श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ संधी-विग्रहाच्या पलीकडे… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
– – नाती, व्यवहार आणि समत्वाचा अंतर्मुख प्रवास
“शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ ।
भव समचितः सर्वत्र त्वं वाञ्छस्यचिराद्यदि विष्णुत्वम् ॥”
(द्वादशपञ्जरिका स्तोत्रम्)
व्दादशपञ्जरिका स्तोत्रात आचार्य शिष्याला वरील उपदेश करतात.
– – शब्द थोडे पण आशय अथांग.
आचार्य असे का म्हणतात?
– – शत्रू असो वा मित्र, पुत्र असो वा बंधू—या नात्यांच्या संधी-विग्रहात मनाला इतके गुंतवू नकोस की तुझे चित्तच अस्थिर होऊन जाईल. सर्वत्र समचित्त राहा. परमात्म्याशी ऐक्याची आकांक्षा असेल, तर अंतःकरणात समत्व जागव.
आचार्यांचे हे वचन वाचताना एक प्रश्न मनात येतो—
— मग व्यवहार करायचा कसा?
शत्रूशी विग्रह करायचा नाही? मित्राची चूक झाली तर विरोध करायचा नाही? पुत्र चुकीच्या मार्गावर गेला तर त्याला थांबवायचे नाही?
– – या प्रश्नाचे उत्तर शोधले की या श्लोकाचा सूक्ष्म अर्थ उलगडू लागतो.
नाती नकोत असे नाही…
आचार्य नाती तोडायला सांगत नाहीत.
ते नात्यांभोवती मनाने विणलेली आसक्तीची जाळी तोडायला सांगतात.
– शत्रू असेल तर त्याचा प्रतिकार करावा लागेल.
मित्र असेल तर स्नेह ठेवावा लागेल.
पुत्र असेल तर प्रेम करावे लागेल.
बंधू असेल तर नाते निभवावे लागेल.
व्यवहार नाकारून अध्यात्म साधत नाही.
– मग सोडायचे काय?
अतिरेकी मोह. द्वेष. अपेक्षांचे ओझे. ‘माझे’ आणि ‘परके’ यांत मनाला अडकवणारी तीव्रता.
– – नाती राहू द्यावीत.
पण नात्यांनी मनाला कैद करू नये.
नाती हातात असावीत;
गळ्यातील फास होऊ नयेत.
संसार बाहेर कमी, मनात अधिक
शत्रू बाहेर असतो; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपण मनात वाढवत राहतो.
मित्र बाहेर असतो; पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा मनात घर करतात.
पुत्र आपला असतो; पण त्याच्यावरील मोह कधी विवेकावर सावली टाकतो.
म्हणून प्रश्न नात्यांचा नाही.
– प्रश्न आहे—नात्यांशी आपले मन किती बांधले गेले आहे?
आचार्यांना हीच गाठ सोडवायची आहे.
समत्व म्हणजे समान वर्तन नव्हे
‘समचित्त’ म्हणजे सर्वांशी अक्षरशः एकसारखे वागणे नव्हे.
– दुष्ट आणि सज्जन यांच्यात भेद करावाच लागतो. न्याय आणि अन्याय यांत फरक करावाच लागतो.
समत्व म्हणजे विवेक सोडणे नव्हे;
– विवेकाला राग-द्वेषाच्या ताब्यात जाऊ न देणे.
गीता सांगते—
“समत्वं योग उच्यते।”
– – मन एखाद्याच्या प्रेमाने उंचावले आणि दुसऱ्याच्या द्वेषाने कोसळले, तर त्या मनाचे स्वातंत्र्य कुठे राहिले?
ज्याच्या हातात आपला राग आहे,
त्याच्या हातात आपल्या मनाची दोरी आहे.
व्यवहारात भेद, दृष्टीत अभेद
गीतेतील—
“पण्डिताः समदर्शिनः”
– – ही दृष्टी समत्वाचा गाभा सांगते.
समदर्शी ज्ञानी सर्वत्र एकच आत्मतत्त्व पाहतो. याचा अर्थ व्यवहारातील सर्व भेद नष्ट करणे नव्हे. प्रत्येक व्यक्तीचे आचरण, कर्तव्य आणि स्थान वेगळे असू शकते.
पण अंतःकरणातील दृष्टी द्वेषाने कलुषित होऊ नये.
व्यवहारात भेद.
दृष्टीत अभेद.
– – कदाचित समत्वाचे हेच सर्वांत नेमके सूत्र.
मग विग्रह करायचाच नाही?
करावा लागला तर करावा.
अन्यायासमोर उभे राहणे हेही कर्तव्य असू शकते. सत्यासाठी विरोध करावा लागू शकतो. म्हणून विग्रहाचा निषेध नाही; विग्रहामागील द्वेषाचा निषेध आहे.
महाभारताच्या रणभूमीवर अर्जुनासमोरही मोह आणि कर्तव्य यांचा संघर्ष उभा राहिला. श्रीकृष्णाने त्याला पलायनाचा मार्ग दाखविला नाही; मोह बाजूला ठेवून कर्तव्यकर्म करण्याची दिशा दिली.
म्हणून—
कर्तव्य करावे; पण द्वेषाने नव्हे.
विरोध करावा; पण प्रतिशोधाने नव्हे.
सीमा आखावी; पण अंतःकरणात वैराची भिंत उभी करू नये.
संधीही विवेकाने, विग्रहही विवेकाने
संधी म्हणजे नेहमी सद्गुण नव्हे.
कधी ती शहाणपण असते; कधी भीतीची सावली.
विग्रह म्हणजे नेहमी दोष नव्हे.
कधी तो अहंकार असतो; कधी धर्मरक्षणाचे रूप.
म्हणून प्रश्न कृतीचा कमी आणि अंतःप्रेरणेचा अधिक.
मी का लढतो आहे?
स्वार्थासाठी?
अहंकारासाठी?
प्रतिशोधासाठी?
की न्यायासाठी?
मी का संधी करीत आहे?
भीतीपोटी?
लोभापोटी?
की शांततेसाठी?
«कृती बाहेरची असते;
तिचे खरे स्वरूप मनात ठरते. »
प्रेम असावे; मोह नसावा
पुत्रावर प्रेम करावे; पण त्याची चूक दिसली तर सांगावी.
मित्रावर प्रेम करावे; पण तो चुकीचा असेल तर सत्य सांगावे.
बंधूवर प्रेम करावे; पण बंधुत्वाच्या नावाखाली अन्यायाला समर्थन देऊ नये.
शत्रूचा विरोध करावा; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपल्या अंतःकरणात साठवू नये.
प्रेम माणसाला उंचावते;
मोह त्याला बांधतो.
कमळाचे रहस्य
कमळ पाण्यात असते.
पण पाणी त्याला चिकटून राहत नाही.
– – संसाराचेही तसेच.
संसार सोडून दूर जाणे हीच विरक्ती नव्हे. संसारात राहूनही संसाराला मनाचा स्वामी होऊ न देणे—ही खरी विरक्ती.
– हात संसारात.
– मन समत्वात.
– – हीच अंतर्मुक्तीची दिशा.
संघर्ष बाहेरचा, शांती आतली
जीवनात संघर्ष टाळता येत नाही.
कधी घरात.
कधी समाजात.
कधी कार्यक्षेत्रात.
आणि कधी स्वतःच्या मनातच.
– – पण प्रत्येक संघर्ष अंतःकरणात उतरवायचा नसतो.
काही संघर्ष बाहेरच थांबवायचे असतात.
सीमा बाहेर आखायची.
शत्रुत्व आत वाढू द्यायचे नाही.
अध्यात्म म्हणजे संघर्षापासून पलायन नव्हे.
संघर्षाच्या मध्यातही विवेक आणि शांती जपण्याची शक्ती—हीच साधना.
शेवटी काय उरते?
– शत्रू कायमचा राहत नाही.
– मित्रही कायमचा राहत नाही.
– आजचा परका उद्या जवळचा होऊ शकतो.
– आजचा जवळचा उद्या दुरावू शकतो.
– संधी होतील.
– विग्रह होतील.
– जिंकणे-हरणे चालूच राहील.
मग या सगळ्यांच्या पलीकडे काय उरते?
– –आपले चित्त.
ते रागाने व्यापले असेल तर विजयातही पराभव असतो.
ते द्वेषाने भरले असेल तर शत्रू दूर असूनही आपल्या मनातच वसतो.
आणि ते समत्वाने उजळले असेल
तर संघर्षाच्या मध्यातही शांती जन्म घेते.
आचार्यांचा अंतिम संकेत
आचार्य म्हणतात—
शत्रूशी व्यवहार कर.
मित्राशी स्नेह ठेव.
पुत्रावर प्रेम कर.
बंधूचे नाते निभाव.
पण या सर्वांच्या पलीकडे स्वतःला विसरू नकोस.
संधी करावी लागेल—कर.
विग्रह करावा लागेल—कर.
पण मनाचा ताबा कोणालाही देऊ नकोस.
– – कारण मुक्ती नात्यांपासून पळण्यात नाही.
मुक्ती आहे—
नात्यांत राहूनही अनासक्त राहण्यात.
विग्रह बाहेर असला तरी चालेल… तो अंतःकरणात नको.
संसार हातात असू दे.
मन परमात्म्यात असू दे.
आणि मग—
शत्रू असो वा मित्र,
पुत्र असो वा बंधू,
संधी असो वा विग्रह—
चित्ताच्या आकाशात एकच ऋतु उरेल—
– समत्वाचा!
©️ दिवाकर बुरसे
पुणे.
संपर्कः ९५५२६२९२४५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





