प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १४. ☆ प्रा.भारती जोगी ☆
कस्तुरबा गांधी
“कुठे अंतच नाही या सरकारच्या अत्याचाराच्या सामर्थ्याचा… लोकांना तुडवून काढतयं अक्षरशः! लोक ही बिचारे कुठपर्यंत आणि किती सहन करतील?? “
“तू म्हणशील तर मी व्हाईसरॉय ला माफी पत्र लिहू का? “
“सुकुमार पोरी -बाळी तुरूंगात डांबल्या आहेत; त्या माफी मागत नाहीत ; आणि तुम्ही मागणार? …
हा संवाद आहे स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग करणा-या दोन महनीय अशा…
महात्मा गांधी आणि त्यांची सहचारिणी कस्तुरबा या दोघांतील… आणि तोही… पुण्यातील आगाखान पॅलेस मधील कारावासातील अक्षम्य हेळसांड, अन्याय, आजारातील वेदना सहन करत असतांना!! एक लखलखणारं तेज… एक ज्योती निमाण्यापूर्वी, संपूर्ण शक्तीनिशी तेजाळून उठलीयं! रोमा-रोमांतलं प्रवाही देशप्रेम,
वैखरीतून हे असं व्यक्त झालयं!
कस्तुरबा… खरंतर भारताच्या आणि स्त्री स्वातंत्र्य लढ्याच्या पुस्तकातलं एक चमकणारं पान! पण त्यावर धूळ साचून ते नजरेआड झालयं. कस्तुरी सुगंध दरवळ जणू विरून गेलायं!
कस्तुरबा… कस्तुर ही पोरबंदर येथील गोकुळदास माखजी या एका श्रीमंत व्यापा-याची कन्या. मोहनदास गांधी… बापू… यांचा परिवार ही शेजारीच रहात होता. दोन परिवारातील स्नेह ; बंधनात बद्ध झाला तो या दोघांतील गठबंधनाने!
आणि सुरू झाला कस्तुर चा जीवन प्रवास… सामान्य गृहिणी ते असामान्य ‘ बा ‘ पर्यंतचा!!
कस्तुर… कधीही शाळेत न गेलेली एक समर्पित गृहिणी. बायको बनून आली पण नंतर आपल्याच मुलांची नाही ; तर बापूंच्या ‘साबरमती ‘ आणि ‘सेवाग्राम ‘ आश्रमातील सगळ्यांचीच बा झाली. निष्कपट श्रद्धा, निस्वार्थ भक्ती, आणि सेवा यांचा आदर्श ठरल्या कस्तुरबा.
गांधीजी जेव्हा शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेव्हा दोन लहान मुलं पदरी घेऊन बां नी, कुठलंही आदान-प्रदान नसलेलं आयुष्य कंठीलं! दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हाही बां नी त्यांना समर्थन आणि प्रोत्साहनच दिले.
दक्षिण आफ्रिकेत असतांना तर त्यांनी असाधारण असं साहस दाखवलं. गो-यांची फौज धमकावायला आल्यावर गांधीजींना इंग्रजांच्या हाती लागू न देण्याची पराकाष्ठा केली आणि वाचविले. आणि स्वतः ही मुलासह दुस-या घरी जाऊन शरण घेतली.
बघता-बघता या कस्तुरीचा सुगंध दरवळत जाणवायला लागला. त्या बापूंच्या जीवन संग्रामात अचल निष्ठेने उभ्या राहिल्या. स्वतः ला काया, वाचा, मनाने अर्पण केले त्यांच्या जीवनकार्यात एक समिधा बनून!!
आश्रमातील लोकांना आईच्या मायेनं आणि वत्सलतेनं शिस्त आणि व्यवस्थापनाचे धडे दिले.
महिलांना स्वच्छता, आरोग्य आणि साक्षरतेचे धडे दिले.
कस्तुरबा लिहायला शिकल्या ख-या पण त्यांची पद्धत लहान बालकासारखी प्रत्येक शब्द, अक्षर वेगवेगळं, दूर दूर. बापूंनी खूप शिकवलं, सराव करायला सांगितलं. सगळ्यांनी वही मागितली, बां नी ही मागितली. पण बापूंनी त्यांना वही… नोटबुक न देता, त्यांच्या हातात कागदाचं बंडल ठेवत सांगितलं… “तुझं लेखन सुधारेल तेव्हाच तुला नोटबुक मिळेल.” बां ना खूप वाईट वाटलं. दुखावल्या गेल्या त्या.
नंतर बापूंना ही जाणवले ते. सरोजिनी नायडूंना सांगून, सुशिला नायरच्या हाती एक नोटबुक पाठवली. पण बां चं मोठं स्वाभिमानी उत्तर बघा… ” मला नोटबुक ची काय गरज?”…
याच कस्तुरबांचं एक पत्नी म्हणून बलिदान प्रशंसनीय आहे. राष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी आपलं घर खुलं केलं. पतीच्या प्रयत्नांना पूर्ण साथ दिली. पती जेलमध्ये असतांना उपवास केले, दागिने आणि इतर वस्तूंचा ही त्याग केला. बा एक समर्पित पत्नी होत्या, पण म्हणून ‘दबलेल्या ‘ कधीच नव्हत्या.
“चले जाव” चळवळीच्या वेळी बापूंना अटक झाली त्यावेळी त्यांनी बां ना सांगितले, ” तू माझ्या सोबत येण्याऐवजी मी अंगिकारलेले व्रत पूर्ण कर. ” परंतु भाषणासाठी शिवाजी पार्क वर पोहोचण्यापूर्वीच बां ना अटक झाली.
त्यावेळी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाने करेंगे या मरेंगे… लिहिलेला बिल्ला शिवून घ्यावा असे ठरले… पण… “मला याची काय गरज आहे? तो तर माझ्या काळजावरच कोरलेला आहे. ”
अशा या बां नी, म. गांधींजींना नेहमीच असाधारण साहस, आस्था, समर्पण युक्त अशी साथ दिली. बलिदानाच्या मार्गावर न घाबरता, न डगमगता चालत राहिल्या. म. गांधीजींची विशाल छबी, प्रतिबिंब बनून राहिल्या त्या. नश्वरता पार करून अमरता प्राप्त केलीयं खर तर त्यांनी.
त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर बापूंनी त्यांच्या विषयी काढलेले गौरवोद्गार स्मरणीय आणि उल्लेखनीय असेच आहेत… ” कस्तुरबा माझ्या सगळ्या राजनैतिक संघर्षात माझ्या सोबतीने ठामपणे उभी राहिली. संकटं आल्यावर जराही घाबरली किंवा डगमगली नाही. आजच्या काळानुसार ती भले ही अशिक्षित वाटेल, पण माझ्या नजरेतून मात्र ती ख-या शिक्षणाचा एक आदर्श होती.”
स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग केलेल्या कस्तुरबांचा आगाखान पॅलेस मधला तुरूंगवास मात्र खूपच कठीण, वेदनामय होता. त्यांच्या उपचाराबाबत अक्षम्य हेळसांड झाली. बापूंची त्या तुरूंगवासातली सोबत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत… हाच काय तो फार मोठा दिलासा होता त्यांच्या साठी!
या कारावासातच त्यांचा मृत्यू झाला.
तेथेच या समर्पितेची समाधी आहे. असं म्हणतात की, त्या समाधीवर स्वतः गांधीजींनी लहान-लहान शंखांनी हे राम! हे शब्द कोरलेले आहेत.
“करेंगे या मरेंगे”… हे भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य कस्तुरबांनी खरे करून दाखवले.
अशी ही कस्तुर… सगळ्यांचीच, अगदी कारागृहातील महिलांची ही आई बा होऊन जगली. आपल्या पतीचा पंथ धरला. त्यांच्या कठोर दुराग्रहाचे, प्रकोपाचे विष ही पचवले. पतीच्या साधनेत आपले मूक पण संपूर्ण योगदान अर्पिले. गांधीजींच्या शक्तीची आदि स्त्रोत होती बा!!
परिमळामाजी कस्तुरी!!
– लेख क्र. १४.
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






