सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
🌸 विविधा 🌸
☆ माझी मराठी — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)
माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट मराठी माझी मातृभाषा आहे आणि तिचं संवर्धन, विकास, विस्तार ही माझीदेखील जबाबदारी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी त्यासाठी नक्कीच कायम प्रयत्नशील राहीन.
‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजा जिंके।..
सुमारे आठशे वर्षांपूर्वी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान, प्रेम आणि मराठी शब्दांच्या सामर्थ्यावरील विश्वास, व्यक्त केला आहे. खरंच अवीट गोडी असलेली अशी ही आपली मराठी भाषा! या भाषेचं वैभव वाढवलं ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, जनाबाई इ. महान संतांच्या वाङ्मयानी. या त्यांच्या साहित्याने रसिकमनांचं केवळ मनोरंजन न करता, अखिल विश्वाच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन त्यांना दिला. तेही कोणताच भेदभाव न करता! हे आमच्या मराठी भाषेचं सामर्थ्य आणि परंपराआहे. आणि ती साहित्य परंपरा आजतागायत चालू ठेवली ती, श्री.महादेवशास्त्री जोशी, ना. सी. फडके, वि. वा.शिरवाडकर, बालकवी , इंदिरा संत, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे अशा आमच्या शेकडो प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककारांनी!
पण आज आमच्या भाषेचं वैभव जणू लुप्त झालं आहे. इंग्रजी भाषेचा पगडा आमच्या समाजमनावर इतका जबरदस्त आहे की त्यापुढे आपली मातृभाषा मराठी किती समृद्ध आहे, याचा विसर पडू लागला आहे. अटीतटीच्या या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी, इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं हाच एकमेव उपाय आहे, अशी बहुजन मराठी समाजाची समजूत झाली आहे. किंबहुना आपला पाल्य कोणत्या इंग्रजी शाळेत शिकतो, हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, अशी मराठी वृत्तपत्रे आवर्जून मराठी बाणा जपताना दिसतात. तेवढाच आशेचा किरण!अन्यथा आज महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होताना दिसत आहे.पण भारतातील इतर राज्यांत आणि परदेशात वास्तव्य करून असलेली मंडळी मात्र विविध उपक्रमांद्वारे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
मराठी या आपल्या मातृभाषेचा विसर पडणे याचा दूरगामी परिणाम म्हणजे मराठी संस्कृतीही नामशेष होणे! हा विघातक परिणाम टाळायचा असेल तर मराठी भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी, जाणीवपूर्वक आणि परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. या हेतूनेच १४ ते २८ जानेवारीपर्यंत, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महाराष्ट्र शासनातर्फे, २७ फेब्रुवारी, हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथल्या सर्व शाळांमध्येही मराठी हा सक्तीचा विषय केला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले नामफलक आणि सूचनाफलक हे ठळक मराठी भाषेतच असावे, यासाठी नियम लागू केले आहेत.
महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असल्याने, महाराष्ट्रातील सर्व व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजेत. तसा आपलाच आग्रह असला पाहिजे पण आम्ही भलतेच सहिष्णू! घरातून बाहेर पडल्यावर रिक्षावाल्याला ‘ ऑटो ‘ म्हणून पुकारतो आणि ‘ स्टेशन जाना है’ असं सांगतो. आमच्या भाषेला आम्हीच मान देत नाही तर इतरांची काय कथा? आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची, समाजमाध्यमांवर लिहिण्याची सवय केली, तर इथे आलेल्या अन्य भाषिकांना ती भाषा शिकावीच लागेल. कारण त्याशिवाय त्यांना इथे व्यवहार करणं, स्थापित होणं, अशक्य होईल.
भ्रमणध्वनी आणि आंतरजालाच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. त्यासाठी बालकांना, तरूणवर्गाला आकर्षित करेल, असं उत्कृष्ट, नवीन आणि जुनं साहित्य , हे ‘ई-बुक’ च्या स्वरूपात, उपलब्ध करून दिले पाहिजे. ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे आणि आहेत त्या ग्रंथालयांची स्थिती सुधारली पाहिजे. मराठी भाषेतील लिखाणाला, डबघाईला आलेल्या प्रकाशन व्यवसायाला सरकारकडून अनुदान आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मराठीच्या उपभाषा असलेल्या कोंकणी, मालवणी, अहिराणी या भाषांतील साहित्य,मराठीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे.
एकूण काय तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रचंड राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची आवश्यकता आहे. आघाडीचे मराठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांनीदेखील यासाठी आपला वाटा उचलला पाहिजे.
मग नक्कीच.. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल.
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





