत नाही. असो. देशाच्या अन्नाच्या आणि संरक्षणाची मोठी जबाबदारी नेटाने पार पाडत असलेल्या पंजाबसोबत देशाने उभे राहायला पाहिजे, असे वाटते.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted