कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०४– विजय साहित्य
☆ शब्द सौंदर्याचा साज…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
नव्या युगाचे पोवाडे
बिजलीचा न्यारा बाज
सैन्य चाललेले पुढे
शब्द सौंदर्याचा साज…! १
*
अतींद्रीय प्रतिमांची
नादवती शब्दकळा
साधनेचा सपादक
लावी रसिकांसी लळा..! २
*
राष्ट्रसेवा दल आणि
साने गुरूजींनी साथ
साहित्यिक प्राध्यापक
मूळ नाव विश्वनाथ..! ३
*
दिशा अकरावी दिली
काव्य सकीना मानसी
शिंग फुंकले रणी ते
शब्द तेजसी राजसी..! ४
*
सामाजिक विषमता
हाताळली शिताफिने
आंग्ल,संस्कृत बंगाली
भाषा गुंफिली खुबीने..! ५
*
चळवळ स्वातंत्र्याची
केले भारत दर्शन
शब्द लावण्याचा ऋतू
जाणिवांचे संकर्षण…! ६
*
बारा गावच्या पाण्यात
संकलित लोककला
अभिजात शृंगारीक
बहरला शब्दमळा..! ७
*
जन जागृती करोनी
दिले विचारांचे दान
गाजविली अकादमी
काव्य दर्शनाची खाण…! ८
*
बाल साहित्यात ठसा
नेले परीच्या राज्यात
फुलराणी गिरकीने
चंगामंगा साहित्यात..! ९
*
सामाजिक सांस्कृतिक
साहित्यिक योगदान
परीपक्व मितभाषी
नैसर्गिक शब्दखाण..!१०
*
पुरस्कार विभुषीत
लाभे अध्यक्षीय मान
नाम वसंत बापट
काव्य दर्शनाची शान…!११
*
लावणीच्या लावण्यात
रमे वसंत लेखणी
शारदीय सारस्वती
सेतू संपदा देखणी..!१२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


