डाॅ. मेधा फणसळकर
☆ जीवनरंग ☆ प्रेमाचा रंग ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆
आई, मी तुझीच मुलगी ना?” रियाच्या या प्रश्नाने निशा दचकली. तिने झटकन रियाला जवळ घेतले व विचारले,“का ग बेटा? असे का विचारतेस? तू तर माझे लाडके पिल्लू आहेस.” “शेजारची रिमाकाकू म्हणते की तू आईची खरी मुलगी नाहीस. तुझी आई बघ किती गोरी आहे आणि तू बघ किती काळी ते!” चिमुकल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत निशाने रिमाला अधिकच जवळ ओढून घेतले. वास्तविक रियाला तिने अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते आणि ती जरा मोठी झाली की तिला सर्व सांगणारच होती. पण शेजारच्या रिमाने त्या आधीच त्या बालमनाला घायाळ केले होते. तिला शांतपणे थोपटत निशा म्हणाली,“ बाळा, आपला रंग आपल्या हातात थोडाच असतो?आणि तुला आठवते? परवा तुला पायाला ठेच लागली आणि रक्त आले होते. तसेच आज भाजी चिरताना माझे बोट कापले. तेव्हा रक्त आले. आपल्या दोघींच्या रक्ताचा रंग लालच होता किनई? मग तू माझी मुलगी कशी नाहीस?” त्या अजाण बालमनाला ते लगेच पटले आणि तिने आईला घट्ट मिठी मारली . निशा मनात म्हणाली,“ आमच्या बाह्यरंगात फरक असेल, पण माझ्या या पिल्लाच्या आणि माझ्या नात्यातील प्रेमाचा रंग नेहमी गहिराच असेल.”
© डाॅ. मेधा फणसळकर
9423019961
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈