श्री संभाजी बबन गायके
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” – लेख क्र. ३ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
ज्ञानबा-तुकाराम गजराचे उद्गाते नारायणबाबा!
आषाढ वद्य अष्टमीला जगदगुरू संत श्री तुकोबाराय पंढरीस प्रस्थान ठेवतात आणि दुस-या दिवशी म्हणजे दशमीला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय पंढरीसाठी निघतात… हा केवळ योगायोग नव्हे!
तुकोबाराय हे ज्ञानोबारायांचे परमभक्त. माऊली ज्ञानोबारायांच्या जन्मानंतर (१२७५) नंतर ३३३ वर्षांनी (१६०८) मध्ये तुकोबाराय देहूत अवतरले. इंद्रायणी देहूतून पुढे अलंकापुरीस जाते!
तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर चार महिन्यांनी मातोश्री जिजाऊ यांच्या पोटी नारायण जन्माला आले… तेच नारायणबाबा अर्थात नारायण महाराज. तुकोबारायांची अध्यात्मिक मिराशी समर्थपणे चालवणारे साधक. घराण्यात पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीच्या पायी वारीची परंपरा त्यांनीही अंगिकारली. तुकोबाराय देहाने सोबत नसले तरी अभंगरूपाने जग व्यापून उरले आहेत, अशी नारायण महाराजांची खात्री होती. पांडूरंग परमात्म्याच्या या परमभक्तास देहाशिवाय पंढरीची वारी घडवता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी तुकोबारायांना वारीत सोबत घेण्याचे ठरवले… नव्हे त्यांच्या सोबत वारीला जायचे ठरवले. त्यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि देहूतून बाहेर पाऊल ठेवले… आणि मग त्यांच्या मनात आले असेल… माऊली सोबत असल्या तर? नारायण महाराज तुकोबारायांना घेऊन थेट अलंकापुरीत दाखल झाले… माउलींना आग्रह केला! आपण दोघेही विठोबाचे लाडके… तुम्ही एकत्रित पंढरीची वाट चालू लागलात तर सबंध मराठी मुलुख तुमच्या आगे-मागे चालत निघेल देवाच्या भेटीला!
पादुकांच्या रुपात आता ज्ञानोबा आणि तुकोबा विराजमान झाले… सोबत चालणा-या भोळ्या भाविकांनी या दोघांच्या नावाचा गजर एकत्रित करायला आरंभ केला आणि महाराष्ट्राला नवा सूर गवसला… ज्ञानबा-तुकाराम… ज्ञानोबा-तुकाराम! ज्यांना ज्ञानोबा हा शब्द उच्चारता येत नव्हता त्यांनी ग्यानबा म्हटलं… तुकाराम सर्वांना म्हणता येत होतंच!
ज्ञानोबा-तुकाराम हा जणू स्वयंभू मंत्र बनला ज्याची जादू आजही कायम आहे.. आणि मराठीचा श्वास असेल तोवर याचे तेज कमी होणार नाही!
काळाच्या ओघात, व्यवहाराच्या प्रवाहात ही परंपरा काही काळ स्थगित झाली… पंढरीनाथाच्या कृपेने ती पुन्हा सुरु झाली. मात्र ही नवी सुरुवात स्वतंत्र मार्गाने सुरु झाली. माऊली ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त हैबतबा आरफळकर यांनी आळंदीहून माउलींना स्वतंत्र पालखीत बसवले… राजाश्रय मिळवला… वैभव स्थापित केले… श्रीमंत झाला सोहळा… देहू आणि आळंदी येथून तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या दोन स्वतंत्र पालख्या स्वतंत्र मार्गाने एकाच लक्ष्याकडे चालू लागल्या… कालांतराने तुकोबारायांच्या सोहळ्यालाही साजेसे रूप आले… वाटेत काही ठिकाणी या पालख्या एकमेकांना भेटू लागल्या, समांतर चालू लागल्या आणि वाखरी मुक्कामी मोठ्या ओढीने एकमेकांना आलिंगन देत्या झाल्या… भजन मात्र तेच राहिले… ज्ञानोबा-तुकाराम! ज्ञानोबारायांसोबत वाटचाल करणा-या जीवांच्या मुखी एक परवलीचा शब्द रुजला… आणि रुळला… माऊली! तुकोबारायांच्या सोहळ्यातही माऊली-माऊली गजर नित्याचा झाला! गंगा आणि यमुना… विठ्ठल नावाच्या महासिंधुत एकत्रित झाल्या… आणि चंद्रभागेच्या वाळवंटी कैवल्याचं चांदणं कायमचं वस्तीला आलं!
दिंडी म्हणजे केवळ वाटचाल नव्हे. दिंडी म्हणजे ब्रम्हमुहूर्त ते सूर्यास्तापर्यंतचा आखीव-रेखीव, शिस्तबद्ध प्रवास… संतांच्या सहवासात, त्यांच्या साक्षीने आणि मार्गदर्शनाखाली होत असलेला! इथे संत म्हणजे राजे. तेच वैभव, तोच दिमाख आणि तेच राजस उपचार. शाही स्नान, हत्ती, घोडे, सैन्य, अब्दागिरी, पताका आणि नामाचा गजर! वारीत नामस्मरण हे मुख्य कर्म. त्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ, अनुभवी साधक म्हणजे विणेकरी! सर्वांच्या पुढे चालणारे, भजनाचे नेतृत्व करणारे आणि स्वर-ताल यांचे सूत्रसंचालन करणारे. त्यांच्या मागे दोनच्या रांगांत पुरुष वारकरी, त्यांच्या मागे महिला, त्यांच्यामध्ये डोईवर तुळशीवृंदावन धारण केलेल्या भगिनी, शिस्त आणि संरक्षणकार्यासाठी दंडधारी चोपदार. माऊली-तुकोबाराय रथात आरूढ होण्याआधी रथांच्या मागे-पुढे शिस्तीत उभे राहते दिंडी. आणि मग नित्योपचार आरंभ होतो. इथं सगळा भार शब्द आणि तालावर. साथीला टाळांचा मधुर गजर. ज्यांच्या हाती टाळ नाहीत त्यांच्या हातात टाळी! आरंभ काकड आरतीच्या अभंगांनी… मग रूपाचे अभंग… मग विषयवार, वारानुसार निवडक अभंगांचे क्रमवार गायन. चाल साधी… चालता चालता सहजी गाता यावी अशी. चरणासाठी अर्थात तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे इथपासून स्वतंत्र चाल लावण्याची मुभा… रागदारीचा अविष्कार करण्याची संधी… गायकांना आणि श्रोत्यांना आनंद देणारी! अट एकच शब्द केवळ आणि केवळ संतांचेच असावेत. आयुष्यभर गायले तरी पुरतील अशी अभंगसंपदा आपल्याकडे आहे. तुकोबारायांचे तर हजारो. संतपंचक अर्थात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथमहाराज, निळोबाराय… यांचे अभंग अगणित. जोडीला मुक्ताई, जनाई, बहिणाई आहेतच… वाट कधी सरते समजतही नाही… उपदेश आणि वाटचाल एकमेकांच्या स्वरांत स्वर मिसळून चालत राहतात. दिंड्यांना स्वतंत्र क्रमांक दिलेले असतात. रथापासून पहिली दिंडी आणि तिच्या पुढे दोन, तीन असे वाढते क्रमांक… आणि रथामागची पहिली दिंडी… आणि त्या मागे दोन, तीन अशा क्रमाने मागे. यात कुणी हस्तक्षेप करायचा नसतो. एकामागून चालायचे. दुपारच्या भोजनाच्या विश्रांतीनंतर माऊली निघायच्या आधी सर्वांनी क्रमांकाने उभे राहायचे म्हणजे रहायचेच. चोपदार सकाळी निघताना शंखनाद करतात तसा प्रत्येक वेळी प्रवास सुरु करण्यापूर्वीही करतात. त्यांच्या हातातील दंड म्हणजे इशारा… त्यानुसार थांबावे किंवा पुढे चालावे.
मुक्कामाचे ठिकाण नजरेच्या टप्प्यात येईतोवर संपूर्ण भजनी मालिकांचे आवर्तन पूर्ण होते. यात आंधळा, पांगुळ, वासुदेव, भारुडे, गौळणी सर्व ओळीने हजेरी लावून जातात. मग अवतरतो हरिपाठ… माऊली ज्ञानोबारायांचे शब्दवैभव, विचारसंगती मिरवणारा… याची चाल ठरलेली. हरिपाठ सुरु करा असा निरोप एकमेकांना दिला जातो आणि संपूर्ण सोहळा या पाठ असलेला हरी उच्चारत वाट चालतात. समाधी संजीवन हरिपाठ… या शब्दांपाशी अवघा सोहळा काहीसा थबकतो… स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घेतली जाते. एवढ्यात पालखी तळ समीप येतो. मानाचा अश्व ‘समाज आरतीचा’ आदेश घेत दौडत येतो… त्याच्यासाठी दिंड्या मधून मार्ग देत राहतात… आरतीच्या तालावर वारकरी दिवसाच्या चालीचे कष्ट विसरून जातात… माऊली, तुकोबाराय, तसेच इतर सर्व संत… नेमून दिलेल्या मुकाम्माच्या ठिकाणी जातात… वारकरी तंबू-राहुट्या शोधतात… आणि स्थिरावतात. प्रवचन सेवा होते… स्वयंपाक होत आलेला असतो… नैवेद्य जातो… भोजनाच्या पंगती पडतात… अंधार गडद होत असतो… नेमाचे वारकरी एका तंबूत हरीजागरासाठी जमा होतात… आणि पापण्या जडावलेले इतर वारकरी पुन्हा अभंगवाणी अनुभवत निद्रेच्या अधीन होतात! … उद्या नवा गाव… पण शब्द हेच… ज्ञानोबा-तुकाराम!
(नारायणमहाराज आणि हैबतबाबा यांचे उपकार डोंगराएवढे… त्यांनी स्वर्गीही नसलेला हा सुखसोहळा मराठी मातीत रुजवला… दोघेही वंदनीय. माहितीमध्ये काही त्रुटी संभवतात. सांगायचे राहून गेले असेलच… क्रमही चुकलेला असेल… पण वारी अनुभवली असल्याने काही लिहिता येते आहे.)
– लेख क्र. ३
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






