श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “शहर बदलतंय, पण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
सकाळी रोजच्याप्रमाणे फिरणं झाल्यावर कट्ट्यावर गप्पांची मैफिल रंगलेली. राजकारण, टीव्ही सिरियल, क्रिकेट या नेहमीच्या विषयांवरुन चर्चेची गाडी बेफाम वाढणाऱ्या शहरांवर आली.
“आपलं शहरसुद्धा फार मोठं झालयं”
“मोठं???? चारही बाजूंनी बेसुमार वाढलयं. ”
“हो ना. कित्येक नवीन जागा तर माहितीही नाहीत. ”
“हे सगळं गेल्या वीस वर्षात घडलं”
“नवीन येतेय पण जुन्या वास्तु एकेक करून आठवणीत जातायेत. वाईट वाटतं. ”
“इट्स ओके, जे होतंय चांगल्यासाठीच होतंय. डोन्ट बी इमोशनल, ”डॅडींच्या बोलण्यानं वादाला तोंड फुटलं. स्वतःला आधुनिक विचारांचे समजणाऱ्या डॅडींचे टोकाचे विचार अनेकदा वादाचं कारण व्हायचे. आजही तेच झालं.
“फ्रेंडस जगा बरोबर बदलत रहा. बी प्रॅक्टिकल” डॅडी वदले.
“गपा हो, जेव्हा बघावं तेव्हा प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल जप करता. तुम्ही भावनाशून्य असलात तरी जग नाही”आप्पा एकदम उसळले.
“आप्पा, पर्सनल जायचं काम नाही. मी जनरल बोललो आणि मान्य करा किवा करू नका बदल होणारच. आठवणींचे कढ काढण्यापेक्षा नव्याबरोबर अडजेस्ट करणं हेच शहाणपणाचं आणि फायद्याचं होईल” डॅडी.
“या शहरात आयुष्य घालवलं. खूप बदल पाहिले, अनुभवले पण आताचा बदल फारच वेगळायं. ”आप्पा.
“वेगळा वगैरे काही नाही. आता आपलं शहर महानगर झालयं. माय डियर, धिस इज डेव्हलपमेंट, आय लाइक धिस ग्रोथ” बोलताना डॅडींच्या चेहऱ्यावर चमक होती.
“वी ऑल्सो लाइक ग्रोथ, बट अँट व्हॉट कॉस्ट”
“म्हणजे, समजलं नाही. ”डॅडी.
“खूप नवीन गोष्टी आल्या आणि अजूनही येतायेत. मोठाले रस्ते, अवाढव्य इमारती, शिक्षण संस्था, ब्रॅंडेड दुकानं, हॉटेल्स आणि आणखी बरंच काही.. ”
“मग चांगलचं आहे की… आरामदायी जगण्यासाठी हेच तर पाहिजे. ”
“फार एकांगी विचार करता. तुम्हांला मुद्दाच लक्षात येत नाहीये. ”आप्पा.
“ओके, समजावून सांगा. ”
“नवीन शहरात आपलेपणा वाटत नाही. सगळं अनोळखी वाटतं. शोरूम आणि घर यात जो फरक आहे तोच.. ”
“म्हणजे”
“खूप चकचकीत, डोळे दिपवणारं शोरूम कितीही आकर्षक, चांगलं असलं तरी परकं वाटतं याउलट घराविषयी मात्र जिव्हाळा असतो. प्रेम असतं. ”
“यू आर राईट” डॅडी
“आठवणींच्या ढिगाऱ्यावर उभं असणारं नवीन शहर खूप मोठं, आधुनिक, व्यवहारी आणि दिखाऊ आहे. आमच्यासारख्यांना अजूनही शहराविषयी प्रेम, अभिमान आहे पण आता “आपुलकी” मात्र वाटत नाही. ”आप्पा बोलायचे थांबले. कट्टयावर एकदम शांतता. आपल्या शहराविषयी वाटणारी परकेपणाची भावना ही प्रत्येकाचीच वेदना.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






