सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ मागे वळून पाहताना…! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज एक जानेवारी 2026! नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस! आता सत्तरी ओलांडल्यावर वाटतं,’ वर्षा मागून वर्षे गेली, ऋतू मागूनी ऋतू, जिवलगा… ‘जिवलगा बरोबरचं आयुष्य संपलं! पण जगायचं तर शिल्लक उरले. ते तर जगलं पाहिजे आणि ते ही आनंदात जगायचंय!

आयुष्यात करायचं ते सर्व करून झालं!

बालपण, तरूणपण आणि वृद्धावस्था तिन्ही भोगून झाल्यानंतर आता एक प्रकारची निवृत्ती आलेली असते. आताचे 70 ते 80 वयाचे लोक वृद्ध म्हणत नाहीत तर ज्येष्ठ म्हणतात!

माझे एक दीर म्हणत, “आयुष्याचा ग्रंथ तर संपत आलाय! उपसंहार राहिला आहे. आता हा ग्रंथ कधी संपणार याची वाट बघायची.

पण ग्रंथापेक्षा उपसंहार च अधिक मोठा चालला आहे! त्याची किती पाने उरली आहेत देव जाणे! अशीही उपसंहाराची फेज आता माझ्याही आयुष्यात आली आहे. काही करायचं तर उमेद वाटत नाही, शरीर साथ देत नाही किंवा मूड लागत नाही! भोवतीचे विश्व त्याच्या त्याच्या गतीत चालू आहे. आपल्या असण्याने- नसण्याने त्यात काही फरक पडत नाही!

मागे वळून पाहताना…! ।काळ काट्याच्या चक्रावरचे बिंदूमात्र आपले जीवन जिवाची क्षणभंगुरता अधिकच जाणवून देते!

उपसंहार म्हणजे कादंबरीचा शेवटचा भाग असं आपण म्हणतो, तो आधीच्या भागांशी निगडित तर असतो पण ती एक अलिप्तता येण्याची किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट करण्याची अवस्था असते.. संसारातून अलिप्तता येणे अनेकांना चटकन जमत नाही. ती एक हळूहळू चालणारी प्रोसेस असते.

अशावेळी मन अलिप्त करताना अळवावरचे पाण्याचे थेंब जसे सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकतात, तसे हे आठवणींचे टपोरे मोती चमकून उठतात! पण ते

क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात.

मागे वळून पाहताना आठवतात ती कित्येक नवीन वर्ष! पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी हे Happy New

Year चे प्रस्थ आतासारखं

रंजक नव्हतं! चैत्र पाडवा ही

आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असे. जानेवारी सुरू झाला की शालेय आयुष्या नुसार नवीन वर्षाची सुरुवात विविध संकल्पनांनी होत असे. रोज इतका अभ्यास करेन, शुद्धलेखन काढेन, व्यायाम करेन किंवा संक्रांत आली की मित्र मैत्रिणीं बरोबरची जुनी भांडणे तिळगुळ देऊन सोडवेन इतकंच काय ते!

नंतरच्या कॉलेजच्या सोनेरी दिवसात नवीन वर्ष नवीन आशा आकांक्षांचे रावे घेऊन येई. ते रंगीबेरंगी रावे उडत-बागडत आपल्याला रमवत असत!

पुढे लग्न झाल्यानंतर संसारात पडले की प्रत्येक वर्ष नवीनच काहीतरी संकल्प घेऊन येत असे.. मग मुलांसाठी त्यांचे प्रकल्प आखावे लागत, बारापर्यंत जागायचं,केक करायचा,वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ करायचे, एखादी छोटीशी थंडीची ट्रिप आखायची आणि पुन्हा मागील पानावरून पुढे असं आयुष्य चालू राहायचं!

एकंदर आपल्या आयुष्याचा हा मध्यम काळ सर्वांच्या संसारात अशाच प्रकारे गुंतलेला राहतो. काही वेळा त्याला सुखदुःखाची झालर ही लागते, पण ते पार करताना आपण आयुष्याचे सिंहावलोकन करू लागतो. साठी नंतर तृप्ततेने परमार्थाला लागण्याची क्रिया ही हळूहळू सुरू होते. मन अध्यात्मिक, परमार्थिक पातळीवर थोडा विचार करू लागते. अजूनही प्रत्येक नवा दिवस नव्या आशेवर घालवत असतो.

प्रत्येक नवीन वर्ष वेगवेगळ्या कामांमध्ये उजाडत राहते. स्वप्नपूर्ती बऱ्यापैकी झालेली असते. अधूरी स्वप्नं आता खुणावत नाहीत!

“प्राप्त ते इष्ट मानून घ्यावे”.. या भावनेने मन आयुष्याचा मागोवा घेत राहते.

मागे वळून पाहताना…

असं वाटतं की, मागची वाट तर धूसर होत चालली आहे. पुढची तर दिसत नाही, पण एक जानेवारीला आपण नवीन वर्षात पदार्पण केले आहे! येणारे नवीन वर्ष सर्वांनाच आनंददायी, सौख्याचे, समृद्धीचे जावो आणि आपल्या सारख्या ज्येष्ठांना नवीन वर्षातही आपली तब्येत चांगली राहू दे, मनस्वास्थ्य लाभू दे आणि उर्वरित आयुष्यात जेवढे म्हणून चांगले करता येईल त्यासाठी बुद्धी मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted