शालिनी जोशी

? विविधा ?

☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी

भगिनी निवेदिता

 जी स्वतःचा उल्लेख ‘ रामकृष्ण- विवेकानंद यांची निवेदिता’ असा करत असे, ती स्वामी विवेकानंदांची मानस कन्या म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल. यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंड मध्ये झाला. वडील सॅम्युएल आणि आई मेरी यांचे हे पहिले अपत्य. कुटुंब धार्मिक, सात्विक व सुशील होते. मेरी नोबेलने इतर अनेक धर्मशील स्त्रियांप्रमाणे मनात प्रार्थना केली होती, ‘ ईश्वरा, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं तर तुला अर्पण करीन’. ती प्रतिज्ञा खरी ठरली. मार्गारेटने आपले जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. आपले सद्गुरु विवेकानंद यांचे कडून निवेदिता म्हणजे ‘जीवन समर्पित केले आहे अशी’ हे अभिधान प्राप्त केले.

 मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. वडिलांच्या निधनानंतर लंडन येथे शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसतहसत बालशिक्षण या शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करून १८९२ मध्ये नव्या शिक्षण पद्धतीने शिक्षण देणारी शाळा सुरू केली. १८९४ मध्ये क्रांतिकारकानी स्थापन केलेल्या सिनफेन या पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. १८९३ च्या सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १८९६ मध्ये लंडन येथे विवेकानंदांची व्याख्याने त्यांनी ऐकली. त्यांना सद्गुरु मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या कार्यात भाग घेण्यासाठी १८९८ मध्ये निवेदिता भारतात आल्या.

 भारतात त्या कलकत्ता येथे राहिल्या. हिंदू चालीरीती परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदादेवी यांची भेट घेतली. हिंदू धर्म स्वीकारला. हिंदुस्थान हेच कार्यक्षेत्र निश्चित केले. १८९८ मध्ये ब्रह्मवादीनी व्रताची दीक्षा घेतली. इंग्लंडकडून भारताला मिळालेली अमोल देणगी, असा विवेकानंद निवेदिताचा उल्लेख करत. हिंदू पुराणांचा व ग्रंथांचा अभ्यास निवेदिताने केला. विवेकानंदांच्या बरोबर सर्वत्र त्या जात. १८९८ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत स्वामीजी व इतर शिष्यांबरोबर रोगग्रस्तांची सेवा त्यांनी केली. स्वच्छता केली व त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. वेदांतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला. बंगालच्या दुष्काळात लोकांना मदत केली. बालिका विद्यालय सुरू केले. त्याचे उद्घाटन शारदा देवीनी केले. बालविवाहित व अनाथ स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी घरगुती उद्योगांबरोबर आणि भूगोल, इतिहास, गणित हे विषय शिकवले. जेणेकरून स्त्रिया सर्व अंगानी कर्तबगार व्हाव्या. बालिका विद्यालयातील तीन मुलींची संख्या ३० झाली. स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी मातृमंदिराची स्थापना केली. व्याख्याने, लेखन करून सत् मार्गाने मिळवलेला पैसा या कार्यात खर्च केला. मी हिंदू आणि सर्व स्त्रिया माझ्या मुली हा त्यांचा भाव होता. गरजवंताला मदत हे ध्येय होते. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्या सर्वांच्या भगिनी झाल्या.

 स्वातंत्र्य चळवळीतही त्यानी सहभाग घेतला. हे रामकृष्ण मिशनच्या विचाराविरुद्ध होते म्हणून काही काळ ते काम थांबवले. लेखन, भाषण द्वारे स्वदेशी चळवळीत सक्रिय भाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्यांचा कसोटीचा काय होता. पण हाती घेतलेले काम सुरू ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला. बंगालच्या विभाजनाला इंग्रजांना निषेध केला. अशीही अद्वितीय प्रतिभावंत स्त्री विवेकानंदांच्या परिश्रमाने भारतीयत्वात पूर्ण विलीन झाली. मी विवेकानंदांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही. असा पण त्यांनी केला होता. निवेदितांचे जहाल विचार, ब्रिटिश सरकार विरुद्धच्या हालचाली, युवकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल आस निर्माण करणे या कार्यामुळे ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत त्यांच्यावरती राहू लागली होती. युवकांसमोर आपल्या राष्ट्राचे चिन्ह असावे या भावनेने वज्राचे चिन्ह असलेला ध्वज तयार केला. तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे ही कल्पना मांडली व अमलात आणली. परदेशातील क्रांतिकारी चळवळीची ग्रंथसंपदा भारतीय तरुणांना मिळवून दिली. जगदीशचंद्र बसू (वनस्पती शास्त्रज्ञ), रवींद्रनाथ टागोर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ, अरविंद घोष, बंगाली इतिहासतज्ञ रमेशचंद्र दत्त या सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांनी बरेच ग्रंथ व लेख लिहिले. हिंदू संस्कृती आणि समाज पद्धती याविषयीचा त्यांचा ग्रंथ गाजला.

 १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांचे अखेरचे वाक्य होते, ‘ मी आता चालले तरी भारतात ध्येयसूर्याचा उदय मी पाहिनच पाहिन. ‘ त्यांचे कार्य आणि शेवटचे वाक्य युवकांना प्रेरणादायी असेच आहे.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments