श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ जनकवी पी. सावळाराम… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
जनकवी पी. सावळाराम – –
*सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणीचे* निवृत्तीनाथ रावजी पाटील, आपण सारे त्यांना जनकवी पी. सावळाराम म्हणून ओळखतो.
जनकवी, ही पदवी कुसुमाग्रजांनी पी. सावळाराम यांना दिली. सावळाराम ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. स्वत:च्या कवितांवर मतं मिळवून नगराध्यक्ष पद मिळविणारा हा जगातला पहिला कवी. एकदा मुलाखत देताना ते म्हणाले होते, “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का? , जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. ’‘ या एका गीताच्या अफाट लोकप्रियतेवर मी ठाण्याचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे, ’ आणि ते खरेच होते. वि. स. पागे आणि ते जवळचे मित्र होते. पागेसाहेबांना ह. ना. आपट्यांच्या एका कादंबरीतल्या सावळया या व्यक्तिरेखेबरोबर त्यांचे साधर्म्य वाटे आणि ते त्यांना *सावळया* नावानेच हाक मारत असत. पुढे तेच नाव रूढ झाले.
*ठाण्यात पूर्वी मेंटल हॉस्पिटल* होते आणि सावळाराम मूळचे *येडेनिपाणीचे* म्हणून ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाल्यावर गदिमा गमतीत म्हणाले *येड्याचा* पाटील *ठाण्याचा* नगराध्यक्ष झाला.
पी. सावळाराम यांच्या गाण्यातून स्त्री-सुलभ भावना प्रभावीपणे व्यक्त झाल्या. त्यांची गाणी एकाहून एक सुंदर आहेत. त्यापैकी स्त्रीचं अवघं भावविश्व एका महत्वाच्या घटनेवर आधारीत असतं, ती घटना म्हणजे तिचं लग्न आणि पुढचं आयुष्य. स्त्री मनाची हळुवार रूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गाण्यातून दिसतो.
त्यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यातून स्त्रीच भावविश्व साकारणाऱ्या गाण्यांची यादी तयार करताना मी चकीत झालो. गाण्याची ओळ वाचली की प्रत्येकाची मान डोललीच पाहिजे.
*चला तर, करूया सुरवात*
मुलगी मोठी झाली, यौवनात पदार्पण करताना सारखं आरशापुढे उभं राहून स्वतःच्या प्रतिबिंबाला न्यहाळतांना ती म्हणते
*ओळख पहिली गाली हसते, *
*सांग दर्पणा कशी मी दिसते*
अशातच एक दिवस तिला तिचा जिवलग भेटतो. दोघे एकमेकांकडे तिरके कटाक्ष टाकू लागतात, अंतरीची खूण पटल्यावर दोघेजण एकमेकांना म्हणतात
*हसले आधी कुणी तू का मी*
मग सुरु होतो प्रेमाचा सिलसिला आणि सारं जग तिला सप्तरंगी दिसायला लागत, तिला स्वप्नातला राजकुमार भेटला आहे म्हणून ती म्हणते
*हसले ग बाई हसले अन कायमची मी फसले*
आता तिने इतके म्हटल्यावर तिचा तो राजकुमार देखील तिला उत्तर देताना म्हणतो
*मानसीचा चित्रकार तो, *
*तुझे निरंतर चित्र काढतो*
दोघांचेही प्रणयाराधन जोरात सुरु असताना तिच्या कल्पनेला रोज नव नवीन धुमारे फुटू लागतात आणि ती गाणी म्हणू लागते
*गंध फुलांचा गेला सांगून*
*भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा, गा रे कोकिळा गा*
*कोकीळ कुहू कुहू बोले*
*जिथे सागरा धरणी मिळते*
तो ही काही कमी नाही त्याने देखील गाण्यातच तिला उत्तर दिले
*मनात नसता तुझ्या गडे, *
*नकळत का मग असे घडे*
मग रीतसर पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आणि लग्न नक्की झालं, मग काय तिच्या बहिणी तिला म्हणू लागल्या
*गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, *
*फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला ग दारी*
आता तिला देखील तिकडचे वेध लागले आहेत म्हणून ती म्हणते आहे
*लेक लाडकी या घरची*
*होणार सून मी त्या घरची*
बघता बघता आतुरतेने वाट बघत असलेला तो दिवस उजाडला आणि लग्न लागले, त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, त्यामुळे आनंदून गेलेली ती नवोढा पत्नी, त्याला म्हणतेय
*गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणि बांधले, *
*जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले*
आता पुढचा विधी म्हणजे सप्तपदी, एकमेकांना सात जन्म सोबत करण्याचे आश्वासन देताना ती म्हणते आहे, सात जन्मच काय, आपले नाते तर शंभर जन्मांचे आहे आणि म्हणते,
*सप्तपदी हे रोज चालते, *
*तुझ्या सवे ते शतजन्मीचे हो माझे नाते*
सप्तपदी झाल्यावर सर्वार्थाने त्याची झालेली ती आतुरतेने त्याला म्हणते, मी माझा हात विश्वासाने तुझ्या हातात दिला आहे, आता पुढची सगळी वाटचाल तू म्हणशील तशी करू असे सांगताना म्हणते
*चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते, नेशील तेथे येते*
लग्न झाले आता वेळ आली लेकीची पाठवणी करण्याची. लाडात वाढवून मोठ्या केलेल्या लाडक्या लेकीला जड अंतःकरणाने निरोप देणारी आई स्वतःच्या डोळ्यातले अश्रू थोपवून लेकीला सांगते आहे.
*गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का? , *
*जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा*
नवी नवरी माहेर सोडून सासरी आली, सारे काही तिच्या मनाजोगे झाले असले तरी, सासरच्या इतर माणसांबरोबर आणि खास करून सासूबरोबर आपले छान जुळेल ना, या विचाराने कावऱ्या बावऱ्या झालेल्या सुनेला आश्वस्त करताना प्रेमळ सासू सुनेला सांगते आहे, मला तुझ्या मनीचे काहूर कळले आहे, पण अजिबात काळजी करू नकोस, मी देखील मुलीची आई आहे आणि काही वर्षांपूर्वी सून म्हणून या घरी आले होते, आता मी तुझी आई होईन आणि तू देखील माझी मुलगीच हो असे सांगताना सासूच्या ओठी शब्द आले.
*लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी, *
*मुली तू आलीस अपुल्या घरी*
सासरच्या घरातला तिचा पहिलाच दिवस आणि येणाऱ्या रात्रीची आतुरतेने वाट बघणाऱ्या त्या प्रियेला आसुसून ओढ लागते आणि ती म्हणते
*आली हसत पहिली रात, *
*उजळत प्राणांची फुलवात*
रात्र सरली, पहाटेची शुक्राची चांदणी उगवली आणि गात्रा गात्रातून तृप्त झालेली ही ललना गुणगुणते
*माझिया नयनांच्या कोंदणी, *
*उमलते शुक्राची चांदणी*
*सुख येता माझ्या दारी, *
*सुखासवे तो उदया येईल, *
*दिन सोन्याचा संसारी*
*हृदयी जागा तू अनुरागा, *
*प्रीतीला या देशील का? *
आता उजाडायला लागले, साऱ्या घराला हलके हलके जाग येऊ लागली आहे. पहाटवारा अंगणातल्या प्राजक्ताला मिठी मारतोय त्यामुळे अंगणभर प्राजक्ताचा सडा पडला आहे, आणि तिच्या ओठी भूपाळीचे सूर येतात
*उष:काल झाला, उठी गोविंदा, उठी गोपाळा, *
*हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला*
लग्न होऊन थोडे दिवस झाले, बघता बघता श्रावण महिना आला सुद्धा आणि मंगळागौरीचे व्रत करून, पतीसाठी दीर्घायुष्य मागताना देवीची प्रार्थना करताना ती म्हणते
*जयदेवी मंगळागौरी, सुवासीन मी तुला पूजिते*
आता तिला वेध लागले आहेत दिवाळीचे. भाऊबीजेला भाऊ येणार म्हणून आनंदित झालेली बहीण म्हणते आहे
*आली दिवाळी आली दिवाळी, *
*घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली*
*मी नाही कुणाची, नाही नाही कुणाची, *
*मी आज बहीण हो भावाची*
कालांतराने नव्या पाहुण्याचे घरी आगमन होते, त्या आनंदात आई झालेली ती, बाळाला सांगतेय
*बाळा होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई*
पाठोपाठ बारशाचा दिवस आला. बोलावलेल्या सख्या जमल्या आणि सगळ्या गाऊ लागल्या
*कुणी गोविंद घ्या, *
*कुणी गोपाळ घ्या, *
*या ग सयांनो, या ग या*
बाळाची पावले सगळ्या घरभर दुडदुडू पडतायत, त्यामुळे आनंदी आनंद आहे, तो आनंद साजरा करताना ती मायाळू माता म्हणते
*कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी*
सासरी ती आता रूळली आहे तिच्या बऱ्याच इच्छा आकांक्षा पुऱ्या झाल्या आहेत, आता आपले घर कसे असावे याचे संकल्प चित्र आता तिच्या डोळ्यापुढे येत आहे ते गाण्यातून सांगताना ती म्हणते
*असावे घर ते अपुले छान*
आजचे लिखाण बरेच लांबले आहे याची जाणीव आहे, पण वाचताना कुणीही कंटाळणार नाही याची देखील खात्री आहे. आता लेखाच्या शेवटाकडे जाताना, जीवनातली कृतार्थता अनुभवताना देवाजवळ देखील तिने स्वतःसाठी काही न मागता तिच्या बाळासाठी मागणे मागितले.
*देव जरी मज कधी भेटला*
*माग हवे ते माग म्हणाला*
*म्हणेन प्रभू रे माझे सारे*
*जीवन देई मम बाळाला*
स्त्रीमनाचे पैलू उलगडून दाखवताना सावळारामांनी अशी वेगवेगळी गाणी लिहिली. या गाण्याचं संकलन करताना मी थक्क झाले होते. वाचताना तुमची भावना देखील वेगळी असणार नाही.
– – अशी ही ‘ स्त्री’ च्या जीवनाची वयानुरूप वाटचाल एकाच भावकवीच्या कवितांतून!
आजचा अख्खा लेख म्हणजे गाणं, गाणं आणि गाणं. पण सगळीच गाणी एकाहून एक सुंदर
… निवृत्ती रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम यांना विनम्र अभिवादन..
┉❀꧁꧂❀┉
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






