श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३६
☆ भिडले लोचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कसे अचानक जलधारांनी घिरले लोचन
आनंदाची वर्षा होता झरले लोचन
*
जे दिसले ते ह्या डोळ्यांना मृगजळ होते
फसवे पाणी फसवत होते फसले लोचन
*
चंद्र सूर्य अन् कुणीच साक्षी नव्हते तेव्हा
या प्रेमाचे केवळ साक्षी ठरले लोचन
*
मूक युद्ध हे दोघांमध्ये चालू होते
तेव्हा तेव्हा प्राणपणाने भिडले लोचन
*
दोघांचेही दुःख सारखे होते तरिही
तुझेच केवळ सहजपणाने रडले लोचन
*
डोळ्यांमधले सुख पाहू मी नाही शकलो
ओठांवरती ओठ ठेवता मिटले लोचन
*
शृंगाराची ती श्रीमंती उधळत गेली
असा अचानक धनाढ्य झालो हसले लोचन
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





