श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “फाटणं आणि फाडणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
फाटणं आणि फाडणं…
लहानपणी ज्या काही गोष्टींबद्दल प्रसाद (हातावर, गालावर, आणि पाठीवर) मिळाला असेल तो या दोन गोष्टींबद्दल जास्त असेल. (देवाचा) प्रसाद हा प्रेमाने तळहातावर ठेवला जातो व तो खाल्ला जातो. पण फाटणं आणि फाडणं यामुळे मिळणारा प्रसाद हा तळहातापासून पाठीपर्यंत अंगावर पडला होता. त्यासाठी जागेचं म्हणजे शरीराच्या भागाच, आणि जागेच म्हणजे कुठे आहोत याच बंधन नव्हत. आणि गोडवा… त्याचा तर संबंधच नसायचा.
फाटणं यात वस्तूच नुकसान असत. तर फाडणं बहुतेक वेळा मुद्दाम केल जात. फाटणं यात दुर्लक्ष, निष्काळजीपणा असतो. तर फाडणं यात काळजीपूर्वक करायचं कांहीही नसत. फाटणं यात दु:ख असत, तर फाडण्यात दु:खाचा संबंध असेलच अस नाही.
हा कागद कोणी फाडला… किंवा कसा फाटला… अथवा हे कागद काही कामाचे नसतील तर फाडून टाकू… फाडणं हा शब्द साधारण अशाच प्रकारच्या वाक्यात ऐकायला येतो. किंवा यात जे घडलं तीच क्रिया फाडणं यात अपेक्षित असते.
फाडणं याला व्यवस्थितपणा लागत नाही. यासाठी कोणतही मोजमाप नसत. याला कोणतही शास्त्र, किंवा सुत्र नाही. सुसूत्रता तर मुळीच लागत नाही. ऊलट व्यवस्थितपणे केलेला अव्यवस्थितपणाच यात अपेक्षित असतो. मनाला येईल तसे आणि तेवढे तुकडे करणं यालाच आपण फाडणं म्हणतो.
पण फक्त याच अर्थाने हा शब्द वापरतो का… तर मुळीच नाही. बर्याच चांगल्या गोष्टींसाठीसुध्दा फाडणं हा शब्द वापरतो, आणि त्यात बोलणारा आणि ऐकणारा यांना गैर वाटत नाही.
वर्गणी किंवा इतर चांगल्या ठिकाणी पैसे मिळाल्यावर दिली जाणारी पावती. याला पावती फाडणं असच म्हणतात. चांगल्या मनाने, चांगल्या कामासाठी दिलेल्या पैशांची पोचपावती देतांना त्या पावतीचा फाडणं असा ऊल्लेख होतो.
लग्न ठरल्यावर केली जाणारी कपड्यांची खरेदी. याला कपडा फाडायचा आहे असाच ऊल्लेख खान्देशात तरी सहज केला जातो. परत हा शब्द वापरतांना उत्साह जाणवतो. अशा कपडे फाडण्याच्या कार्यक्रमाला काहींना मानाने यायला सांगितल जातं. बर्याचदा तर अशा वेळी पंधरावीस जणं असल्याच मी पाहिलं आहे. काहीतर दुकानाच्या बाहेरच असतात. दुकानात साडी फाडली जाते आहे का शर्ट पीस आणि पॅट पीस हे त्यांना दिसतही नाही. पण कपडा फाडायच्या कार्यक्रमास ते हजर असतात.
एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच श्रेय, यश, अपयश कुणाच्या नावावर असेल, याला सुध्दा याचं बील कोणाच्या नावावर फाडायचं असाच प्रश्न मनात असतो. काही तर या यशासाठी आपणच असल्याचा दावा करतात. तर अपयशाच खापर कोणावर फोडाव याचा घाट घालतात.
असच बील फाडणं वस्तूच्या खरेदीनंतर सुध्दा असतं. आपल्या नांवाने जे बील फाडलं जात ती वस्तू आपण आनंदाने घेतलेली असते, बर्याचदा त्याचं बील संभाळून सुध्दा ठेवतो, पण वस्तू घेतांना त्याच बील मात्र फाडल जात.
दुध नासणं याला सुध्दा काही ठिकाणी दुध फाटलं असच म्हणतात. द्रवरूप पदार्थ नासतो, सांडतो. पण दुध मात्र फाटतं. दुधाचा चक्का करायचा असेल तर मात्र दुध मुद्दाम फाडलं जात. पण मला दुध फाटलं या शब्दाची गंमत वाटते.
पण या शब्दांमुळे काही गोष्टींना ऊजाळा मिळाला.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






