उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆
‘तुला काही झालं असतं ना… तू मेला असतास ना… तरी मी तुझ्याशी आजिबात बोललो नसतो… कधीच… ’ संग्रामचा हा मोबाईलवर आलेला डायलॉग ऐकताना, त्याही स्थितीत गौरवला खदाखदा हसू आलं. त्याही स्थितीत… म्हणजे गेले पाच-सहा दिवस असह्य वेदनांमुळे बाहेर पडणार्या किंकाळ्यांना मोठ्या संयमाने रोखून धरत असतानाही, त्याला संग्रामच्या बोलण्याचं हसू आलं. त्याला असं खदाखदा हसताना आहून बेस हॉस्पिटलची हेड नर्स शकुंतला मॅमनी त्याच्याकडे चमकून पाहीलं. त्याच्या या अशा मोठमोठ्याने हसण्यामुळे, तीन दिवस आधी पोटावर आणि डाव्या हातावर घातलेल्या टाक्यांवर अतिरिक्त ताण तर पडणार नाही ना, अशी त्यांना शंका येत होती आणि तसं होणं मुळीच योग्य नव्हतं. शकुंतला मॅमच्या चमकून बघण्यामागे ही काळजी होती. पण गौरवला असं हसताना पाहून तिचं मन द्रवलंही. गेल्या पाच-सहा दिवसाच्या त्याच्या मूक अश्रूपाताची ती एकटीच साक्षीदार होती.
श्रीनगरच्या या आर्मी बेस हॉस्पिटलच्या भितींवर या दिवसात दु:ख, वेदनेचा, नवा मजकूर लिहिला जात होता. बदामी बागेच्या आर्मी कॅंन्टोंन्मेंटच्या विशाल पसरलेल्या परिसराच्या मधे असलेले ते बेस हॉस्पिटल किती तरी वर्षांपासून किती तरी किंचाळ्यांचं, कण्हण्याचं मूक साक्षीदार बनलय. विशेषत: गेल्या दहा-पंधरा वर्षापासून, जेव्हापासून आतंकवादाने या घाटीत आपलं डोकं वर काढलय, तेव्हापासून जरा जास्तच. गोळ्यांनी विंधलेल्या, बॉम्बनी क्षत-विक्षत झालेल्या सैनिकांच्या शरिरांनी या हॉस्पिटलचे बेड भरलेलेच असायचे.
ऑफिसर वॉर्डच्या दहा बेडच्या हॉलमध्ये एका कोपर्यातल्या बेडवर गौरव पडलेला होता. शेजारी ठेवलेल्या एका उंच स्टॅंडवर प्लॅस्टर घातलेला त्याचा डावा हात क्लिपमध्ये बांधून ठेवलेला होता. ओठातून उमटत असलेलं दबक्या आवाजातलं कण्हणं, त्या भिंतींवर नव्या काव्यपंक्ती लिहीत चाललं होतं. गौरव… मेजर गौरव वत्स… सात गोळ्या आपल्या शरीरात सामावलेला. केवढा तरी रक्तपात झाल्यानंतर, हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, त्याचं जीवंत रहाणं हा मोठाच चमत्कार होता. डॉक्टरांच्या या कथित चमत्कारानंतर, त्याच्या शौर्याची, वीरतेची सगळीकडे चर्चा होत होती. ‘कॉन्ग्रेचुलेशन मेजर.. ’ आणि ‘वेल डन माय बॉय… ‘ सारखे उद्गार भेटायला येणार्यांच्या ओठांवर विराजमान होते. अशा सगळ्या ‘कॉन्ग्रेचुलेशन्स’ आणि ‘वेल डन’वर, गौरवला सगळ्या मर्यादा तोडून आभाळाला जाऊन भिडेल, इतक्या मोठयाने किंचाळावसं वाटतं. कसलं शौर्य? कसली वीरता? जेव्हा त्याचा बड्डी… साथीदार लांस नायाक खुशहाल सिंह याने त्याच्यासमोर प्राण सोडला होता… जेव्हा त्याच्यासाठी बाहेर पडलेल्या गोळीने त्याच्या लाडक्या अतिप्रीय सिद्धार्थचा जीव घेतला, तेव्हा तो काहीच करू शकला नाही. मग यात शौर्य कुठून आलं? किती तरी वेळा त्याला वेदना असह्य होते. खूप मोठयाने ओरडावसं वाटतं पण त्याने स्वत:वर कामालीची बंधने घालून घेतली आहेत. ओठातून बाहेर पडण्यापूर्वीच किंचाळीला मूक व्हावं लागत होतं. तसंही, कुठल्याही सैनिकाला, आपलं दु:ख, आपल्या वेदना, यामुळे कण्हण्याची, ओरडण्याची परवानगी, त्यांची वर्दी देत नाही. ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’चा परीघ, क्रूरतेच्या हद्दीपर्यंत सगळा अंधार, वर्दी आपल्या चमकत्या आवरणाखाली लपवून ठेवते.
तीन दिवस आय. सी. यू. मध्ये बेशुद्धावस्थेत पडून राहिल्यानंतर आज जेव्हा त्याला ऑफिसर वॉर्डमध्ये आणलं गेलं, तेव्हा त्याला त्याचा मोबाईल हातात घेण्याची परवानगी मिळाली. शेकडो एसएमएसनी त्याचा इनबॉक्स तुडुंब भरला होता. पहिला कॉल त्याने गीतालीलाच केला.
‘हाऊ आर यू माय हीरो? ’ स्वत:ला सहज असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करता करता ती हमसून हमसून रडू लागली.
’कमॉन सोना… तूच जर असं करू लागलीस, तर कसं होणार? तूच तर माझी ताकद आहेस ना! ’
‘किती दुखतय? ’
‘आता कुठलं दु:ख सोना! तू विचारलंस आणि सगळं दु:ख गायब. हा… हा… ’ गौरवनं जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला.
’राहू दे… राहू दे… हा डायलॉग तुझ्या गर्लफ्रेण्डससाठी राखून ठेव! ’
‘कुठल्या गर्लफ्रेण्डस बेबी? कधीच सुटल्या सगळ्या… तुझ्याशी बांधला गेलो तेव्हा. बरं मला सांग, मम्मी, पप्पा कसे आहेत? आणि माझी टिप्सी? ’ गौरवने विषय बदलत विचारलं. त्याच्या मनात अनेकानेक एसएमएसनी भरलेला इनबॉक्स चमकत होता. पण ते कुणाचे आहेत, ते त्याला कळणार नव्हतं कारण काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:च सगळे नंबर डीलिट केले होते.
‘न्यूज कळल्यापासून मम्मींचं रडणं थांबतच नाही आहे. पप्पा गप्प गप्प आहेत. आजीचं रडणं पाहून टिप्सीला कळलं, आपल्या पापांना गोळी-बिळीसारखं काही लागलय. काल आपल्या सगळ्या दोस्तांना सांगत होती की तिच्या पापांना गुंडांशी लढताना जखम झालीय. ’ गीतालीचे हुंदके मोबाईलच्या स्पीकरमधून बाहेर पडून वॉर्डमध्ये तरंगू लागले.
हॉस्पिटलच्या मूक भितींवर आधीपासूनच लिहिलेल्या दु:ख, वेदनांच्या कहाण्यांवर नवीन नवीन थर चढत होते. त्याला संग्रामच्या कॉलने थोडासा विसावा मिळाला होता. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक क्षणी त्याची हसरी, खेळकर वृत्ती कायम असायची. अथांग पीडेच्या क्षणीही, त्याच्या कॉलने हसण्यासाठी गौरवला विवश केलं होतं. गौरवकडून सगळं जाणून घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. ऑपरेशनमध्ये कुठे गडबड झाली की ज्यामुळे आतंकवाद्यांचा निपटारा करताना गौरवच्या बटालियनला इतकं नुकसान सोसावं लागलं? झालेल्या क्षितीसाठी नुकसान शब्द छोटाच म्हणायला हवा. यावेळी गौरवला ते जाणवत असणार, ही गोष्ट संग्रामच्या लक्षात येत होती. दोन आतंकवाद्यांना मारून टाकण्यात भारतीय सेनेचा एक कॅप्टन आणि एक जवान यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं आणि एक मेजर अतिशय घायाळ होऊन हॉस्पिटलमध्ये पडला होता. संग्रामने दोन-तीन वेळा विचारल्यावर गौरवने कण्हल्यासारख्या आवाजात म्हंटलं होतं, ‘हे सांग संग्राम, कुणाच्या असण्यासाठी कुणाचं नसणं, नियतीच्या कोणत्या कायद्यात बसतं? ’
‘मला माहीत आहे गौरव तू कॅप्टन सिद्धार्थबद्दल बोलतो आहेस ना? कसं झालं दोस्त हे सगळं? तुम्हाला जर पक्की खबर होती की त्या घरात विदेशी आतंकवादी लपलेले आहेत, तर घरात घुसण्याची काय गरज होती? बाहेरूनच बॉम्ब टाकून घर का नाही उडवलंत? सरकार मालकाला पूर्ण पैसे देतंच की! ’
‘सगळं कसं धूसर धूसर आहे संग्राम… आत्ता मला तू माफ कर. ’
‘ठीकाय! ठिकाय! आत्ता तू आराम कर. स्वत:ची काळजी घे. जे झालं ते झालं. यू डीड युअर बेस्ट… गीतालीचा कॉल आला होता. तुला बघायला श्रीनगरला यायचं म्हणतेय. मला म्हणत होती, घेऊन चल… मलासुद्धा तुला बघावसं, भेटावसं वाटतय. ’
‘कुणीही येणार नाही इथे… मला एकट्यालाच राहू दे. ’ गौरवने ओरडत फोन कट केला.
सगळी मीडिया या ऑपरेशनच्या वेळी सेनेच्या झालेल्या त्रुटीबद्दल हा:हा:कार माजवत होती. संग्रामला माहीत होतं की सत्य काय आहे, ते केवळ आणि केवळ त्याचा जिगरी दोस्त गौरवच सांगू शकतो आणि ते सत्य तो आपल्या चॅनेलद्वारा सर्वांपुढे आणू इच्छितोय. दोघांची दोस्ती लहानपणापासूनची. ‘दो जिस्म मगर एक जान’ सारखा एखादा बिल्ला लावून वाढलेली. मोठी झालेली. आता गौरवच्या आवाजात असलेली वेदना संग्राम आपल्या छातीत अनुभवत होता. संग्रामच्या प्रश्नांनंतर गौरवला पेन-किलरच्या इंजक्शनची अवश्यकता कित्येक पटीने जास्त वाटू लागली होती. शकुंतला मॅमला थोडी काळजी वाटत होती. पेन-किलरच्या इतक्या जास्त डोसाचा काही विपरीत परिणाम तर गौरवच्या शरीरावर होणार नाही ना? . या काळजीपोटीच गौरवने वारंवार केलेल्या विनंतीवरून त्याला हॉस्पिटलच्या परिसरात सिगरेट ओढण्याची परवानगी देण्यात आली होती. गौरवचं म्हणणं होतं की विल्सवाल्यांनी आपली ‘क्लासिक’ नावाची जी चौर्याऐशी मिलीमीटरची नळी… सिगरेट बाजारात उतरवलीय, तिच्या तोडीचं दुसरं पेन-किलर सध्या तरी शक्य नाही. यावर, शकुंतला मॅम आणि गौरवच्या डॉक्टरांचं हसू त्या ऑंफिसर वॉर्डमध्ये किती तरी वेळ खळखळत राहीलं.
वेदनेच्या उत्तुंग लहरींनी भिजलेला फेसाळ किनारा, केव्हढ्या तरी दु:खाचा फेस घेऊन हळू हळू वाहणारा काळाचा प्रवाह गुपचुप बघत होता. काश्मीरच्या त्या ऑक्टोबरच्या कुडकुडणार्या थंडीत धुक्यात न्हालेल्या दुपारी आणि उदास हुडहुडी भरवणार्या रात्रींच्यामध्ये पेन कीलरच्या इंजक्शनच्या गुंगीत असताना मधेच खडबडून जागा व्हायचा गौरव. दूरवरून, ’गौरव सर.. ’ अशी हाक यायची आणि खूप वेळपर्यंत त्याच्या कानाच्या अनंत खोलीत, त्याची झोप उडवत ती गुंजत राहयाची. दूरवरून येणार्या प्रत्येक हाकेसरशी त्याला उठून तिकडे जावंसं वाटायचं पण पोटावर बांधलेल्या भरभक्कम पट्ट्या आणि क्लिपमध्ये अडकवलेला त्याचा प्लॅस्टर घातलेला डावा हात त्याला तसं करण्यापासून रोखायचा. त्या रात्री सिद्धार्थचा आवाज ‘गौरव सर… सेव्ह मी प्लीज… ’, वॉर्डचे झरोके आणि खिडक्या यातून खाली उतरून वॉर्डच्या चारी बाजूच्या भिंतींवर टांगला गेला. डॉक्टरांनी त्याचे पोट आणि डाव्या हातावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून टाके घातले होते, त्याला अवघा दीड आठवडा झाला होता.
आकाशातून बारीक बारीक बर्फाचे फाये हळू हळू खाली उतरत होते. मध्यरात्र होऊन गेली होती. कॅप्टन सिद्धार्थ राय आपल्या फूल बॅटल गिअरमध्ये रक्तरंजित वर्दीसहित वॉर्डच्या एका झरोक्यातून तरंगत तरंगत त्याच्या बेडच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहर्यावरून टपकणारं रक्त गौरवाच्या पोटावर पडत होतं आणि न जाणे, कसल्या उदास, विरक्त दृष्टीने तो टकामका गौरवकडे बघत होता. क्षणभरातच गौरवच्या चित्काराने सगळा वॉर्ड गडबडून उठला. थोड्या वेळापूर्वी शिफ्ट ड्यूटीवर आलेल्या शकुंतला मॅम पळतच गौरवच्या बेडपाशी आल्या. ऑक्टोबरच्या त्या थंडीतही घामाने भिजलेल्या गौरवला पाहून त्या घाबरून गेल्या. त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांनी विचारलं,
‘काय झालं बेटा? आर यू ऑल राईट? ’
‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं… सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.
– क्रमशः भाग पहिला
मूळ हिंदी कथा – ‘गर्लफ्रेंड’ मूळ लेखक – गौतम राजऋषि
अनुवाद – उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




