शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “दुपारी ढाराढूर झोपणाऱ्या बायका…!” ☆ शीला पतकी ☆
☆
निशा तणतणतच ऑफिस मध्ये आली. ” काय झालं बाई आज मूड नाही तुमचा”… “काही नाही ग जावेच आणि माझं जरा वाजलं ती म्हणाली तुम्हाला काय पानावरून उठता आणि ऑफिसला जाता आता बाकी मला करावा लागत”. मी तीला सुनावल ” पण तुम्ही दिवसभर दुपारी ढाराढूर झोपता आम्हाला तिथे विश्रांती मिळत नाही काही ऑफिसमध्ये “.. चिडली थोडा वादही झाला… मी म्हणलं, ” चल सोड आज आपल्याला मुख्य ऑफिसमध्ये जाऊन रिपोर्ट द्यायचा आहे. दुपारी दोन वाजता बोलवले, दीड वाजता आपण जाऊ. आम्ही दोघीही कामाला लागलो… दीड वाजता मुख्य ऑफिस मध्ये जायला निघालो. आम्ही बनवलेले प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं, त्याबाबत चर्चा केली त्याप्रमाणे थोडे फेरफार करून सगळी सामग्री त्यांच्या ताब्यात दिली आणि ऑफिस बाहेर पडलो.
निशाला मी म्हणलं, ” निशा अग लीला आत्याचं घर जवळच आहे आपण जाऊया का तिथे? ऑफिसमध्ये जाऊन डबा खाण्यापेक्षा तिच्या घरी खाऊ”. ती म्हणाली, ” चालेल आपलं काम लवकर झालं आहे आपण थोडीशी शॉपिंग पण करून घेऊयात इथे “… मी म्हणलं, “ठीक आहे” लीला आत्याला फोन केला… ” आत्या आम्ही येतोच ग अर्ध्या तासात. तुझ्या घरी बसून डबा खाणार आहोत. दुपारी येणार असल्यामुळे तुला काही डिस्टर्बन्स तर नाही ना? … ” ती मला म्हणाली, ” चमे मला कधीपासून डिस्टर्बन्स व्हायला लागला आणि आमच्या पिढीला असल काही होत नाही बरं! , ये मुकाट्याने”… मला हे उत्तर माहीतच होतं तिचं… आम्ही थोडं शॉपिंग केलं आणि लीलाआत्याच्या घरी गेलो. तिने गार पाण्याने आमचं स्वागत केलं.. म्हणाली ” हात पाय धुऊन घ्या आणि पहिल्यांदा जेवायला बसा”. मी म्हणाले “. छे ग डबे आहेत ना आमचे” त्यावर तिने माझा कान पकडला. म्हणाली, “चमे आत्याच्या घरी डबा घेऊन येती होय? .. ”
मग हातपाय धुवून आम्ही जेवणाच्या टेबलवर गेलो आत्याचं स्वयंपाक घर आवरलेलं.. टेबलावर दोन ताट वाट्या चमचे, पाण्याने भरलेले ग्लास… कुकर नुकताच पडला होता त्याचा खमंग वास… तिने वाढायला घेतलं… डाव्या हाताला मीठ चटणी कोशिंबीर… या बाजूला बटाट्याच्या काचऱ्याची भाजी.. वाटीत दोन गुलाबजाम, कडेला मठ्ठ्याचा ग्लास… आणि कुकर उघडून तिने कमालीची खमंग सुंदर वासाची खिचडी पानात वाढली. त्याच्यावर खोबरं कोथिंबीर पेरलं आणि भरपूर लोणकढं तूप घातलं, दोन पोह्याचे पापड आमच्या पानात ठेवले म्हणाली, ” चमे (हे तिचे लाडके नाव) पोटभर जेव. ” निशाकडे बघून म्हणाली “तू पण पोटभर जेव बाई” …
आणि मग जेवताना बऱ्याच गप्पा झाल्या. तिची ती चविष्ट खिचडी, पेरलेले कोथिंबीर खोबरं आणि लोणकढं तुपाचा खमंग वास.. मेंदूने सूचना दिली ‘चला चालू व्हा’ आणि आम्ही भराभर जेवायला सुरुवात केली शेवटी ग्लासभर मधुर ताक आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम खाल्ले. तृप्तीची ढेकर दिली म्हणाले,
“लीला आत्या सुखी भव”.. नंतर हातावर सुपारी घेत आम्ही सगळे हॉलमध्ये आलो. मी तिला म्हणलं,
“आत्या सॉरी आमच्यामुळे तुझी दुपारची झोप… ” त्यावर ती पटकन म्हणाली, ” तुम्हाला नोकरी करणाऱ्यांना असंच वाटतं की आम्ही दुपारी ढाराढूर झोपतो “.. निशाने पटकन चमकून बघितलं “अग बाई हिला कसं कळलं “… असच वाटलं.
“सगळ्यांचा हा गैरसमज आहे ही घरी बसणाऱ्या बायका फार निवांत असतात. टीव्ही पाहतात. मासिक वाचत बसतात. सगळे घरातले कामाला आणि शाळेला निघून गेले की या निवांत… नोकरी करणाऱ्यांचा गैरसमज आहे. अगं घरात बसणाऱ्या महिलाना 24 तास काम आहे. तुम्हाला एकच बॉस आहे… आम्हाला… विचारूच नकोस.. पहाटे पाचला उठते मी. माझी सून नोकरी करते ना.. तिची दोन मुलं त्यांना नऊला शाळेत सोडावं लागतं. त्यांचा नाष्टा आणि टिफिन, सुनबाईचा नाष्टा टिफिन, समीर आणि हे एकाच दिशेने ऑफिसला जातात त्यामुळे समीर त्यांना सोडून जातो.. त्यांचा डबा… मग काय मी आणि आबा आम्ही दोघेच. आबाना छोटी गरम पोळी लागते. तिच्यावर तूप घालून त्यांना कुस्करून करून मी खाऊ घालते… हल्ली जेवणाला नको म्हणतात मग रोज काहीतरी वेगळे वेगळे करून त्यांना द्यावं लागतं. म्हातारं माणूस आहे काळजी घेणार कोण ग माझ्याशिवाय? अक्का गेल्यापासून फार एकटे पडलेत. तरी मला जमेल तेवढं करते मी. म्हणतात… ‘लेकीसारखं करतेस बाई’…
सकाळी या सगळ्यांचे करेस्तोवर अकरा वाजतात. मध्ये आबांचा नाश्ता असतो पथ्याचा… त्यांना दोनदा चहा लागतो. मग दुपारनंतर घर आवरणं, कामवाल्या धुणेवाली, भांडेवाली, झाडू पोचावाली.. अंगण झाडणं एक मोठं काम झाले “… मग तिने आम्हाला खिडकीतूनच तिची छोटी बाग दाखवली… मी चाटच झाले… ” अग आत्या किती भाज्या लावल्यास? ” ती म्हणाली, ” कोथिंबीर मिरची काही पालेभाज्या काही वेल त्यामुळे आडीनडीला घरच्या भाज्या मिळतात. तर फार मेहनत नाही. घरातलं पालेभाज्यांचं खत घालते. पाच साडेपाच ला अर्धा तास बागेत वेळ घालवते. मनही प्रसन्न होतं आणि नातवंडही माझ्याबरोबर काम करतात.. मज्जा येते… हल्ली संध्याकाळचा स्वयंपाक असतो कुठे चमे? … संध्याकाळी सगळ्यांना वेगळं काहीतरी हवं असतं… मग दुपारपासून त्याची तयारी करून ठेवते… कधी बटाटेवडे, कधी कटवडा, कधी पावभाजी.. सगळ्याची तयारी करून ठेवते मग. मात्र सुनबाई… ती ऑफिस मधून दमून आलेली असते, हाताशी सगळे तयारी असली की ती पटकन करते अर्थात मी करते तिला मदत… शिवाय दुपारी काय नको काय हव काय संपले का त्या डब्यातला उरले का सगळं मला बघावं लागतं. फ्रिज स्वच्छ करून घेते. हव नको ते काढून ठेवते. सगळ्यांच्या चादरी उशीचे अभ्रे क्रमाने मशीनला लावते. त्या बाईकडून ते सगळे नीट वाळत घालून घेते… पाच वाजता वाळलेले कपडे घरात आणावे लागतात… घरच्या बाईला खूप काम असतात.. आबांना दुपारी पुन्हा चार वाजता चहा लागतो त्याबरोबर ते दोन बिस्कीट खातात त्यांचा हात थरथरत असल्यामुळे चहा हाताने पाजावा लागतो त्यांना. व्यायाम देणारा माणूस पाच वाजता येतो त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. सगळ्यातून एक पंधरा मिनिटे वीस मिनिटं मिळाली तर झोप मिळते…
तुम्हाला नोकरी करणाऱ्या मुलींना वाटतं घरी बसणारी बाई डाराडूर झोपते… चुकीचा समज आहे…! तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये एखादी डुलकी घेत असाल पण आम्हाला ती मुभा नाही. घरी बसणारी बाई म्हणजे बिन पगारी, पूर्ण वेळचा, मायाळू, कर्तव्यदक्ष नोकर “… यावर आम्ही खूप हसलो.. “. खरंच लिला आत्या किती करता हो घरासाठी”… निशा म्हणाली. आत्या म्हणाली… ” हे बघ बेटा घर सगळ्यांच असत. घरात एकट्याला सुख घेण्याचा अधिकार नसतो.. सगळे राबतात ना.. मी घर सांभाळते… ही विभागणी आहे. प्रत्येकाचे योगदान तेवढेच असतं आणि हे समजून घेतलं ना तर आपण घराला मंदिर बनवू शकतो नाहीतर मग काय वादविवादाचा कोंबड्याचा खुराडा व्हायला वेळ लागत नाही “.
मी निशाकडे पाहिलं. ती समजायचं ते समजली. तासा दीड तासाने आम्ही लिला आत्याच्या घरातून बाहेर पडलो. निशा काहीच बोलत नव्हती. कॅब केली आणि आम्ही ऑफिसकडे निघालो. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, ” आपल्यापेक्षा तुझ्या आत्याचं आत्ताचं प्रेझेंटेशन छान झालं बाई! जाताना मी माझ्या जावेला एक गिफ्ट घेऊन जाणार आहे आणि चक्क गळ्यात हात घालून तिला म्हणणारआहे “माझं चुकलं, मी तुला उगीचच म्हणाले.. तुम्हाला काय डाराडून झोपता येत दुपारी…” काही म्हण तुझ्या आत्या ग्रेट आहेत एवढं खर”… “मग आत्या कोणाची आहे आणि कळलं ना तुला” निशा आता दुपारी घरी बसून डाराडूर झोपणाऱ्या बायका काय काय करतात ते कळल ना? “
“ हो ग हो “ म्हणून निशानी माझा हात हातात घेतला आणि आपली चूक कबूल केली…!
घर सांभाळून नोकरी करणाऱ्या आणि नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या समस्त महिलांना मुजरा आणि हा लेख समर्पित आहे.
बायकांनो तुमच्यामुळे कुटुंब संस्था टिकली आहे आणि ती मजबूत आणि सुसंस्कृत झाली आहे..
… फक्त घरातल्या दोन महिलानी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.
… असो
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





