श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(‘टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिन मे..

त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.

त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.

 हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगीने दार उघडायला गेली.) 

– इथून पुढे – – 

आईला बघताच मुग्धा धावली आणि तिने आईला कडकडून मिठी मारली..

‘आई शेवटी आपण जिंकलो.. शिरा दे आधी..

‘हो बाई.. शिरा करून तुझीच वाट पहाते आहे… सहाशेच्या वर निश्चित ना? कारण त्या मुल्लाना अजून दिढ द्यायचे आहेत..

‘हे शेवटचे ना आई? आणि नाही दिले तर?

‘अग त्या लोकांचे हात वरपर्यत पोचलेले असतात.. ते पासाचे नापास करू शकतात.. सारी यंत्रणा पोखरली आहे ग यांनी..

‘पण आता हे पैसे कसे जमवणार?

‘मुग्धा.. बाबांना लपवून पैसे उभे करणे सोपे नव्हे. मी हे सर्व माझ्या जबाबदारीने तुझ्यासाठी केल… बाबांनी पैसे खाल्ले असते तर असे पैसे सहज देता आले असते.. पण तुझे बाबा म्हणजे तत्वाचा माणूस.. पहिले पाच लाख देताना आईने लग्नात घातलेल्या बांगडया विकल्या.. मग दिढ लाख देताना चेन विकली.. आता पाळी या पाटलीची..

‘पण आई.. बाबांना कळले नाही ना अजून?

‘त्यांचे माझ्या दागिन्याकडे लक्षच नसते.. त्यांची पुस्तके आणि वाचन.. डुप्लिकेट दागिने घालून सध्या मी मिरवते आहे..

‘आई.. तू काळजी करू नकोस.. मी फक्त डॉक्टर होउदे.. तुझे सर्व दागिने परत तूझ्या गळ्यात घालते कीं नाही बघ..

‘हो ग बाई.. तू मोठी हो. स्वतः पैसे मिळव.. आमच्यासारखे नवऱ्यावर अवलंबून राहू नकोस..

‘बघच आई… मी किती पैसे मिळवते ते..

दोघी शिरा खाता खाता बोलत होत्या.

आपली सोन्याची पाटली विकून मंजुने मुल्लासरांचे पैसे पुरे केले. पुन्हा एकदा डुप्लिकेट पाटली तिच्या हातात आली.

रिझल्टला वेळ असल्याने मुग्धाने नॉर्थ ईस्टची ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आनंदाने सर्व खर्च केला.. ट्रिपचे फोटो ती आईबाबांना पाठवत होती आणि प्रत्येक ठिकाणची वर्णने पण टाकत होती.

मुग्धाला फिरायला, ट्रेकिंग करायला फार आवडे.. पण शाळेचा आणि मग नीट परीक्षेचा अभ्यास असल्याने तिला हा छंद बाजूला ठेवायला लागला होता.

मंजू आनंदात होती.. मुग्धा ट्रिप एन्जॉय करत होती.. आता काही दिवसात नीट परीक्षेचा निकाल लागायचा होता.. त्यात ती सहाशेच्यावर स्कोर करणार होती.. मग टॉप मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एम्समध्ये तिला ऍडमिशन मिळणार होत…. पण?

अचानक टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या..

“नीट परीक्षेत गडबड… सरकारने परीक्षा रद्द केली.. पुन्हा नीट परीक्षा होणार.

मुग्धाने मोबाईलवर ही बातमी वाचली. तिच्या काळजात धस्स झाले.. तिने टीव्ही लावला.. तीच बातमी होती.

एव्हड्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला..

‘नीट परीक्षा रद्द केल्याची बातमी आहे… परत परीक्षा होणार आहे.. मुग्धाला फोन करून सांग आणि बोलावून घे..

‘हो. हो.. बोलावते तिला..

धडधडत्या काळजाने तिने उत्तर दिले.

तिने माधवला फोन लावला.. कारण नीटसाठी त्यानेच फिल्डिंग लावली होती… माधवचा फोन बंद होता.. तिने त्याच्या बायकोला म्हणजे मधूला फोन लावला.. तिचाही फोन बंद.. तिने माधवच्या शेजाऱ्यांना फोन लावला.. त्यांनी सांगितले.. काल पासून त्यांचे घर बंद आहे.. बरीच लोक त्यांना शोधत आहेत.

मंजुने रडत रडत मुग्धाला फोन लावला..

‘अग बाई.. नीट परीक्षेतील घोटाळा बाहेर आला आहे..

तिकडे मुग्धाला धक्का बसला.

किंचाळून तिने विचारले..

‘काय? घोटाळा बाहेर आला? परीक्षा रद्द? परत परीक्षा होणार? अरे देवा.. मला मग मेडिकल विसरायला हवं..

‘अग गधडे.. या तूझ्या नीट पायी माझे दहा लाखाचे दागिने विकले.. त्या माधवच्या नादाला लागून, आता तो आणि मधू नाहीसे झालेत.. तू ताबडतोब इकडे ये बघू.. मला कस तरी होतंय.. बर हे मी नवऱ्यापासून दडवून केलंय..

टीव्हीवर बातम्या येत होत्या.. भारतभर छापे टाकणे सुरु होते. सी बी आयकडे प्रकरण गेले होते.. पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले जात होते.. आणि मुल्लाला अटक झाल्याची बातमी आली.. एकएकजण ताब्यात येत होता..

दोन दिवसांनी मुग्धा घरी आली. आल्या आल्या रडायला लागली..

‘आई.. मी किती स्वप्न पाहिलं होत माहित आहे… मी मोठी डॉक्टर होणार होते.. मोठं हॉस्पिटल बांधणार होते.. मोठी गाडी…

चिडून मंजू ओरडली..

‘जळूदे तुझं हॉस्पिटल.. आणि गाडी.. स्वतः अभ्यास करायचा नाही.. आणि डॉक्टर व्हायचंय तुम्हाला… तूझ्यापायी माझ्या नवऱ्याशी खोटे बोलले मी… त्याला न सांगता दागिने विकले आणि लंकेची पार्वती झाले.. तुम्हा मुलांना फक्त डॉक्टर व्हयचंय असत किंवा इंजिनीरिंग किंवा शासकीय अधिकारी.. बस्स.. खूप पैसे मिळवायचे असतात.. त्यासाठी आम्हा पालकाचा बळी जातो.. तूझ्या हट्टापायी मी माधवला शब्द टाकला आणि त्याने असा अघोरीं मार्ग सांगितला. माझीच चूक झाली.. मी एका चरित्र्यवान सरकारी अधिकाऱ्याची बायको आहे.. हे मी विसरले… आता सीबीआय चौकशी करते आहे.. पेपर फोडणारे शिक्षक, क्लासवाले सापडले आहेत.. मुल्लाला पकडले आहे.. कदाचित मुल्लाकडे कुणाकुणाला पेपर दिलेत.. याची लिस्ट मिळाली तर..

भोवळ येऊन मंजू खाली कोसळली आणि मुग्धा.. ‘आई, आई करत.. धावली.

सीबीआयने नीट परीक्षा गैरव्यवहाराची पाळेमूळे खणली.. मुल्लाचे सर्किट सापडले… माधवला अटक झाली..

दुसऱ्या दिवसाच्या पेपरमध्ये आणि चॅनेलवर ठळक बातमी होती..

‘नीट परीक्षेतील गैरव्यव्हार पैकी मुख्य आरोपी मुल्ला कडून पैसे देऊन आपल्या मुली साठी पेपर मिळविल्याबंद्दल नायब तहसीलदाराला अटक आणि नोकरीतून बडतर्फ…

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted