गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ उंचावर… भाग – २ ☆ गौरी गाडेकर ☆
(विकास-अश्विनी अरविंदकडे जेवायला गेले नाहीत, त्यासंदर्भात बोलायला विकास आणि अरविंद संध्याकाळी भेटले. आता पुढे……)
संध्याकाळी विकासने अरविंदला अश्विनीविषयी सगळं सांगितलं – ती अख्खा दिवस टक लावून समोरच्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सकडे बघत बसलेली असते. तिचा राग येतो;पण तिच्या चेहऱ्यावर निरागसता असते वगैरे.
“तू गावी असताना ती कशी वागायची? ”
“खूप आनंदी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे ती. बाबांना फ्रॅक्चर झालं, त्यामुळे आमचं हनिमूनला जाणं कॅन्सल करावं लागलं, तेही समजून घेतलं तिने. ”
“एवढ्या दिवसांत काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या तुझ्या? ”
“नाही रे. ” मग थोडा वेळ विचार करून विकास म्हणाला, “मी तिला म्हटलं, ‘आधीच लग्नात खूप खर्च झालाय, शिवाय घर सजवायचंय, तेव्हा आपण हनिमूनसाठी लांब कुठे नको जाऊया. जवळच माथेरान, महाबळेश्वरला जाऊया. ‘ ती म्हणाली, ‘जवळच्या ठिकाणी जायला हरकत नाही. पण माथेरान, महाबळेश्वर नको. तिथे डोंगर आहेत. ‘ नंतर मुंबईत आल्यावर स्टेशनचा ब्रिज चढताना घाबरली होती. माझा हात घट्ट धरला होता तिने. वर पोचेपर्यंत भिजून चिंब झाला होता तिचा हात. घरी आल्यावरही तिसरा मजला म्हटल्यावर थोडी नाखूष झाली होती. खिडकीतून खाली बघायला सांगितलं, तर टाळाटाळ केली… ”
अरविंदने पुढचं ऐकायचं सोडून कोणालातरी फोन लावला, “किती वाजेपर्यंत आहेस तिथे? … मी लगेचच निघतोय. थांब मी येईपर्यंत. ” एका घोटात कॉफी पिऊन निघालासुद्धा. “बिल प्लीज तूच दे. मला उशीर होईल. “
विकासला त्याचा रागच आला. म्हणजे बिल द्यावं लागलं म्हणून नव्हे. तर आपलं एवढं महत्त्वाचं बोलणं अर्धवटच सोडून…
रात्री अरविंदचा फोन आला – “मघाशी तू सांगत होतास, तेव्हा मला भयगंडाची शंका आली. माझा एक मित्र सायकिऍट्रिस्ट आहे. त्याला मी फोन केला आणि तो क्लिनिकमधून निघण्यापूर्वीच त्याला गाठायचं, म्हणून घाईघाईने गेलो. माझी शंका खरी असावी, असं त्यालाही वाटतंय. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळालीय. ऑफिसला रजा घेऊया. हे जास्त महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी अश्विनीला घेऊन मला दादर स्टेशनवर भेट. ”
त्या रात्री विकासच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ‘असं काही खरंच असू शकेल का? पण एरव्ही तर ती… ‘
अश्विनी तशी नाइलाजानेच घराबाहेर पडली होती. स्टेशनचा ब्रिज चढावा लागू नये, म्हणून विकासने तिला टॅक्सीनेच दादरला नेलं. क्लिनिक सहाव्या मजल्यावर होतं. लिफ्टमध्ये अश्विनीने विकासचा हात घट्ट धरला होता, हे अरविंदच्या नजरेतून सुटलं नाही.
डॉक्टरांनी पहिल्यांदा विकासला आत बोलावलं, “अरविंदने मला जे सांगितलं, त्यावरून मला वाटतं, की तुमच्या पत्नींना ऍक्रोफोबिया असावा. ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीचा भयगंड. माझ्या मते याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं असावं. मी त्यांच्याशी बोलून त्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी अशा गोष्टी सुप्त मनात दडलेल्या असतात. त्या पेशन्टला आठवतही नाहीत. अशा वेळी हिप्नोथेरपीचा वापर करावा लागतो. ”
विकासचा चेहरा आधीच पडला होता. आता तर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
डॉक्टरांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं, “डोण्ट लूज होप, मिस्टर विकास. त्या नक्की बऱ्या होतील. आणि त्यांनी लवकर बरं व्हावं, म्हणूनच मी आजच हिप्नोथेरपीचा प्रयोग करणार आहे. अर्थात आवश्यकता असेल तरच. ”
“तुम्हाला योग्य वाटेल, ते सर्व करा. पण माझ्या अश्विनीला बरं करा, डॉक्टर. ”
डॉक्टरांनी अश्विनीशी बोलायला सुरुवात केली. त्यांचा शांत, आश्वासक सूर कानावर पडताच तिच्यावर आलेलं दडपण नाहीसं झालं. ती अरविंदशी ज्या मोकळेपणाने बोलत असे, त्याच मोकळेपणाने डॉक्टरांशीही बोलू लागली. मग डॉक्टरांनी तिला मुंबईत आल्यावर आई-वडिलांची आठवण येते का वगैरे विचारताच ती गप्पांच्या मूडमध्ये आली. त्यांनी तिला आताच्या, पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. पण ऍक्रोफोबियाचा उगम सापडेल, अशी कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.
मग त्यांनी मधला पडदा ओढला. आता विकासला आणि अरविंदला अश्विनी दिसत नव्हती, पण तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.
डॉक्टरांनी तिला दीर्घ श्वसन करायला सांगितलं. पायापासून डोक्यापर्यंतचा एकेक अवयव – पहिल्यांदा त्याला ताण देऊन मग रिलॅक्स करायला सांगितलं. हळूहळू ती संमोहनावस्थेत गेली.
डॉक्टर तिला म्हणाले, ” तू आता डोंगर चढत आहेस. कसं वाटतंय तुला? ”
“नाही, नाही. मी डोंगरावर जाणार नाही. ”
“का? ”
“… ”
“का नाही जाणार तू डोंगरावर? ”
“का ते मला माहीत नाही, पण मी नाही जाणार. ”
“ठीक आहे. नको जाऊस… हे बघ, अश्विनी. तू आता पाच वर्षांची आहेस. आई-बाबांबरोबर फिरायला चालली आहेस. कुठे जायला आवडेल तुला? ”
“डोंगरावर. मी धावतधावत डोंगर चढणार. आई खूप घाबरते, मी धावायला लागले की. मग मला गंमत वाटते. ” तिचा सूर अगदी लहान मुलासारखा वाटत होता.
” आता तू थोडी मोठी झालीस हं, अश्विनी. समज सात वर्षांची. आता परत जा डोंगरावर. ”
“नाही, नाही, मी नाही जाणार डोंगरावर, “भेदरलेल्या आवाजात अश्विनी म्हणाली.
” का ग? काय झालं? ”
“तिथे तो घाणेरडा माणूस आहे. ”
“हो? काय करतो तो? ”
“तो आणि ती बाई… शी! नीट कपडेपण नाही घातले त्या दोघांनी. मी त्यांना बघितलं, हे कळल्यावर तो धावत आला. त्याच्या तोंडाला एवढी घाण येत होती! मला ओकारी आल्यासारखं वाटलं… आणि त्याची भीतीपण वाटली. त्याने मला उचललं आणि डोंगराच्या टोकाला नेलं. मला उंच धरून विचारलं, ‘खाली टाकून देऊ तुला? ‘ मी… मी.. घाबरले आणि… रडायला लागले. ‘चूप! गप्प बस. तोंडातून आवाज काढायचा नाही. आणि आम्हाला बघितलं, हे कोणाला सांगायचं नाही. विसरून जायचं सगळं. कळलं? विसरून जायचं! सगळं विसरायचं! नाहीतर डोंगरावरून खाली फेकीन. ‘ ” आणि अश्विनी रडायला लागली. एखादी लहान मुलगी रडावी तशी.
डॉक्टरांनी थोडा वेळ तिला रडू दिलं. मग ते म्हणाले, ” तुला माहीत आहे, बाळा, त्या माणसाचं पुढे काय झालं? त्याला ना पोलिसदादाने पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि मार मार मारलं. तो मेला आता. आता तो तुला त्रास द्यायला कधीच येणार नाही. ”
“खsरं ss? ”
“अगदी खरं. तेव्हा आता तुला डोंगरावर जायला काहीच हरकत नाही. जाणार आता डोंगरावर? ”
” तो माणूस नक्की येणार नाही? ”
“अजिबात नाही. मेला तो. मग जाणार तू डोंगरावर? तुला आवडतं ना डोंगरावर फिरायला? ”
“हो! आई-बाबांबरोबर जाणार मी डोंगरावर. “
“आता मोठी हो. आणि नवऱ्याबरोबर जा डोंगरावर. जाणार ना? ”
“हो. “बाहेर विकासाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.
“एक गंमत सांगू, अश्विनी मॅडम? खिडकीकडे जा आणि खाली बघा. ती माणसं, वाहनं कशी दिसतात, ते बघा. ”
“खरंच, किती लहान दिसतात ना! आणि आपण आकाशातच आहोत असं वाटतं. मस्तच! ”
पडदा बाजूला करून विकास आत आला आणि डॉक्टर, अरविंद कोणाचीही पर्वा न करता त्याने अश्विनीला मिठीत घेतलं.
– समाप्त –
© गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





