श्री श्रीकांत आटोळे
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ अपेक्षा ☆ श्री श्रीकांत आटोळे ☆
☆
☆ अपेक्षा ☆
☆
मला मी पाहिजे म्हणून,
एकांतात आलो खरं;
परी शांततेच्या कुशीतही,
मन माझे अशांत.
*
मग विचारलं मनालाच,
काय आहे हे उरलेलं?
कसल्या या अदृश्य धाग्यांनी
मन माझं बांधलेलं?
*
उत्तर आलं हळूच—
☆ अपेक्षा…☆
☆
अपेक्षांमुळेच रुजती
लोभ अन् अहंकार मनी;
वाटतं, अपेक्षांचे हेच तर
खरे धनी.
*
राग आणि ईर्ष्या ही त्यांच्या संगतीला,
आलेत का जणू श्वास माझा रोखायला.
*
सुख-दुःखही त्यांच्याबरोबर
मनाच्या दारी आले,
आणि नकळत या अपेक्षा
मनाला बांधत गेले.
*
नको आता मनाला बांधणं,
नको अपेक्षांचं ओझं;
स्वतःला शोधण्याच्या वाटेवर
*पहिलं उत्तर मिळालं माझं—*
*
☆ अपेक्षा ☆
☆
ही कविता माझ्या मनातील विचार, भावना आणि अनुभवातून स्वतः लिहिली आहे
स्वतःला शोधताना जाणवलं—
मनाला बांधून ठेवणारी बंधनं बाहेर नसतात, ती अनेकदा *अपेक्षांची* असतात.
“मला फक्त मी पाहिजे” ही स्वतःकडे वळलेली हाक होती,
“अपेक्षा” हे त्या प्रवासात सापडलेलं पहिलं सत्य.
आता पुढची वाट — “साधना.”
स्वतःला शोधण्यापासून, अंतर्मनाच्या शांततेत हरवण्याचा हा प्रवास…
☆
© श्री श्रीकांत आटोळे
लोणार, जि. बुलढाणा, महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





