डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सेकंड बेस्ट — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मनू अगदी मनस्वी मुलगी.

लहानपणापासून ती स्वतंत्र विचारांची होती. चाळीत शेजारी शेजारी लागून खोल्या. मनूचे वडील अगदी सामान्य नोकरीत आणि आई शिक्षिका.

मनू दिसायला काही सुंदर नाही पण अतिशय स्मार्ट आणि आरोग्याचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सुंदर तजेलदार वर्ण आणि मोठे डोळे.

मनू अभ्यासात हुशार तर होतीच पण उत्तम स्पोर्ट्स् पर्सनही होती. मनूच्या मैत्रिणीसुद्धा खूप. सतत घोळका तिच्या घरी यायचा आणि मनूच्या आई प्रेमाने त्यांना खायला करायच्या.

मनूच्या चाळीत खालच्या मजल्यावर नवीन बिऱ्हाड आलं. मनू तेव्हा असेल तेरा चौदा वर्षाची.

मनूच्या आई आणि मनू त्यांना भेटायला गेल्या. काही लागलं तर सांगा, बाई हवी तर पाठवू का असं विचारायला.

मनूला त्यांचा मुलगा भास्कर तिथे दिसला. तिच्यातून दोन तीन वर्षांनी मोठा असेल. किती देखणा होता तो दिसायला. उंच, लख्ख गोरा निळे घारे डोळे. मनू बघताक्षणी त्याच्या जणू प्रेमातच पडली.

भास्करला आणखी एक बहीण होती. ती नव्हती भास्कर सारखी देखणी. पण स्वभावाने खूप गोड आणि अभ्यासात हुशार. रेवतीची आणि मनूचीही छान दोस्ती झाली.

मनूला भास्कर फार आवडायचा. या ना त्या निमित्ताने मनू त्यांच्या घरी जायची. घरी काही छान केलेलं असलं तर आवर्जून भास्करच्या घरी द्यायची. चाळीतल्या बायका हसायच्या.

“मनू, प्रेमात पडलीस काय गो भास्करच्या? बघ हो. तू एवढी हुशार आणि तो आपला बेताबेताचा.  रूप काय चाटायचं असतं का? ”

मनू काही बोलायची नाही. पण आपलं वागणं सोडायची नाही.

भास्कर तर तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचा. तो बरा त्याचा अभ्यास बरा.

मनू उत्तम मार्क्स मिळवून अकरावी झाली आणि कॉलेजला गेली. मनू एमकॉम् झाली आणि तिला बँकेत नोकरी मिळाली. फार आनंद झाला तिला.

भास्करला मात्र कमी मार्क्स मिळाले. तो कॉलेजला गेला पण फार मोठं ध्येय काही नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर. डिग्री घ्यायची आणि मिळेल ती नोकरी करायची असं माफक ध्येय होतं त्याचं.

त्या दिवशी मनू भास्करच्या घरी गेली. , तो एकटाच होता घरी.

“भास्कर, सरळच विचारते, मला फार आवडतोस तू. लग्न करशील माझ्याशी? मी छान संसार करीन बघ तुझा. माझ्या मनात फक्त तूच असतोस नवरा म्हणून कायम. करशील लग्न माझ्याशी? ”

भास्कर शांतपणे म्हणाला, ”मनू माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना मुळीच नाहीत. तू हुशार आहेस देखणीही आहेस. मी तुझ्याइतका मुळीच हुशार नाही.

आपलं लग्न झालं तर कायम माझ्या मनात ही तुलना राहील, की आपण मनूपुढे सामान्य आहोत. नकोच हे व्हायला

“अरे हे काय बोलतोस तू? मला जर तू आवडतोस तर या गोष्टींचा विचारच कसा येईल माझ्या मनात?

अजून विचार कर भास्कर. आपला संसार सुंदर होईल. मीही नोकरी करते आहेच. आपण मोठं घर घेऊ. ”

“हेच नकोय मला. तुझ्या जिवावर मला मोठं व्हायचं नाहीये. मला नाकापेक्षा मोती जड नकोय. आई पण हेच म्हणते माझी. ”,

मनूला आता राग आला. ”हो का? म्हणजे काकूंचं मत आहे हो हे? तुला स्वतःला नाही का काही समजत? ठीक आहे मग. ”

मनू तिथून निघून गेली. तिला रेवती भेटली.

“मनू आमचा दादा अगदी मूर्ख आहे बघ. मी पण स्वप्न बघितलं होतं की मनूच माझी वहिनी होईल. ,

सोड तू. त्याला अक्कल नाहीये. तुला खरंच याच्याहून चांगला हुशार जोडीदार मिळेल. हिरा टाकून घेईल काच हातात. मूर्ख आहे दादा. ”रेवती म्हणाली.

भास्करने एका फर्ममध्ये अकाउंटंटची नोकरी घेतली.

मनूला तिचे आईबाबा म्हणाले,

मनू, आता लग्नाचं वय झालं तुझं. बघायला लागू या ना मुलगे? बघ. ते घैसास विचारत होते त्यांच्या पुतण्या बद्दल. छान मुलगा आहे बघ अगदी. ”

“आई मला फक्त भास्करशीच लग्न करायचं आहे. पण तो नाही म्हणतो. ”

”मनू हा काय वेडेपणा? मूर्ख आहे असं म्हण तो मुलगा. अग हातात आलेला हिरा टाकतोय तो. असं समज की तोच तुझ्या योग्यतेचा नाहीये. असं नको करू मनू. ”

आई बाबांनी खूप समजूत घातली. मनू घैसासांचा जय बघायला तयार झाली. संध्याकाळी घैसास मनूच्या घरी आले. जय आणि आईबाबा आणि जयची बहीण.

जयला बघताक्षणीच मनू आवडली.

तिथेच त्याने सांगून टाकलं, “मनू मला आवडलीस तू. तुमचा होकार असेल तर अगदी साधे लग्न करायला मला आवडेल. मला डामडौल आणि उधळपट्टी आवडत नाही. ”

घैसास गेल्यावर बाबा म्हणाले, मनू, काय मग? आवडला का जय? किती स्मार्ट हुशार आणि पुन्हा खूप शिकलेला मुलगा आहे ग. काय कळवू त्यांना?

“बाबा हो सांगा त्यांना.

मला आवडला हा मुलगा.

आता भास्कर इतका सुंदर नाहीये पण हुशार आहे. ” 

बाबा हसले. अजून ते भास्करचं खूळ आहेच का डोक्यात? मनू, संसार रूपावर होत नाही. पुरुषाची बुद्धिमत्ता महत्वाची. ”मनूला हे पटलं.

त्या रात्री ती भास्करला भेटली.

“भास्कर असं असं माझं लग्न ठरतंय.

तू हो म्हणालास तर अजूनही मी त्यांना नकार कळवू शकते”.

भास्कर म्हणाला, छे छे.. तू जरूर लग्न कर त्याच्याशी. माझ्या शुभेच्छा. ”

मनू घरी आली. साखरपुड्याची तारीख ठरली. मनूची आई हौसेने तयारीला लागली.

इतक्यात घैसासांचा निरोप आला. येऊन भेटा. मनूचे आईबाबा 

घैसासांना भेटायला गेले.

जयच्या आईनी त्यांचे स्वागत केलं आणि म्हणाल्या,

“तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. लग्न ठरलं आणि माझी आई गेली अचानक काहीही हासभास नसताना, कोणताही आजार नसताना..

मनूचा पायगुण बरा नाही. कशाला विषाची परीक्षा बघायची? नकोच ते. आपण साखरपुडा रद्द करूया. ”

अहो पण.. जयचं काय म्हणणं आहे? या युगात कसले हो पायगुण आणि अशा गोष्टी? ”

जय माझ्या शब्दा बाहेर नाही. तर हे लग्न आता होणार नाही हे निश्चित. ”

आईबाबा हताश होऊन घरी आले.

मनू बँकेतून आल्यावर त्यांनी हे तिला सांगितलं. ,

”जाऊ दे ना आई. काही नका वाईट वाटून घेऊ. , आता मलाच लग्न करायचं नाहीये. माझ्यासाठी आता स्थळं बघू नका. ”मनू तिथून निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या.

भास्करचे आईवडीलआणिभास्कर कोकणात जाऊन भास्करचं लग्न गुपचूप उरकून आले. कोणालाही पत्ता न लागता.

दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाला मात्र सगळ्या लोकांना बोलावलं. भास्करची बायको सगळ्याना प्रसाद देत होती. काकूंनी ओळख करून दिली.

ही अपर्णा. आमची नवी सून हो.

अगदी गडबडीत ठरलं सगळं. ”

कोणी काही बोललं नाही. मनू, तिचे आईवडील सगळे सत्यनारायणाला जाऊन आले.

अपर्णा मनूएवढीच होती दिसत.

“छान आहे ग अपर्णा. ” मनू म्हणाली. साधी दिसतेय अगदी. ”

दुसऱ्या दिवशी अपर्णा आपण होऊन मनू कडे आली. “मनू, काल नीटसं बोलणं झालं नाही आपलं. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. इथे माझ्याएवढं कोणीच नाही. आणि तू नोकरी करतेस ना? मी फार शिकलेली नाही पण मला संसाराची खूप आवड आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. ”

ही साधी सरळ मुलगी मनूला फार आवडली. चहा घेऊन ती निघाली आणि म्हणाली

” येत जा ग मनू. मीही येत जाईन तुमच्याकडे. चालेल ना काकू? ”

हसत हसत ती निघून गेली.

किती सरळ साधी आहे पोरगी ही.

भास्करपुढे दिसायला थिटीच आहे हो. ”मनूच्या आई म्हणाल्या.

अपर्णाने आपल्या गोड वागण्याने सगळ्याना आपलंसं करून टाकलं.

मनू तर तिची घट्ट मैत्रीण झाली. आपली सगळी गुपितं सांगायला हक्काची मैत्रीण मिळालीअपर्णाला.

“काय ग मनू. करून टाक की ग लग्न. मला बघू दे ना माझी मैत्रीण सुखात असलेली. ”

अपर्णा, आत्ता कुठे मी दुःखात आहे ग? नको वाटतं आता ते लग्न. तू तुझ्या नवरा आणि ही तुझी दोन गोड पोरं मस्त आहेत की. मी नाही ग बाई त्या फंदात पडणार.

मस्त पगार आहे, बँक फ्लॅट देतेय पण आईबाबा तयार नाहीत ना तिकडे यायला. ”मनू हसून म्हणे.

अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.

दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.

 – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments