डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन? ) 

इथून पुढे – – 

पती-पत्नीमधील परस्पर समजूतदारपणा, प्रत्येक क्षण एकत्र घालवण्याची त्यांची तळमळ आणि त्यांच्या प्रेमभरल्या संवादाचे रूपांतर कंटाळवाणेपणा, ताणतणाव आणि विवशतेत झाल्यावर एकत्र राहणे देखील एक कठोर शिक्षाच होती. लहानसहान मतभेद स्वाभिमानाशी भिडल्यावर मोठे स्फोट घडवून आणतील हे नक्की होते. आम्हा दोघांमध्ये खूप कांही अस्ताव्यस्त पसरले होते. ते प्रेमाचे शेकडो क्षण आमच्या नात्यातील उसवलेले धागे विणण्यास कधीच आले नाहीत. ते जरी आमच्यात तडजोड करायला पुढे सरसावले असते तरी त्यांचे कांहीच चालले नसते, कारण आमच्यातील दरी आणखी रुंद करणाऱ्या कटू क्षणांनी तिथे आपले साम्राज्य व्यापून टाकलेले होते.

ठीक आहे, माझ्या पत्नीशी माझे वैचारिक मतभेद होते, पण मी तिला कधीही क्रूरपणे वागवले नाही. या संबंधविच्छेदामुळे तिला झालेल्या आघातापेक्षा माझ्यावर कोसळलेला आघात कैकपटीने अधिक होता. तिच्याजवळ निदान बिट्टू तरी आहे, मी मात्र पूर्णपणे एकटा पडलोय. माझ्याच मुलाला मला सोडून जावे लागले. आजवर घटस्फोट हा शब्द मला इतका कडवट आणि विखारी कधीच वाटला नव्हता, जितका तो मला आज डागण्या देत होता. या चार अक्षरी वरवर साध्या भासणाऱ्या शब्दाने माझे स्वतःचे अस्तित्वच माझ्यापासून हिरावून घेतले होते. आज मी माझ्यापासूनच विलग झालो होतो. आपल्या मुलापासून वेगळे होणे आणि वर्षानुवर्षे खपून एक एक काडी जोडून बांधलेल्या माझ्या उबदार घरट्यातून बाहेर पडणे या गोष्टी अशा होत्या, जणू कांही माझ्या आत्म्याला माझ्या देहातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मला सांगण्यात आले होते की जा आणि जशी इच्छा असेल तसे मनस्वीरित्या जग!

त्या सुखद काळी आम्ही एकमेकांना आनंदात ठेवण्यासाठी यादी बनवायचो. आता मात्र त्याच यादीत आरोपांची सरबत्ती केल्या जाऊ लागली होती. तिच्याकडूनही आणि माझ्याकडून देखील. जेव्हां दोन भांडी पोळपाट लाटण्यासारखी प्रेमाने एकत्र नांदत होती, तेव्हां लाटण्याचा वापर आयुधासारखा नव्हे तर पोळ्या लाटण्यासाठी व्हायचा. तेव्हां आम्ही घर परिवाराचे एकत्रिपणे पालनपोषण करीत होतो. मात्र हीच भांडी जेव्हां एकमेकांना भिडून आदळआपट करायला लागली तेव्हां त्या वारंवार आघाताच्या आणि प्रतिघाताच्या माऱ्याने पिचून पिचून त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या. भांड्यांसारखे घराचे देखील तुकडे होऊन ते दिशाहीन दिसू लागले. वर्षानुवर्षे ज्या प्रेम आणि विश्वासाच्या पायावर आमचे घर ठामपणे उभे होते, त्याचा पायाच आता डळमळीत झाला होता. याची शिक्षा आम्हाला भोगावी लागतेय. मला, तिला आणि माझ्या लहानग्या बिट्टूला देखील!

तिच्याजवळ बिट्टू होता, तिच्या मुखावर हास्य फुलण्याचे हे एक कारण निश्चितच होते. तो तिला नक्कीच प्रसन्न ठेवणार. तो तिला एकटेपणाची जाणीव देखील होऊ देणार नाही. बिट्टू माझी किती आठवण करेल हे मला जाणवत होते. समुद्रकिनारी अवचितपणे माझ्या जवळ आलेले हे मूल कदाचित त्याच्या बाबांना शोधत आले असावे. कदाचित असे नसेलही, पण तरीही माझ्याकडे येण्याचे काही कारण असेल तर, हेच एकमेव कारण असणार याची मला खात्री होती.

हे दुःस्वप्नाहून अति भयानक वास्तव होते. प्रलयंकारी! क्रूर कालगतीने बिट्टूला माझ्यापासून हिसकावून नेले. असा कठोर दंड किती वेदनादायक असतो. या असहनीय पीडेने एका चालत्या बोलत्या जीवनाला पूर्णविराम देत संपवूनच टाकले. माझ्यासाठी तर आता संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत होते. जणू काही माझ्या शरीरातील प्रत्येक भाग अखिल धरणीसह बधिर झाला होता आणि त्यांनी कामाशी असहकार पुकारला होता. त्या माझ्या परमप्रिय घरातून माझे शरीर निघून गेले, पण मी खरोखरच त्यातून बाहेर येऊ शकलो कां? आपल्याच घरापासून स्वतःला असे विलग करणे किती कष्टप्रद असते, जणू काही तिथे तुमचे स्वतःचे काहीही नव्हते!

तसे तर मी समुद्रकिनारा न्याहाळत होतो, पण होरपळून टाकणाऱ्या जळजळीत उन्हामुळे आणि माझ्या अंतरंगाला चटके देणाऱ्या आतील अग्नीच्या मिश्रित झळीमुळे माझे डोके जड होत होते. मी बाहेरच्या कडक उन्हापासून वाचण्याचा फक्त प्रयत्नच करीत राहिलो, कारण तिथे सावली देणारी हिरवी झाडे किंवा कोणत्याही प्रकारचे छप्पर दृष्टीस पडत नव्हते. माझ्या अंतर्यामी देखील प्रेमाच्या सावलीचा संपूर्ण अभाव होता. तप्त उन्हाचे चटके लाल अंगारांसारखे जळत आणि जाळत होते. मी असहाय्य आणि लाचारासारखा हे सर्व सहन करीत होतो. वर भाजणारे मोकळे अस्मान आणि खाली उन्हाचा तडाखा अंगावर झेलणारी उघडी बोडकी धरणी.

संध्याकाळ दाटून येण्यापूर्वी धूर देखील गर्द गडद होणार. या वेळी तरी तीव्र सूर्यप्रकाशाने उष्णता कायम ठेवत आपले वर्चस्व राखले होते. मी सूर्यस्नान करण्यासाठी नव्हे तर सागराच्या शीतल लहरींमध्ये सचैल भिजण्यासाठी आलो होतो. माझ्या आत पेटलेल्या वणव्याला शांत करण्यासाठी मी तळमळत होतो. मी लाखोंनी पैसे गमावले होते, मात्र मला त्याची पर्वा नव्हती. पण माझा लाडका बिट्टू? मी त्याला कसं विसरू? एखाद्याच्या आत्म्याला शरीरापासून तोडून वेगळे करणे इतके सोपे कां आहे? मानसिक यातना देण्याचे हे सर्वात तीक्ष्ण शस्त्र आहे.

मला तर आनंद व्हायला हवा होता कारण रोजच्या कटकटीतून मी एकदाचा मुक्त झालो होतो. पण नाही, पराभूत झालेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी पराभवाचाच अनुभव येतो. तिथे निदान बिट्टूसोबत तरी राहिलो असतो. त्याच्या एका गोड हास्याने मला सर्व कांही परत दिले असते. म्हणून तर त्याच्यापासून दूर राहून फक्त फक्त एक दिवस सुद्धा लोटला नव्हता आणि मी त्याच्या स्पर्शाकरिता इतका व्याकुळ झालो होतो.

पिता होणे इतके कष्टदायक का आहे? नऊ महिने कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात आपले मूल वाढतांना पाहतांना आणि अनुभवतांना माझी खूप तडफड व्हायची. मी माझे कान लिलीच्या पोटावर टेकवून बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचो. दररोज, माझी नजर त्या न जन्मलेल्या बाळामध्ये माझे स्वतःचे प्रतिबिंब शोधत होती. कसं होईल? सगळं ठीक असेल ना आत? आणि आता या घटकेला घटस्फोटानंतर, माझा अंश असलेल्या त्याच बाळाला त्याच्या आईकडे सोडून आलोय मी. जणू काही आता माझा त्याच्यावर कुठलाच अधिकार नाही. काय ही जबर शिक्षा! मीच कां म्हणून भोगायची? कारण मीच पिता आहे ना. त्याला न भेटल्याचे विदीर्ण करणारे क्लेश आणि त्या जखमेवर मीठ चोळणारा कायद्याचा आसूड. त्याच्या तिळातिळाने वाढणाऱ्या अंगप्रत्यंगाचा साक्षीदार असलेला मी एकाएकी त्याच्या आयुष्यातून वजा झालो.

माझा ताणतणाव कमी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येणे मला आता निरर्थक भासू लागले. शरीर कुठेही असले तरी, मन तर ज्या स्थानाशी जोडल्या गेलंय, तिथेच राहण्यासाठी तळमळत असते ना! माझे डोळे गडद अंधाराशिवाय कांहीच बघू शकत नव्हते. इतका मिट्ट काळोख असल्यावरही प्रभातीचा प्रकाश येऊ शकेल कां? कितीही अंधार असला तरी उगवतीच्या उजेडाला तो थोडाच रोखू शकतो? पण दुर्दैवाने प्रत्येक उगवतीला प्रकाशाची सोबत नसते. काही प्रभात बेला इतक्या काळ्याभोर असतात की येणाऱ्या कित्येक तेजोमय दिवसांना देखील त्या आपल्या कृष्णरंगाने झाकोळून टाकतात.

मला आता कळते आहे, मला प्रत्येक येणाऱ्या दिवशी या सर्व भावनिक कल्लोळाचा सामना करावा लागणार आहे. वाटले होते की मनमोहक निसर्गाने वेढलेल्या या स्थानी मला थोडेफार समाधान मिळेल आणि खरं सांगायचे तर ते मिळाले सुद्धा! माझ्या माथ्यावर एक सुखद समाधान रेंगाळले. कपाळावर जाणवला त्याच मऊसूत तळहाताचा मखमली स्पर्श. मी डोळे उघडले तर ते गोड गोजिरे बालक माझ्याकडे बघत खोडकरपणे हसत होते. त्याने लगेच पळून जाऊ नये आणि मला त्याचा सुगंधी स्पर्श दीर्घकाळ जाणवत राहावा म्हणून मी लगेच डोळे मिटले. यावेळी मी ठरवले की हे मधुर स्वप्न खंडित होऊ नये म्हणून मी डोळेच उघडणार नाही. बस, त्याच्या या बाललीला अनुभवीत राहीन. कदाचित या खेळातून त्याला माझ्यात त्याच्या पित्याचे अस्तित्व जाणवत असेल आणि मला त्याच्यात माझ्या मुलाचे! या क्षणी आम्हाला दोघांनाही एकमेकांची नितांत गरज होती. आम्ही आपसात बोलत नव्हतो, पण एकमेकांच्या स्पर्शातील मूक संवाद सर्व कांही सांगत होता. जणू आमच्या जिभेवर गूळ होता. त्याची गोड चव जिभेला माहित होती, पण त्याचे वर्णन करायला ती असमर्थ होती. आमच्या नजरानजरेतून ती मिठास मानसिक समाधान देऊन जात होती. त्याची आणि माझी इच्छा या दोन्हींचा जणू समाहित मधुरस!

मी डोळे उघडलेले नाहीत असे बघितल्यावर त्याचा मधुर किलबिलाट सुरु झाला. दुरून त्याच्या आईची साद ऐकू आल्यावर देखील तो जागचा हलला नाही. त्याच्या आईने जवळ आल्यावर त्याला हाक मारल्याने मी लगेच डोळे उघडून त्याच्याकडे डोळे भरून पाहिले आणि तोही निघून गेला. जातांना त्याच्या चेहेऱ्यावर खोडकर हास्य विलसत होते. मी देखील ‘बुडत्याला काठीचा आधार’ या न्यायाने त्या हलक्याश्या स्मिताचे बोट धरून पैलतीर गाठून स्वतःचा जीव वाचवला होता. एक क्षितीजाच्या रेखेसारखी अस्पष्ट आशा. धुराचे लोट पुन्हा दाटत होते, जणू आम्हाला घरी परतण्यासाठी ताकीद देत होते. जंगलालाही सारखे सारखे जळत राहिल्याने जणू ग्लानी आली होती. या जाळपोळीच्या भीषण कलहातून त्याला जणू स्वतःला वाचवायचे होते. मला आणि त्या मुलाला देखील हेच हवे होते. आमच्या सर्वांच्या आतले जंगल अग्नीचा घास घ्यायला तयारच होते. आगीला कवेत घेत ते बुभुक्षित वन धुराची वलये फेकीत जणू सिगारेटचा आस्वाद घेत होते.

माझ्यापासून दूर जाताना त्या मुलाने जोरात किलबिल केली. मी त्या संकेताला ओळखत त्याला प्रेमभरल्या नजरेने पाहिले. आमच्या दोघांतील मूक भाव एकमेकांना म्हणत होते, “पुन्हा भेटू या! ” मी जाणत होतो की हे निव्वळ मृगजळ होते. मात्र माझ्या माथ्यावर त्या गोजिरवाण्या स्पर्शाची अनुभूती अजूनही रेंगाळत होती.

त्या आश्वस्त करणाऱ्या शांत शीतल नजरेने ऋतुमानाला देखील पाझर फुटला होता. काळे सावळे कृष्णमेघ अंबरात दाटीवाटीने गर्दी करीत होते.

हे वरूण राजा! त्या निष्पाप बालकासाठी तरी कृपा करून जलवर्षाव कर, जेणेकरून प्रत्येक रानावनात धुमसत असलेला कोपिष्ट अग्नीदेव शांत होईल!

समाप्त –  

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments