डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

… हाताने बॅग शोधणे सुरूच होते.) 

इथून पुढे – – – 

आजीकडे दुसरे गिऱ्हाईक नव्हते, ती उघड्या डब्याचे झाकण लावत, उघड्या कढईवर मोठं भांड ठेवत, पदराला हात पुसत आपुलकीने विचारू लागली, ‘तु अमुक अमुक दुष्काळी भागातला ना रे? माझ्याकडे खूप मुले येतात त्या भागातली बेटा. ‘

‘आई वडील काय शेताकडे मजुरी करतात का…?

शिक्षण किती झालंय तुझं? दहावी तरी पास आहेस का…? लग्न झालंय का? पोर बाळ काही आहे का? ‘

आजीचे प्रश्न संपत नव्हते. आजी टपरीतलं इकडं तिकडं पडलेलं साहित्य आवराआवरी करत विचारत होती. मध्येच पदरानं तोंड पुसत होती.

मी तिला म्हणालो, ‘आजी मी डॉक्टर…

पुढचं बोलू न देता ती मला म्हणाली ‘ हां, अरे सगळीच खेड्यातली गरीब मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायची स्वप्न घेऊन येतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत बाळा’ 

‘असू दे, आता जिथे नोकरी करतोयस तिथे करत रहा, पुढे नशीब पालटेल, फक्त कष्ट करत रहा प्रामाणिकपणे… रडायचं नाही बेटा लढायचं… ‘

‘आता ज्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोस तिथे किती दहा-बारा हजार तरी देतात का? एवढ्या पैशात पुण्यात राहायचं कसं आणि गावाकडे आई बापाला पैसे कसे पाठवायचे…? ‘ खरंच तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.

थोड्या वेळात माझ्यासारख्या “डिलिव्हरी बॉय” ची दुःख तिची होऊन गेली… काही मिनिटातच ती मला आपलंसं करून गेली.

आजीचे प्रश्न अजूनही थांबत नव्हते.

तीच्याकडे गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या इतर सगळ्या डिलिव्हरी बॉईज मुलांचे अनुभव ऐकून, मीही त्यातलाच एक आहे हे समजून, तीने त्यांच्या व्यथा तिच्याही न कळत मला चिटकवून टाकल्या होत्या.

एव्हाना माझी बॅग सापडली, मी आजीला पैसे काढून देणार, इतक्यात विचार आला, आजी मला जो डिलिव्हरी बॉय समजत आहे, तेच तिच्या मनात राहू दे.

माझे भीक मागणाऱ्या लोकांमध्ये बसून मळलेले आणि चुरगाळलेले कपडे, पावसाने चेहऱ्याचा आणि केसांचा केलेला विकृत मेकअप, डिलिव्हरी बॉईज सारख्या बॅगा, कुठल्याही खिशात न सापडलेले पैसे आणि त्यात फाटलेला रेनकोट…!

या सर्वांमुळे गरीब घरातला आहे, हे समजून आजी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि वागत होती.

मी डॉक्टर आहे वगैरे सांगितलं तर क्षणार्धात तिची माझ्याबद्दलची माया, कणव संपून जाईल.

आणि मी माझ्याबद्दल तिला सांगून तरी काय झेंडे लावणार होतो?

कारण ती स्वतः गरीब होती, आणि कष्ट करून जगत असलेल्या गरीब मुलांबद्दल तिला आपोआपच जिव्हाळा वाटत होता.

मलाही ती तेच समजली होती…

ती आईच्या रूपाने, देत असलेल्या जिव्हाळ्याच्या या दुधात, मी डॉक्टर आहे, असं सांगून मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता.

तीच्या मनात जो गरीब मुलगा तिने रंगवला होता, मला ते चित्र पुसायचे नव्हते…!

आपलंसं समजून मनातल्या मनात माझ्याबद्दल वाळूचं घरटं जे तिने बांधलं होतं, मला ते विस्कटायचं नव्हतं 

खरंतर तीनं माझं रंगवलेले रूप मला आवडलं होतं…

हाच तर खरा आहे भिक्षेकर्‍यांचा प्रतिनिधी…!!!

पैशाची बॅग होती तिथे ठेवून आजीला म्हणालो, ‘आजी तीस रुपये माझ्यावर उधार… दोन दिवसात देतो. ‘

‘दे रे पगार झाल्यावर दिले तरी चालतील. मला कोणी फसवत नाही. ‘ 

नाही म्हणताना, उजव्या हाताचा पंजा, नाही, अशा अर्थाने, माझ्या चेहऱ्यासमोर नाचवत ती बेदरकारपणे म्हणाली.

‘फसवणारे फसवून गेले… ते सगळे माझेच होते, गोड बोलून माझ्याकडचं सर्व घेऊन निघून गेले, कुठे गेले मला माहित नाही. ‘ हे बोलताना मात्र ती भाऊक झाली.

‘कधीतरी वाटतं, भेटावं त्यांना शोधावं त्यांना… नातवंडं आता मोठी झाली असतील’

हे वाक्य बोलताना आजीच्या आवाजाला कंप सुटला, पुढे तिला बोलताच येईना, पुढचं सगळं आजीच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं… आजीनं डोळ्याला पदर लावला.

पुन्हा खाली मान घालून पदराने तिने डोळे पुसले.

पण पुढच्याच क्षणी पदर झटकून, खंबीरपणे चढ्या आवाजात म्हणाली, ‘जाऊदे शोधायचं तरी कशाला? शोध हरवलेल्यांचा घ्यायचा असतो, स्वतःहून गेलेल्यांचा नाही…!

‘हरवलं असेल तर नक्की सापडतं पण लपवून ठेवल्यावर माणसानं करायचं काय…? ‘ हुंदका देत ती म्हणाली.

‘माझं जाऊ दे तुझं सांग’ म्हणत शेजारच्या पातेल्यातून ओंजळीत पाणी घेऊन ते तिने चेहऱ्यावर सपासप मारलं.

मघाशी पाऊस माझ्या चेहऱ्यावर मारत होता तसंच…

फरक इतकाच, की मी पावसापुढे हार पत्करली आणि थांबलो या जागेवर…

आजीने परिस्थिती पुढे हार न मानता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती याच जागेवर…

पाऊस आता थांबला होता तिच्या डोळ्यातलाही आणि आभाळातलाही…!

चार-पाच गिर्‍हाईकं आली होती. मी गाडीला किक मारून निघालो, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, ती वडे तळण्यात पुन्हा गुंगून गेली.

पैसे मिळतील की नाही याची तिला फिकीर नव्हती, तिच्या दृष्टीने तिने एका भुकेल्या नातवाला घास भरवला होता, आणि आजी कधी भरवलेल्या घासाचे पैसे मागत नाही…!

काय योजना होती ही पावसाची?

का मला निसर्गाने या आजीची भेट घालून दिली असावी…??

आणि पुन्हा पैसे परत करण्याच्या उद्देशाने परत भेटण्याची योजना सुद्धा करून ठेवली होती…

सगळंच अकल्पित आणि अतर्क्य…!

दोन दिवसांनी मी तिला भेटलो डिलिव्हरी बॉय म्हणूनच, मी 50 ची नोट काढून तिच्या हातावर ठेवली, उरलेले वीस राहू दे म्हणालो.

काय जहागीरदार आहेस का कुठला? ती माझ्यावर डाफरली.

‘असाच पैशाला पैसा जोडून घरी पाठवत जा’ उरलेले वीस रुपये देत ती मायेनं म्हणाली.

(मनात म्हटलं, ‘तुला देऊन घरीच पाठवतोय आजी… कसं सांगू तुला? ‘)

यानंतरही तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, कधी वडापाव खायला, तर कधी गप्पा मारायला.

या गप्पांमधून चेहऱ्यावरच्या, एक एक सुरकुतीची कहाणी उलगडू लागली… हळू हळू धुकं विरळ होत गेलं आणि रस्ता स्वच्छ दिसू लागला…

सुरकुत्यांच्या या जाळ्यात खूप काही साठलं होतं, आणि आजी या जाळ्यात अडकली होती कोळ्यासारखी…!

आजी खरंतर एका श्रीमंत घरातली, तीला दोन मुलं. पतीने सर्व इस्टेट या आजीच्या नावे करून ठेवली होती.

मुलांची लग्न होईपर्यंत सर्व ठीक होतं, पण एकदा लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोनाची चार डोकी झाली.

हि चार डोकी पद्धतशीरपणे आजीकडे स्वतःचा वाटा मागू लागली, त्यासाठी रोज वाद विवाद आणि भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या.

घरातली भांडणे थांबवण्यासाठी आजीने सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली.

प्रॉपर्टी वाटली तरी सुद्धा मरेपर्यंत मी याच घरात राहणार अशी अट आजीने घातली.

घरात राहूनही, यानंतर आजीला कोणती सून जेवण देणार यावरून वादविवाद होऊ लागले. त्यातही पुन्हा मारामाऱ्या.

स्वाभिमानी आजी रागाने एका साडीवर घराबाहेर निघाली आणि एका फुटपाथ वर राहू लागली.

ओळखी पालखीचे लोक तेवढ्यापुरते सांत्वन करून पुढे जात, त्यातीलच एकाने, आजी तुम्हाला वडे करायला चांगले जमतात, तुम्ही हाच व्यवसाय का नाही करत असे सुचवले.

स्वाभिमानाने जगायचं तर काहीतरी करायला हवं, या विचाराने, ओळखीच्या लोकांकडून उधारीवर काही पैसे घेऊन व्यवसायाला लागणारी सामग्री घेतली आणि पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरील फुटपाथवर हा व्यवसाय सुरू केला. गोड बोलण्याने हळूहळू जम बसत गेला.

ऊन वारा पावसाचा त्रास होऊ लागला, म्हणून जी जोडलेली माणसं होती, त्यातील तरुणांनी चार काठ्या आणून त्यावर एक फ्लेक्स टाकून दिला.

आजीला निवारा मिळाला.

साधारण पाचशे रुपये रोज कमावते आजी…

बाकी सर्व नातवंडं समजून आमच्यासारख्या डिलिव्हरी बॉईज ना… उधारीवर…!

कोणी पैसे आणून देते, कोणी बुडवते तिला काही फरक पडत नाही…!

दर भेटीत मला वाईट वाटायचं, स्वतःची ओळख सांगायची सुद्धा चोरी…

एकदा मी तिला म्हणालो, ‘तुझी हि टपरी आपण छान करून घेऊया का? या चार काठ्या फेकून देऊन आपण छान काहीतरी कायमस्वरूपी करू…

ती भडकली, तु माझ्या शॉप ला टपरी म्हणतो…?

हि टपरी नाही माझं शॉप आहे… शॉप…!

सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted