प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ९. ☆ प्रा.भारती जोगी ☆
झलकारी बाई
सन १८५७… स्वातंत्र्य समर पेटलेलं… ब्रिटिश जनरल ह्यू रोज ने संधी साधून झाशी वर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्याला वेढा घातला, सैनिक किल्यात शिरण्याच्या प्रयत्नात… राणी विचारात पडलीये, तात्या टोपे पराजित झाल्यामुळे, पेशव्यांकडून मिळणा-या मदतीची आशा ही मावळली होती. अशा वेळी *ती* पुढे येते… म्हणते…
” राणी साहेब, तुम्ही लहानग्या दामोदर रावांना घेऊन किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघून जा. मी बघून घेईन इंग्रजांना! “
राणी लक्ष्मीबाईंना हा प्रस्ताव मंजूर नसावा. कारण त्यांना ठाऊक आहे की, ती समर यज्ञात समर्पित व्हायला निघालेली आहे. त्यांना असं सगळ्यांना संकटात सोडून जाणं रूचेना! राणी सद्गदित होऊन म्हणाली, ” झलकारी, अगं तू सावली, छाया ना माझी! मग सावली देहापासून दूर कशी गं होणार”? राणी जागची हालत नाही असं बघून ती पुन:पुन्हा झाशीच्या आणि दामोदर च्या भविष्याची ग्वाही देते, विनवते आणि राणीला निघून जायला भाग पाडते. अगदी बाजीप्रभू चा तोच बाणेदारपणा दिसला तिच्या शब्दांत… लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगो!
राणी जड अंत:करणाने ती चा निरोप घेते… उराउरी भेटते… जणू… तिच्या उरातलं देभक्तीचं आणि झाशीच्या जबाबदारीचं स्फुल्लिंग ; थेट चेतवून, प्रज्वलित करणारी चेतना ते हृदयीचे ये हृदयी घालते… जणू झाशीच्या जबाबदारी चं पदच तिला बहाल करून, घोड्यावर स्वार होऊन, दामोदर ला पाठीशी बांधून निघून जाते…
कोण होती ती? जिच्या हाती झाशी सोपवून जाण्याइतका विश्वास, खात्री कमावलेली…
ती… झाशीच्या राणीच्या खांद्याला खांदा लावून लढलेली, तिच्या बरोबर सावली सारखी राहून, अगदी सर्वार्थाने तिची सावली झालेली, तिची प्रतिच्छाया, तिचंच प्रतिबिंब वाटावं, इतकी, अगदी तिचीच झलक… झलकारीबाई!!
झाशीच्या इतिहासाच्या मोठ्या पुस्तकातील एका छोट्याशा ओळीतलं, छोटंसं नाव! ऐतिहासिक दस्तावेजांच्या चळतीच्या थरांखाली दडलेलं… दबून गेलेलं… दाबलं गेलेलं नाव! पण तिच्या संपूर्ण कर्तृत्वावर दृष्टी टाकली तर लक्षात येतं ते…
तिच्या सावली चं मोठेपण! आणि आपसूकच मुखातून निघतं…
तिची मोठी सावली!!!
झलकारीबाई… बुंदेलखंड मधील भोजला गावच्या, कोळी समाजातील सदोवरसिंग आणि जमुना देवी या दांपत्याच्या घरी, २२ नोव्हेंबर १८३० या दिवशी जन्माला आलेली ही कन्या! एका निर्धन घरात, संघर्ष आणि कष्टमय जीवन असलेलं तिचं बालपण! तिच्या दुर्दैवाने त झलकारी दोन वर्षांची असताना, तिची आई तिला सोडून गेली. आईची मायेची पाखर गेली तिच्या माथ्यावरची!
पण तिच्या पित्याने तिच्या या दु:खाला तिच्या कमकुवतपणात परिणत न होऊ देता, तिची ताकद बनवलं! दु:खावेगाला प्रवेगाची दिशा दिली. तिला मुलासारखी वाढवली. तिच्या हातात बांगड्या नाही तर घोड्याचा लगाम दिला. तिला युद्ध कौशल्य शिकवून पारंगत केले. घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी, शिकवली. याचाच परिणाम म्हणून झलकारी एक साहसी, निडर, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी घडत गेली… घडली. तिचं बालपण म्हणजे साहसकथाच! १० वर्षांची असतांना, एकदा जंगलात नेहमीसारखीच लाकडे तोडायला गेली असतांना, एका वाघाने तिच्यावर हल्ला केला, तर हीने आपल्या कु-हाडीने त्याला ठार मारले. गावात ही वार्ता पोचली, गावक-यांनी तिला दुर्गा देवीचा अवतार म्हणून गौरवले.
हे साहस कमी होतं म्हणून की काय… एकदा गावात आलेल्या डाकूंना ही मोठ्या हिंमतीने, एखाद्या विरांगनेसारखं, पळता भुई थोडी केलं!
यथावकाश झलकारी चा विवाह तिच्या योग्य अशाच… झाशीच्या राणीच्या सैन्यातील आणि तोफ चालविणा-या शूर वीराशी.. पूरण कोळी शी होतो. आणि झलकारी झाशीत येते. हाच तो क्षण असावा जो एक स्फुल्लिंग ठरला, एक समिधा चेतविणारा!!
बालपणी मातीचा किल्ला बनवण्यात रममाण होणारी झलकारी एक दिवस झाशीच्या किल्ल्यात प्रवेशते. राणी लक्ष्मीबाईंची दृष्टी तिच्या वर पडते आणि राणी… आश्चर्याने बघतंच रहाते… अगदी असाच प्रसंग…
उटूनि दोन्ही आरिसे | वोडविलिया सरिसे |
कोण कोणा पाहातसे | कल्पावे पां?
राणी आपलंच प्रतिबिंब, हुबेहूब डोळ्यासमोर बघून स्तंभित झाली. चौकशी केल्यावर पूरण कडून तिच्या साहसकथा, युद्ध कौशल्यात तरबेज असणं, घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी… सगळंच कळलं. राणीने झलकारी ला आपल्या दुर्गादला ची सेनापती बनवलं. भोजला गावातील दुर्गावतार सेनापती च्या वेषात अवतरणं हा निव्वळ योगायोग नसावाच! काहीतरी संकेत असावा तो विधिलिखिताचा! राणी लक्ष्मीबाई ने त्या काळात, जात पात न बघता, एक क्रांतीकारी पाऊल उचललं आणि…
गावाकडच्या चुलीतल्या ज्वाळांना, क्रांतीच्या ज्वाळांचं रूप दिलं!! जंगलातून लाकडे तोडून आणणा-या झलकारी लाच जणू राणीने चंदनाची समिधा म्हणून आपल्या जवळ ठेवून घेतली.
हीच ती सांभाळलेली समिधा झलकारीबाई!! हीनेच राणीचं प्रतिबिंब असण्याचा, राणी सारखं दिसण्याचा फायदा घेण्याचा निर्णय घेऊनच, राणीला किल्ल्यातून सुखरूप बाहेर काढले. आणि…
उभी ठाकली थेट जनरल ह्यू रोज समोर भेटीला!
सैनिकाने विचारले, ” कोण तू? “
झलकारी ने उत्तर दिले,…
मी राणी लक्ष्मीबाई!!
ऐकताच, सैनिकांनी घेरले तिला, सगळीकडे राणी पकडली गेल्याची वार्ता पसरली. झलकारी ह्यू रोज समोर उभी… त्याने विचारले, ” कोण आहेस तू? ” झलकारी ने पुन्हा तेच उत्तर दिले खड्या आवाजात… मी राणी लक्ष्मीबाई!! राणी जोपर्यंत सुखरूप सुरक्षित जागी पोहोचत नाही तोपर्यंत यांना गुंतवून ठेवायचा तिचा विचार. पण तेवढ्यात एका फितुराने ती राणी नसल्याचे सांगितले. जनरल च्या आपण फसविले गेलो हे लक्षात आले, संताप झाला खूप. कारण रणनीतीत ली चलाखी असलेला अधिकारी होता तो! पण एका स्त्रीने त्याच्या डोळ्यात जणू धूळ फेकली आणि राणी सुरक्षित जागी पोचली.
असं म्हणतात की ह्यू रोज ने तिला विचारले की, ” तुझ्या बाबतीत मी काय निर्णय घ्यावा असं तूला वाटतं? “
त्यावर झलकारी उत्तरली, ” तुम्ही हवं तर मला फाशी देऊ शकता. मला काहीच भिती नाही. कारण, जीव जायची भीती त्यांना असते, ज्यांचा जीव त्यांच्या देहात असतो. माझा जीव तर झाशीत आहे. मग मला तो जाण्याची मला भीतीच नाही ना! “
असं म्हणतात की झलकारी ला सोडून देण्यात आलं. कारण त्यांना झाशी आणि झाशीची राणी याचा कब्जा हवा होता.
झलकारी झाशी च्या दिशेने परतताना समरांगणावरील शवांत तिला आपल्या पतीचे… पूरण चे शव दिसले. त्याच्या शवाजवळ बसली, आणि वदली, “पूरण, तू माझ्या पेक्षा मोठ्या भाग्यशाली ठरलास रे! झाशी साठी माझ्या आधी जीव अर्पण केलास!… बस्स्… आवरला तिने शोक आणि जख्मी वाघिणी सारखी तुटून पडली अत्यधिक त्वेषाने!! तिच्या त्या दुर्गावताराचं वर्णन कवींनी केलयं…
“जाकर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी!
झलकारी की झलक देखकर
वो बूंदेले भी हां गये,…
जब उतरी वे समर भूमी में,
गोरे भी थरथर कांप गये!
रानी झांसी को बचा गयी,
ऐसी सन्नारी थी झलकारी!
फिर लौट के घर ना आई,
ऐसी नारी थी झलकारी!!
अशी ही झलकारी बाई! … दाखवून दिलं, सिद्ध केलं तिने की, खरी वीरता महालांत नसते तर ती रोमा-रोमात सळसळणा-या रक्तातल्या देशभक्तीच्या चैतन्यात असते. राणी सारखी दिसत होती, राणी तिच्यावर झाशी चं राज्य सोपवून गेली, पण तिला राज्य आणि राणी पदाचा मोह नाहीच झाला, तिचं खरं प्रेम होतं ते… झाशीच्या भूमीवर, मातीवर!! इस मिट्टी में मिल जांवां… हेच वेड लागलं होतं तिला!! तिच्या साठी ताज नाही तर त्याग महत्वाचा होता. ती राणीची सल्लागार, महत्वपूर्ण निर्णयांची भागीदार बनली. युद्धाच्या कठीण प्रसंगी… धैर्य आणि शौर्य यांचा योग्य समन्वय साधत ती ढाल बनली राणी लक्ष्मीबाई ची! जौहार करणा- या स्त्रियांना आत्मरक्षणासाठी लढण्याचे बळ दिले. स्वातंत्र्याचा अलख जागवण्यासाठी तिने राणीचं वाचणं महत्त्वाचे मानले.
पण झलकारीबाई चं दुर्दैव बघा… तिच्या नावाचा कुठेतरी फक्त छोटासा उल्लेख मिळतो, जो दिसून ही न दिसल्या सारखाच! नगण्य! दुर्लक्षित! उपेक्षित!! जिचं साहस बघून जनरल ह्यू रोज नी सुद्धा तसं पाहिलं तर… गौरवोद्गार च काढले होते की,
” भारतातील १% महिला जरी हिच्या सारख्या बनल्या तर इंग्रजांना भारत सोडून जाव लागेल.! “
असं असूनही आपल्याला मात्र या समिधेचं समर्पण दिसलं नाही.
आता- आता कुठे तिच्या समरपणाचं तेज, त्याची आच, सामाजिक धग, जाणवल्या मुळे असेल… पण २००१ मध्ये सरकारने पोस्टाचे एक तिकीट झलकारीबाई च्या नावाने काढलं.
अशी ही झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई ची प्रतिछाया, झाशीची सावली झाली, तिची कहाणी एक प्रेरणा आहे! एक चैतन्य शलाका आहे जी समिधा बनून समर्पित झाली.
झलकारीबाई एक ज्वाला होती, धगधगती!!
नाही मिळाली तिला जागा, ऐतिहासिक दस्तऐवजांत, कुठल्या पाठ्यपुस्तकात… पण ती आजही लोकगीते, लोककथा आणि बुंदेलखंड च्या लोक हृदयात अढळ पदावर विराजमान झालेली आहे हे ही नसे थोडके!!!
– लेख क्र. ९ .
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




