सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद मायमराठी बद्दलच्या अभिमानाचेच प्रतीक आहे पण नुसता भाषेचा अभिमान, अस्मिता बाळगणं पुरेसं नाही तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात सातासमुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मियतेने अथवा औत्स्युक्याने, त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून, आपल्या अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातील मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची ही मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणे हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली चळवळ अर्धी जिंकलो असं म्हणायला हरकत नाही.

तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गमती जमती सांगता, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरज ही मागच्या पिढीकडून अपेक्षित आहे,

माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालावर वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्यं लिहायला आणि ओळखायला शिकवली, त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नक्कीच नव्हता पण एका सुंदर, आणि त्यांचं मातृमूळ असलेल्या भाषेशी त्यांचं नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते काही बालगीते शिकवली, भारतातून पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच पण या मराठी भाषेचे कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवले. हे काही थोडकं आहे का?

आज तिथे शनिवार रविवारी काही मराठी संघटनाच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना पालक मराठी भाषेचं जतन व्हावं म्हणून आपुलकीने पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोक पठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते.

अगदी अलीकडेच एका समारंभात एका मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या तेरा वर्षीय मुलाने शिवरायाचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने त्याला उभे राहून मानाचा मुजरा दिला.

।ईये मराठीचिये नगरी अवतरली जणू अटकेपार सागरी।।

तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके दिसली आणि माझं मन एकदम भरून आलं पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग तयार होईल.

एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे आढळतात तशी भाषिक वाचनालये का असू नयेत इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध संपन्न मराठी वाङ्मयाचेच स्वतंत्र वाचनालय सुरू करणे मुळेच अशक्य नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती दर्जेदार सातत्याने होणारी साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक वर्ग. ही जागरूकता असेल तर भाषा का विझेल? ती निरंतर, चिरंतन राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया हे रोप मराठी भाषेचे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments