शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’ ☆ शीला पतकी ☆
☆
सोलापूरची खरी ओळख गिरणगाव म्हणून होती. आता एकही गिरणी शिल्लक नाही हा भाग वेगळा पण गावाची सुरुवातच मुळी गिरणीच्या वाजणाऱ्या भोंग्यान व्हायची. जुनी गिरणी, लक्ष्मी विष्णू, जाम मिल, फुटाणे गिरणी म्हणून पण एक होती. अशा गिरण्यांच्या भोंग्याच्या आवाजाने गावाला जाग येत असे. गिरणीत पाळी बदलली की भोंगा वाजायचा तोच अख्या गावाला घड्याळाच टाइमिंग दाखवायचा. पाचच्या भोंग्यावर पाणी यायचं माणसं उठायची… पाण्याचा आवाज… पाण्याच्या भांड्यांचा आवाज… मग कोणाची आदळ आपट… आणि सोलापुरातील खास विषय म्हणजे नळावरची भांडण…! सरकारी नळ असायचे. त्या नळावर अख्या गल्लीची गर्दी… वाड्यातनही अनेक बिर्हाडामध्ये एखादा नळ… तसं तर पाणी दोन वेळा यायचं… पण वाड्यात 100- 100 माणसं. वरच्या मजल्या वरील लोकांना जिन्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन पाणी भरावे लागे मोटर वगैरे नव्हत्या.
लाईट जेमतेम संध्याकाळ झाल्यावर तेसुद्धा रात्री नऊ पर्यंत चालू असे. त्यानंतर सगळ्या वाड्याचा लाईट बंद.! अभ्यास करणारी पोरं मग कंदीलावर अभ्यास करत असत अरे आमका पोरगा कंदीलावर अभ्यास करून मोठा झाला… असं काही नाही सगळीच पोर कंदीलावर अभ्यास करत होती. मुन्सिपालटीच्या दिव्यावर म्हणावं तर त्याच्यात संध्याकाळी एक माणूस तेल घालून जायचा त्या तेलावर तो दिवा किती वेळ जळणार मग तेही दिवे मालवून जायचे. अशी ही दिव्याची दिव्य कथा! त्यामुळे सकाळी नळावर भांडण नाही झाल असा दिवस नव्हता अर्थात ती भांडण तात्कालीक असायची. त्याचवेळी संडासला रांगा लागलेल्या. तीन-चार बिराडात एक बाथरूम कॉमन… सगळ्यांची आंघोळीची घाई… भांड्याचा खणखणाट संपेपर्यंत… धुण्याचा धपधपात चालू व्हायचा…
त्यानंतर बटर विकणारी माणसं ओरडत यायची सकाळची ही चहा बटरची सोय झाली की मग एखादा उसsssळ असे ओरडत यायचा. आम्ही मुस्लिम गल्लीत राहत असल्यामुळे म्हणजे काळी मशीद भागात… सहा वाजताच गल्लीत असलेले थोबडे आणि अण्णाप्पा व्हट्टेते चे दुकान उघडून ती मंडळी तयार असायची. थोबड्यांचे दुकान आमच्या वाड्याच्या खालीच असल्यामुळे दुकानाचा एक दरवाजा वाड्याच्या बाहेर आणि दुसरा दरवाजा वाड्यात असा उघडत असे. त्याच्या शेजारीच त्यांच्या दोन खोल्या कधी कधी थोबडे मामाला मदत करायला आम्ही वाड्यातली पोरं जात असू कारण सकाळी गडबड असायची ना सकाळच गिऱ्हाईक आणि वस्तू ठरलेल्या… “मामा दोन बाई छाप दो(म्हणजे चहा पुड्या), एकाने की मसूर डाळ, एक आने का तेल, दो पैसे के फल्या म्हणजे भाजक्या शेंगा, दो पैसे की शक्कर, दो पैसे की मसाला पुडी और चार आणे का जवारी का पीठ”… सगळी यादी थोबडे मामांना तोंडपाठ असायची त्यांचे हात वेगाने काम करायचे मदतीला आम्ही असायचोच एवढ्या कमी पैशात त्या गरीब माणसाची सकाळ भागत होती… हे मला आता विचार करताना लक्षात येतं.!
ही लगबग संपेपर्यंत वाडा थोडा शांत झालेला असायचा एखाद्या घरचा सकाळी सहा वाजता बॅटरीवर लावलेला सकाळचा रेडिओ त्याच्यामुळे अख्ख्या वाड्याची सुरुवात बिस्मिल्ला खानच्या शहानाईने व्हायची… सुधा नरवणे बातम्या देत आहेत… या आवाजाने घरातल्या आया पोरा सोरांना उठायच्या, “उठा रे सुधाताई आल्या सात वाजले” अर्थात आळशी राहिलेल गदळ त्यावेळेला उठायच. चहाचे सुगंध आणि कपबशाच्या मधुर आवाजांचा किणकिणाटात उषःकाल संपलेला असायचा आणि घराघरातून स्टोव्हचे शेगड्यांचे आवाज यायचे. खमंग फोडण्याचे वास तुरीची डाळ आणि भात शिजल्याचा वेगळाच वास ती भाताची रटरट. तो फोडणीचा तडतडाट आणि खमंग वास… आसमंतात भरून राहायचा.. आणि गंध आणि नाद यांच्या आवाजाची जुगलबंदी कानाला सुख द्यायची. पाठोपाठ धपाधपा भाकरी बडवल्याचा आवाज..
कुठेतरी पोरांच पाठांतर. कविता वाचन कुठेतरी पूजेच्या घंटा.. कुठेतरी आरती.. आणि पोरग अभ्यास करीत नाही ऐकत नाही रट्टे खाऊन ओरडण्याचे व्रात्य पोरांचे आवाज. वाड्याच्या प्रत्येक घरात वेगवेगळे काम चालू असायचे. मग शाळेला जायची गडबड पोर सर्व जेवण करून शाळेला निघाली कि अकरा वाजता सुधा जोशी.. कामगार सभेच्या कार्यक्रमाला हजर..! पोरं शाळेला पळाली कि आया जरा मुक्तपणे… दत्त दिगंबर दैवत माझे किंवा असावे घर ते आपले छान किंवा कौसल्याचा राम बाई अशा माणिक बाईंच्या आवाजात गुंगून जायच्या. भाजी फारशी दारावर येत नसे कारण आमच्या गल्लीतच भाजीचे छोटे मार्केट होतं कधीतरी एखादा शेतकरी बैलगाडीवर मेथीच्या पेंड्या घेऊन येत असे आणि दहा नव्या पैशाला एक पेंडी याप्रमाणे तो मेथी विकून गाडी रिकामी करूनच जायचा. त्याचा आवाजाच भारी… “महागाईत सस्ताईची कमाल 10 पैसे 10 पैसे “असे मोठ्या आवाजात ओरडून तो भाजी विकायचा. मध्येच दहीवाला दहीsss म्हणून ओरडून जायचाआणि सकाळचे आवाज संपायचे.
पुरुष मंडळी गिरणीमध्ये.. पोरं शाळेत.. मग बायका मंडळींचच राज्य… त्या बिचाऱ्या सगळ आवरून विश्रांती घेत तोवर सकाळच्या शाळेत गेलेली पोरं परत यायची त्यांची उस्तवारी करायची… थोड्या आडव्या पडल्या की त्यांचं दुपारी निवडण टिपण सुरू कारण त्या काळातल येणार धान्य निवडलेलं नसायचं… तांदळात गारेचे खडे असायचे… ज्वारी गव्हात खडे असायचे… मोहरी तर विचारूच नका.! आता कसं सगळं स्वच्छ निवडलेले मिळते, अगदी रेडी टू कुक! तेव्हा फक्त घरातली बाई रेडी टू कुक असायची.
दुपारचे आवाज वेगळेच असायचे दुपारी बर्फ गोळा.. बुड्डी का बाल… काळी मैना… ए कुल्फी एक डहाळे किंवा काय घोंगडीला रेवड भरायची कायssss असे आवाज करीत तांबड पागोटे आणि खांद्यावर घोंगड आणि हातात लोकरीची टकळी फिरवत रेवड वाला यायचा यायचा(रेवड म्हणजे घोंगड्याच्या टोकाच्या बाजूला घातलेली वीण त्यामुळे त्याचं धागे सुटू नयेत)… त्याबरोबर बोहारणीचा एक आवाज असायचा “काय हाय का जुने कापडं… ” असा टिपेला गेलेला आवाज असायचा मग बाया बापड्यांची तिच्याभोवती गर्दी एक तास मनोरंजन…! जुन्या कपड्यावर केलेल्या खरेदीचा आनंद! त्याच वेळेला खाली.. दिल्ली का लाल किल्ला देखो… आग्रे का ताजमहाल देखो.. असे टाळाचा नाद करीत सिनेमा दाखवणारा माणूस यायचा त्याच्या त्या तिपाईवर एक यंत्र असायचं.. वरच्या बाजूला एक बाहुली… त्याने दोर्या आवळल्या कि ती बाहुली नाचायची समोरच्या डब्याचे झाकण काढून पोरं सिनेमा बघायची… सिनेमा कसला एका पैशात चार-पाच चित्र दाखवायचा मजा होती…
पण चार वाजता गिरणीचा भोंगा व्हायचा कामाला गेलेली माणसं परत येईतो गाव हळूहळू थकत गेलेल असायचं! घरोघरी कंदीलाच्या काचा पुसून संध्याकाळची तयारी व्हायची तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावायचे. काही घरात आरती व्हायची… काही घरात शुभंकरोती.. वाड्यात खेळणाऱ्या पोरांचे आवाज हळूहळू बंद व्हायचे! रस्त्यावरती मंद प्रकाश… प्रकाशाचा झगमगाट नसल्यामुळे सारा दिवस मिटत आल्यासारखा भासायचा. तोच एका लाकडी ट्रेमध्ये आलेपाक च्या वड्या आणि ढणढण जळणारा दिवा घेऊन ए आले पाक वाला आलेपा ssssकअसे ओरडत एक आलेपाक वाला यायचा आणि हलकेच तो त्या धुरात नाहीसा व्हायचा. तो शेवटचा विक्रेता. बुधवार असेल तर वाड्यातल्या एकमेव कुठल्यातरी रेडिओवर बिनाका गीतमाला ऐकायला मात्र चढाओढ असायची. कुठलं गाणं कुठल्या पायदान वर यायचे याची चर्चा असायची त्या एकमेव घराला.. ” काकू रेडिओचा आवाज थोडा मोठा ठेवा ना “… अशी प्रेमळ सूचनाही केली जायची. साडेआठ वाजताच मशिदीतली अजान व्हायची मग नमाज… नऊ पर्यंत सगळे खाऊन पिऊन अंथरुणावर जायचे नऊच्या दरम्यान सगळे दिवे मालवले जायचे कुठेतरी एखाद्या घरात चिमणी किंवा कंदील लागलेला असायचा कुठल्यातरी घरातून लहान लेकराला झोपवण्यासाठीचा अंगाईचा आवाज, जवळच्या मठातून टाळाचे, भजनाचे, आवाज यायचे.! रस्त्यावरची रहदारी केव्हाच बंद झालेली असायची. रिक्षा गावात नव्हत्या एखाद दुसरी मोटार,… चार दोन टांगे त्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज… सायकलच्या घंटेची टिंग टिंग… या पलीकडे रस्त्यावर आवाज नव्हते! मग सारा शहर शांत व्हायचं आणि आनंदाने निद्रा देवीच्या आधीन व्हायचे… रात्री क्वचित रस्त्यावर एखाद्या दारुड्याची वेडी वाकडी चाल आणि बरळणं ऐकू यायचं एखाद्या घरात नवरा बायकोला बदडून काढायचा आणि तीही त्याला ठोकायची कारण तो त्यानंतर दारू पिऊन आलेला असायचा एवढे गोड आवाज संपले की दिवस संपला…!
– – – आवाज की दुनिया पूर्णपणे निद्रिस्त व्हायची गिरणगावची सारी दारिद्र्य दुःख दैना त्या परमेश्वराला हात जोडून सांगितली की तो दिवस संपवून जाई आणि सार शहर उद्याच्या आशेच्या किरणाची… पक्षांच्या चिवचिवाटाचीआणि पुनः त्याच आवाजाची वाट पाहत शांत झोपी जायचं आणि मधेच कधीतरी एखाद्या कुत्र्याच केकाटणे चालू राहायचं… रात्रीच्या त्या निरव शांततेचा शेवट रात्री बारा वाजता गस्त घालायला येणाऱ्या रामोशाच्या आवाजाने व्हायचा. तो ओरडायचा जागते रहो ssssजागते रहो ssssआणि गंमत म्हणजे त्या वेळेला सार शहर निद्रा देवीच्या आधीन गेलेल असायचं…!
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
