प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३३२
☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
समजला नाही कधी तो आगळा अनुनय मला
या कहाणीचा कधी कळलाच ना आशय मला
*
चारचौघा सारखा नव्हतास तू सामान्यही
भव्यतेचा नेहमी आलाय की प्रत्यय मला
*
माणसे जातात का, सहचर्य अर्धे सोडुनी
तू असा जाशील, नव्हता हा कधी संशय मला
*
कोणत्या पक्षात जाता लाभते खुर्ची इथे
धूर्त नेते सांगती, दावून खोटे भय मला
*
आपले नसते कुणीही वेळ येता समजले
पात्र आता द्रौपदीचे लाभले अक्षय मला
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





