श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ भंगारवाले दादा आणि त्यांचे चुकणारे हिशेब… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
जगभरात करोनाने थैमान घातलं, आणि जाता जाता त्याने आम्हालाही फटका दिला. आमच्या बाबांचा बळी घेतला त्यानं, आईची नोकरी त्यापूर्वीच गेलेली होती. आधीच हातावर पोट असलेले आम्ही अगदीच उघड्यावर पडलो. पैसे संपले, फी भरता आली नाही, माझी आणि माझ्या धाकट्या भावाची शाळा सुटली.
पुस्तकातल्या शिक्षणापेक्षा, जिवंत राहण्यासाठी हातपाय मारण्याचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं होतं.
मी आणि माझा भाऊ गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करायचो. प्लॅस्टिकच्या बाटल्या – पिशव्या, तुटक्या – फुटक्या, गंजलेल्या मेटलच्या वस्तू – पंखे, बादल्या, छत्र्या – जे मिळेल ते. आणि हे सगळं घेऊन आम्ही तुकारामदादांकडे जायचो – आमच्या एरियातील सगळं भंगार तेच विकत घ्यायचे.
तुकारामदादा – कधीकाळी पांढरा असलेला सदरा, पायघोळ लेंगा, डोक्यावर टोपी, दाढीचे खुरटे खुंट, रूक्ष – उग्र चेहरा. तुम्ही आणलेली रद्दी – भंगार तोलायचे, त्यांच्याकडच्या कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करायचे, आणि हातावर पैसे टेकवायचे.
ना चेहऱ्यावर एखादं स्मितहास्य, ना अघळपघळ गप्पा.
जणू हसण्याचे किंवा बोलण्याचे पैसे पडत असावेत.
मी आणि भाऊ पहिल्यांदा त्यांच्याकडे पुठ्ठे, भंगार घेऊन गेलो तेव्हा फक्त ४८० रुपये टेकवले होते त्यांनी माझ्या हातावर.
तीन चार दिवस सतराशे साठ उकिरडे फुंकून गोळा केलेल्या कचऱ्याचे मोल – धड पाचशे रुपयेसुद्धा नव्हतं झालं.
दर दोन चार दिवसांनी आम्ही तिथं जायचो. दादा वजन करायचे, हिशोब करायचे, पैसे द्यायचे. तेच रूटीन.
पण मग मला एक गोष्ट लक्षात आली. कधीकधी त्यांची गणितं चुकायची, हिशेब बरोबर व्हायचा नाही.
आजचंच बघा ना, आजच्या माझ्या भंगाराचं वजन गेल्या वेळेपेक्षा कमी आहे, पुठ्ठे प्लॅस्टिक जास्त आहेत आणि लोखंड कमी आहे, पण दादांनी मला गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. “भंगाराचे भाव वाढलेत, ” दादा स्वतःशीच बोलल्यासारखे गुरकावले.
पण किंमती वाढलेल्या नसायच्या, ना दादांकडच्या बोर्डावर, ना इकडच्या तिकडच्या भंगारवाल्यांकडे. मी चौकशी केली होती, माहिती काढली होती.
एकदा मला एक चपला ठेवायचा स्टँड मिळाला, बऱ्या अवस्थेत होता. एका बिल्डिंगमधले एकजण घर विकून निघून गेले होते, सोसायटीच्या आवारात स्टँड पडला होता, वॉचमनकाकांनी हाक मारून मला दिला होता तो.
मी स्टँड घेऊन दादांना दिला, “चोरीचा माल मी विकत घेत नाही, ” ते गुरगुरले. मग मी सगळी रामकहाणी सांगितली, “आईशप्पथ, खरं सांगतोय, ” म्हटलं.
दादांनी मला नीट निरखून पाहिलं. त्यांनी काय पाहिलं आणि त्यांना काय समजलं माहित नाही, पण तो स्टँड ते घेऊन गेले. आणि पाचशे रुपयांच्या चार कोऱ्या करकरीत नोटा घेऊन आले.
“दादा, याचे एवढे पैसे नाही होणार, ” मी चाचरत म्हणालो.
“हे तू ठरवणार का मी? माझ्या एका मित्राला अगदी असाच स्टँड हवा होता. ” ते म्हणाले.
ते खोटं सांगत होते. आणि हे आम्हा दोघांनाही माहित होतं.
मग मला जाणवलं की माझ्याप्रमाणेच इतरही काही मुलांच्या बाबतीत दादांची गणितं चुकायची, हिशेब चुकायचे. ती मुलंही माझ्यासारखीच कळकट मळकट, ठिगळं लावलेले कपडे घातलेली, अर्धपोटी असायची, आणि दादा अशा मुलांना पन्नासच्या जागी पाचशे रुपये द्यायचे – त्यांनी आणलेल्या भंगारात तांबं आहे, स्पेशल मशीन आहे, काहीबाही बहाणा सांगायचे.
आम्हाला पैसे हवेच असायचे. ते मुद्दाम जास्ती पैसे देत आहेत हे आम्हाला उमगायचे, पण आम्ही त्याबद्दल कधीच बोललो नाही, आम्हाला कळतंय हे दाखवलं नाही, पण आम्हाला माहित होतं.
आणि एक दिवस आई आजारी पडली. तिला दवाखान्यात भरती करायचं होतं, घरात नेहमीप्रमाणेच पैसे नव्हते. माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर्मन सिल्वरचा एक पेला घेतला होता, त्यावर झोकदार अक्षरांत माझं नाव कोरलं होतं.
आमच्या उरल्यासुरल्या घरातली ती शेवटची मौल्यवान गोष्ट होती.
काळजावर दगड ठेवून मी तो पेला दादांना दिला. त्यांनी मला परत सांगितलं, “चोरीचा माल मी विकत घेत नाही. “
“अहो, यावर माझंच नाव आहे. आईला दवाखान्यात घेऊन जायचंय, म्हणून विकतोय मी तुम्हाला हे, ” मी पोटतिडकीने सांगितलं.
आईला काय होतंय हे त्यांनी मला नीट विचारून घेतलं. एका कागदावर मला एका हॉस्पिटलचं नाव, पत्ता, एका डॉक्टरांचं नाव फोन नंबर लिहून दिलं, “मी पाठवलंय म्हणून सांग, ” म्हणाले, आणि तब्बल पाच हजार रुपये माझ्या हातावर ठेवले. “चांदीचे भाव आजच वाढले आहेत, ” ते म्हणाले.
पण जर्मन सिल्वर म्हणजे चांदी नसते. एवढं तर मलाही ठाऊक होतं.
चार दिवसांत आईची प्रकृती ठणठणीत झाली, डॉक्टरांनी पैसेदेखील घेतले नाहीत, “ते पैश्यांचं मी आणि दादा बघून घेतो, ” म्हणाले, एवढंच काय, पण आईला तिकडे दवाखान्यात नोकरीदेखील दिली.
मलाही एक पार्ट टाइम नोकरी मिळाली, आता मी आणि भाऊ रात्रशाळेत जाऊ लागलो. आता मला भंगार शोधत भटकावं लागत नव्हतं.
या गोष्टीला आता दोन तीन वर्षं होऊन गेली आहेत. गेल्या महिन्यात माझी नोकरी परमनंट झाली आहे. आज माझा पहिला पगार झालाय, आईसाठी नवी साडी घेतली आहे मी माझ्या पगारातून, धाकट्या भावासाठी शर्ट.
आणि माझ्या खिश्यात एक पाकीट आहे… तुकारामदादांसाठी.
मी त्यांच्या भंगाराच्या दुकानात गेलो. दादा असून तसेच आहेत. आणखी म्हातारे झाले आहेत. हालचाल थोडी मंदावली आहे. त्यांनी मला ओळखलं नाही.
“दादा! मला ओळखलंत? मी भंगार घेऊन यायचो इथं. दोन तीन वर्षांपूर्वी. तुम्ही मला जास्त पैसे द्यायचात. खूप जास्त. माझ्या आईचा हॉस्पिटलचा खर्च तुम्ही केला होतात.”
त्यांनी मान वर केली. त्यांनी मला ओळखलं होतं, पण तसं अजिबात न दर्शवता ते म्हणाले, “जास्तीचे पैसे? कोणी? मी दिले होते? “
“तुम्ही माझ्या कुटुंबाला वाचवलं. “
त्यांनी खांदे उडवले. “वजनकाटा जुना आहे. कधीकधी चुका करतो. आणि माझं वय झालंय, कधी कधी माझ्याकडूनही चुका होतात. “
मी माझ्या खिशातलं पाकीट त्यांना दिलं, १००० रुपये होते त्यात. “दादा, जास्त नाहीयेत, पण माझ्याकडून खारीचा वाटा. तुमच्या काट्याच्या चुकांसाठी. पुढच्या गरजू मुलासाठी. मी शक्यतो दर महिन्याला येत जाईन. “
त्यांनी ते पाकीट उघडलं, एकटक पाहिलं. डोळ्यात तरारलेलं पाणी बोटांनी निकवत त्यांनी मान डोलावली. मी निघालो.
अजूनही दादांचे हिशेब चुकतात, विशेषत: मेहनती, गरजू, गरीब मुलं असली की नक्कीच.
ते कोणाला फुकट काही देत नाहीत, कोणावर मेहरबानी करत नाहीत.
कष्ट करणारं कोणी असलं की मग मात्र त्यांचा हात देता होतो, त्यांचे हिशेब सोयीस्कररीत्या चुकतात आणि तुकारामदादांच्या या चुकणाऱ्या हिशेबांनी आमच्यासारख्या अनेक मुलांच्या आयुष्याची गणितं सुटतात.
(काल्पनिक)
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



