श्री सुनील देशपांडे
🌸 जीवनरंग 🌸
☆ जलसाक्षर… भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
ऐका ऐका जलदेवता तुमची कहाणी…
अर्थात जलसाक्षरतेची कहाणी… जेहेत्ते कालाचे ठायी एका आटपाट नगरीमध्ये वासू हा एक मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, मध्यममार्गी असा एक सर्वसामान्य मध्यम माणूस रहात असे. आता मध्यम म्हटले की त्याचा फ्लॅट असणार बंगला नव्हे. त्याची दुचाकी असणार चारचाकी नव्हे. मध्यमवयीन म्हणल्यानंतर तो कुठेतरी नोकरी करीत असणार रिटायर्ड नव्हे. तसेच त्याला वाङ्मयाची व्याख्यानांची आवड वगैरे असणारच. ओघानेच त्याच्या बायकोचे नाव वसू असायलाच हवे. वाङ्मयीन नियमानुसार त्याला एक सासू असायला हवी. हो ना? तशी ती या वासुला सुद्धा आहे. जेहेत्ते कालाच्या पद्धतीनुसार वासुला एकच मूल असणार आणि ती मुलगीच असायला काय हरकत आहे? नाही का? म्हणजे समाज प्रबोधन वगैरेच्या दृष्टीने ते बरे असावे. होय की नाही? तर असे हे चौकोनी कुटुंब आपल्या कथानायकाचे. अरे हो पण त्या कन्यारत्नाचे नाव काय? ते काहीही असू शकेल. सुशीला, सुकन्या, सुधन्वा वगैरे वगैरे. छे छे ही नावे जुनी वाटतात. त्यामानाने सुधन्वा
ठीक वाटेल नाही का? पण ते आपल्याला काय करायचंय? कारण त्या कन्यकांना शॉर्ट फॉर्म ची सवय. आणि प्रत्येक नावाचा शॉर्ट फॉर्म करूण्याचा वसा त्या आटपाट नगरीच्या लोकांनी इतिहासकाळापासून घेतलेला होता असे म्हणतात. तेथील एका नव्या दमाच्या इतिहास संशोधकाने पुरातन काळी श्रीराम दशरथ रघुवंशी यांना एसडीआर व लक्ष्मण दशरथ रघुवंशी यांना एलडीआर म्हणत असत असे कोणत्या तरी जवळपास सापडलेल्या पुराणकालीन शिलालेखावरून स्पष्ट होते. असे विधान करून पुराव्या दाखल संबंधित शिलालेखाचे फोटो व्हाट्सअप वरून व्हायरल केलेत असे ऐकले आहे. अरे पण हे असे जुन्या जाणत्या लेखकांसारखे मी विषयांतर का बरे करीत आहे? पण. तर आपला मूळ विषय म्हणजे वासू. तर या वासूच्या कन्येचे नाव काय ते काही का असेना? पण तिच्या सर्व मित्रमैत्रिणी तिला सू या नावानेच पुकारत असल्याचे व त्यांनाही तिचे नक्की नाव माहित नसल्याने आपणालाही ते माहित करून घेण्याची आवश्यकता नाही. असो. तर ते कन्यारत्न म्हणजे सू. तर असे हे चौकोनी कुटुंब वासू, वसू, सासू आणि सू ही झाली या चौकोनी कुटुंबाची ओळख. तूर्त एवढीच ओळख पुरे. तर झालं काय की वासुने एका दिवशी पेपरात वाचलं अर्थात मध्यमवर्गीय व मध्यमवयीन म्हटल्यावर तो पेपर लहान सहान बातम्यांसह संपूर्ण वाचत असणार हे ओघाने आलंच. असो. तर त्याने वाचलं की अर्थात अत्यंत छोट्या व न दिसणाऱ्या कोपऱ्यात छापलेल्या बातमीत वाचलं. या आटपाट नगरीमध्ये जलसाक्षरता या विषयावर एका प्रसिद्ध जलतज्ज्ञाचं व्याख्यान आहे. अर्थात तज्ज्ञ म्हणजे मराठी नसणार. जलतज्ज्ञ म्हणजे उत्तरेकडील असू शकतो. त्याचं आडनाव सिंग वगैरे असायला काहीच हरकत नाही. अर्थात तो कोणी का असेना. पण तो अत्यंत बुद्धिमान, प्रभावी वक्ता व त्या विषयावरील जाणकार मराठी आहे असे वासुला खात्रीने वाटले. हे मात्र नक्की. असो. तर त्या जाणकाराच्या व्याख्यानाला जायचे वासुने ठरवले. अर्थात मध्यम वगैरे असल्यामुळे वासुची अशीही इच्छा होती की आपले संपूर्ण कुटुंब जलसाक्षर व्हावे. परंतु कौटुंबिक सभेमध्ये नेहमीप्रमाणे त्याचा हा प्रस्ताव एक विरुद्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला. सासूचा अर्थातच भजनी मंडळाचा कार्यक्रम असल्याने ते मत विरोधी पडलं. साड्यांच्या भव्य सेलची पानभर जाहिरात आजच्याच पेपरला असल्याने वसूचं मत सुद्धा विरोधात गेलं आणि चि. सू पूर्ववतच सायंकाळी मैत्रिणींबरोबर भटकंतीस जात असल्याने व तारुण्यपूर्व वयोमानात असल्याने वडिलांबरोबर जाण्याची शक्यता नसल्याने ते मत विरोधात जाणार हे वासुने कायमचे गृहित धरलेले असते. अशा तऱ्हेने फेटाळल्या गेलेल्या ठरावाचा एकमेव समर्थक वासुने एकट्यानेच व्याख्यानाला जायचे असे वाचून ठरवले असणार हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आत्तापर्यंत आले असेलच.
तर अशा तऱ्हेने आपला कथानायक श्री वासूजी हे बरोबर सहा वाजता तेथे पोहोचले येथे एकही वाहन अथवा प्रेक्षक वा संयोजक यांचे पैकी कोणाचाही पत्ता नव्हता. फक्त दोन कर्मचारी गेटवर फ्लेक्स लावण्याच्या खटपटीत होते. गेटवरचा बोर्ड पाहून वासूने मोठा आ वासला. बोर्डवर ‘जलसा मंडळ’ असे लिहिले होते. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे ना? ”
“ कुणास ठाऊक? आम्हाला फक्त इथे हा जलसाचा बोर्ड लावायला सांगितले आहे”.
बुचकळ्यात पडलेल्या वासूचा आs असून तसाच उघडा असताना, घाईघाईत एक मनुष्य हातात पिशवी व काही गुच्छ सांभाळण्याची कसरत करत करत आत शिरला. त्याच्या मागोमाग आत शिरत वासूने त्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे का हो? ”
“हो”
“मग हे जलसा मंडळ काय आहे? ”
“ ते आमच्या संस्थेचं नाव आहे. ‘जल ललकार साहित्य मंडळ’ या संस्थेतर्फे ते व्याख्यान आहे.”
“मग ते व्याख्यान आहे केंव्हा? ”
“सात वाजता”
“अहो पण पेपर मध्ये सहा वाजता छापलंय”
“हो बातमीत वेळ सहाची दिली की आटपाट नकरीचे लोक सात वाजेपर्यंत येतात. तुम्ही इथले दिसत नाही? आता बघा ना, सहाची वेळ द देऊन सुद्धा तुमच्याशिवाय अजून कोणी दिसते का? जर पाहुणे चुकून वेळेवर आले तर संस्थेच्या इभ्रतीचा पंचनामा होणार ना? पण तुम्ही जाऊ नका, चहा येईलच इतक्यात आपण चहा घेऊ”
चहा आला. चहा पिता पिता मी त्याला विचारलं
“का हो पण या कार्यक्रमाला किती प्रेक्षक येतील! ”
कार्यक्रम ठरवतानाच त्याची सोय करून ठेवावी लागते. आता असं पहा स्वागत गीतासाठी आम्ही पाच मुली घेतल्यात. आवाज कसा का असेना पण त्यांचे मित्र मंडळ मोठे असावे. कुठल्यातरी क्लासच्या असाव्यात, म्हणजे ते मित्र मंडळ, त्यांच्या घरची व काही कॉलनीतली मंडळी यापैकी साधारण हिशोबासाठी कमीत कमी 15 पकडा. एक सामूहिक जलनृत्य आहे. त्यांचीही अशाच हिशोबाने २० धरा, जलकाव्य स्पर्धेचे पाच विजेते त्यांची पंधरा, जलावतरण सन्मान चिन्हासाठी मनपाचे पाणी सोडणारे कर्मचारी व प्लंबर यांचे कुटुंबीय किमान 20 धरू. म्हणजे 70 संस्थेचे किमान पाच. असे 75 नक्की. मग बातमी वाचून येणारे काही रिकामटकडे बावळट चार-पाच, असे 80 जण आले की चित्कार गर्दी झाली. हो की नाही? ”
वासूने पुन्हा एकदा आ वासला बायको व्यतिरिक्त आपला बावळटपणा तोंडावर बोलणारे असेही काही लोक असू शकतात ही शक्यता त्यांने कधीच गृहीत धरली नव्हती. तेवढ्यात त्यांच्या वॉर्ड मध्ये मनापाचे पाणी सोडणारा कर्मचारी (आता वाचकांना त्याचं नाव कशाला हवंय? त्याची काही गरज नाही. आणि कुणाला हवं असल्यास त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काहीही समजावं. सगळं लेखकांनंच कशाला सांगायला हवं? वाचकांनीही थोडसं स्वतःचं डोकं वापरायला काय हरकत आहे? ) असो.
“काय वासूनाना;” करत तो सहकुटुंब त्यांचे जवळ येऊन बसला आणि आपण कसे प्रामाणिक व कर्तबगार कर्मचारी आहोत याचे रसभरीत वर्णन करत वासूला कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत पकडून ठेवले. अर्थात नंतरचा कार्यक्रम रटाळपणा आणि गोंधळाने भरलेला असला तरी जलतज्ञाचे भाषण मात्र अत्यंत उद्बोधक प्रभावी व समर्पक होते. वासूला आपण तो रटाळपणा सहन करत थांबल्याचे सार्थक झाले असे वाटले. पूर्वीच्या सर्व नकारात्मक गोष्टींना झटकून तो जलतज्ञांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे मनात घोळवीत राहिला.
सतत तीन वर्षाच्या कमी पावसामुळे पाणीसाठे कमी झाले आहेत. मुळातच पाणी अपुरे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद करून सुद्धा उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी बचती शिवाय पर्याय नाही. नागरिकांनी पाणी अत्यंत काटकसरीनेच वापरणे आवश्यक आहे. श्रीमंतांनी बाथटब बंद ठेवले पाहिजेत. शॉवर मुळे एका बादलीत होऊ शकणारऱ्या स्नानासाठी पाच सहा ल्या पाणी वापरले जाते. म्हणजे चार-पाच बदल्यांचा अपव्यय होतो. सतत नळ बंद ठेवणे आवश्यक आहे. पण त्यांच्या ऐवजी नळ सतत चालू ठेवून पाण्याचा अपव्य केला जातो. शर्ट एक दिवस वापरत असाल तर तीन दिवस वापरून मग धुवायला टाका. जीन्सच्या पॅन्ट वापरा त्या आठवड्यातून एकदा धुतल्या तरी चालतात. वाहने पाईपने धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसा वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आपल्याला अमलात आणता येण्यासारख्या आहेत हे वासूला मनोमन पटले. आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.
– क्रमशः भाग पहिला
☆
© श्री सुनील देशपांडे
फोन :९६५७७०९६४०
ई मेल : sunil68deshpande@outlook.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




