सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१)  मुलाचं प्रेम 

आज हॉस्पिटलमध्ये दाखल केलेली एक आई बहुतेक शेवटचे श्वास मोजत होती. आईची ती तशी अवस्था पाहून तिच्या मुलाला – नवलला अतिशय वाईट वाटत होतं …. आणि हतबल झाल्यासारखंही. केविलवाणेपणाने तो त्याच्या व्हाट्सअप.. फेसबुकवर असणाऱ्या मित्रांना सारखा मेसेज पाठवत होता ….

“ मित्रांनो माझी आई खूप जास्त आजारी आहे. तिला लवकर बरं वाटावं म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आणि प्रार्थनेची फार फार गरज आहे … “ 

बऱ्याच मित्रांनीही लगेचच आपलेपणाने शुभेच्छांचे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली…. आणि नवल अशा प्रत्येक मेसेजबद्दल धन्यवाद देण्यात गर्क झाला. पण व्हाट्सअप वरच्या एका मित्राने मात्र तो मेसेज वाचल्यावाचल्या आपल्या भावना मेसेजमधूनच व्यक्त करून न थांबता, तडक हॉस्पिटल गाठलं. प्रत्यक्षच जाऊन भेटलं तर नवलला जरा दिलासा मिळेल आणि त्याच्या आईसाठी नक्कीच काहीतरी करता येईल या भावनेने…

तो गेला, नवलजवळ बसला… नवललाही बरं वाटलं… आणि मग त्या मित्राने आईची प्रकृती सुधारण्याचा एक अचूक आणि खात्रीशीर उपाय नवलच्या कानात सांगितला…. पण तो उपाय ऐकून नवलच्या चेहेऱ्यावर पसरलेली चिंता कमी होण्याऐवजी दुपटीने गडद झाली.

त्या मित्राने नवलच्या कानात फक्त एवढंच तर सांगितलं होतं की … “ नवल तू लगेच आत आईजवळ जा, आणि तिच्या कानात फक्त एवढंच सांग की … ‘ आई … तू लवकरात लवकर बरी हो ना … तुझ्यावाचून घर अगदी सुनं सुनं वाटतंय गं! ‘ “ ….

तो मित्र दुसरा तिसरा कोणी नव्हता …. तर वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता…

मूळ हिंदी कथा : बेटेकी ममता  

लेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(२)  माकडाचं स्पष्टीकरण…

दिवसभर दाणा पाणी शोधत इकडे तिकडे वणवण करत ती चिमणी फिरत राहिली होती. सगळं लक्ष मात्र घरट्यातल्या पिल्लांकडे होतं. संध्याकाळ झाली तशी ती घरट्याकडे परत फिरली. पण आज येतांना तिला नक्कीच काहीतरी वेगळंच जाणवत होतं. गावातली सगळी कुत्री आणि इतर सगळे प्राणीही अतिशय दु:खी दिसत होते …

‘कुठलाच आवाज नाही …. उगीच ओरडणं नाही … भांडणं नाहीत. असं तर कधीच होत नाही … मग आज का असे गप्प झालेले दिसताहेत सगळे.. आणि खूप दु:खी असल्यासारखे? नेमकं काय झालं असेल … आणि तेही एकदम या सगळ्यांच्या बाबतीत? ‘ … आता तिलाच फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. घरट्याजवळ येऊन ती झाडावर जराशी विसावली, इतक्यात शेजारच्या फांदीवर तशाच चिंताग्रस्त चेहेऱ्याने बसलेलं चिंटू माकड तिला दिसलं. ती पटकन उडून त्याच्याजवळ जाऊन बसली आणि मनातला प्रश्न त्याला विचारला… 

त्यावर चिंटू म्हणाला.. “ काय सांगू चिऊताई तुला.. अगं आज या गावात कसलं तरी आन्दोलन चाललं होतं. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ” 

“अरे बाप रे.. फार वाईट झालं हे… पण त्यामुळे माणसं दु:खी दिसण्याऐवजी हे प्राणीच जास्त दु:खी झालेले दिसताहेत की. असं का?“

… चिमणीच्या या प्रश्नावर चिंटू माकडाने अगदी सविस्तर उत्तर दिलं…

“आता काय सांगू तुला? काय झालंय की त्या दंगलीत मेलेली माणसं वेगवेगळ्या जातींची आहेत.. एका जातीतली तीन माणसं दगावली आहेत, आणि इतर जातींची प्रत्येकी दोन माणसं दगावली आहेत… का ते माहिती नाही, पण प्रत्येक जातीतली माणसं फक्त आपापल्या जातीतल्या माणसांसाठी दु:खी झाली आहेत … शोक व्यक्त करताहेत. … पण ही सगळी कुत्री आणि इतर प्राणी आहेत ना.. त्यांना त्या सातही माणसांच्या मरणाचं मनापासून दु:ख होतंय… कारण काय माहितीये? .. कारण त्यांना त्या सातही जणांमध्ये ‘ फक्त मनुष्य ‘ दिसतो आहे ना … म्हणून ….

मूळ हिंदी कथा : बंदरका विश्लेषण 

कथालेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(३) सन्माननीय वेडा – – – 

‘‘काय हो काका… हल्ली सकाळीच असं बागेत आल्यावरच काय होतं तुम्हाला? इथे मॉर्निंग वॉक करत असलेल्या माणसांकडे असे रोजच त्यांचे फोन मागत असता.. ते का? तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने असं वागणं योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? ”… 

.. बागेत अशोकरावांबरोबर चालत असलेल्या अनिलने त्यांना विचारलं… ‘‘आणि मला तर हेच समजत

नाहीये की इथे येतांना तुम्ही स्वत:चा फोन का घेऊन येत नाही? दुसऱ्या कुणाकडे तरी त्याचा फोन

का मागायचा? तुमच्या अशा वागण्यामुळे लोक तुम्हाला वेडा म्हणायला लागलेत, माहितीये का तुम्हाला? ”

‘‘अरे बापरे… असं झालंय का? ” अशोकराव खदखदून हसले. ‘‘म्हणजे मी असं का करतो हे तुमच्याही लक्षात आलं नाहीये का? अहो इथे फिरायला आलेल्या सगळ्या लोकांकडे मी त्यांचा फोन मागतो…खरंय.. पण कशासाठी मागत असेन? मला एखादा फोन करायचा असतो म्हणून? इथे येतांना मी माझा फोन बरोबर आणत नसेन असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाहीये… माझा फोन नेहेमी माझ्याबरोबरच असतो. हा बघा.. पण मी असा विचित्र वागतो त्याचा परिणाम लक्षात आला नाही का तुमच्या? मला घाबरून म्हणा… किंवा माझ्यावर चिडून म्हणा… पण रोज सकाळी इथे फिरायला येणारे लोक हल्ली एकतर इथे त्यांचा फोन घेऊन येतच नाहीत, नाहीतर माझ्या भीतीने फिरतांना आपला फोन खिशातच ठेवायला लागले आहेत… आणि मला हेच तर हवं होतं! ”

‘‘पण असं का व्हायला हवंय् तुम्हाला? ”

‘‘ कारण ऐकायचे आहे? मग ऐका… त्याचं कारण इतकंच की सकाळी सकाळी इथे व्यायाम करायला, किंवा तब्बेत सुधारण्यासाठी म्हणून येणाऱ्या लोकांनी फक्त त्यांच्या आरोग्यावर, शरीर स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करावं… मोबाईलवर नाही असं मला वाटतं. मोबाईलसाठी तर उरलेला सगळा दिवस आणि पूर्ण रात्र असते ना त्यांच्यासाठी! अहो इथे आल्यावर मला नेहेमी असंच चित्र दिसायचं की लोक चालता चालताही त्या फोनलाच चिकटलेले असायचे… फोनवर सतत कुणाशी तरी बोलत असायचे… अगदी व्हिडिओ-कॉलही करत असायचे… आणि त्या नादात चालत असतांना चक्क पडायचेही कितीदा तरी… नाहीतर कुणाला तरी धडकायचे… पाय एकीकडे आणि नजर एकीकडे असंच असायचं ना! ..

… पण आता बघा… सगळे कसे शिस्तीत फक्त आपल्या चालण्याकडे.. पर्यायाने स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देत असतात… आणि त्यांच्या स्वत:च्या नकळत या वेड्याचा हेतू पूर्ण करतात. ”… इतकं बोलून अशोकराव पुन्हा तसेच खदखदून हसले… 

… आणि अनिल विशेष आदराने त्यांच्याकडे पहात राहिला…

मूळ हिन्दी कथा: सम्माननीय पागल 

कथाकार : श्री. संतोष सुपेकर, उज्जैन 

मराठी अनुवाद : मंजुषा सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments