☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-2 ☆ श्री आनंदहरी ☆

तिने चुलीवर चहाचं आदण ठेवलं होतं. सासू आल्यावर संगं संगं चहा घ्यायचा आणि स्वैपाकाच्या तयारीला लागायचं असा विचार तिने केला होता.. पण तिच्या आदमासापेक्षा सासूला यायला जास्तच उशीर झाला तशी मनात दाटू लागलेली काळजी.. ‘भेटलं असेल कुणीतरी..बसल्या असतील पारभर..’ असा विचार करत तिने चुलीतील राख बाजूला सारावी तशी बाजूला सारत चहाचे भुगुनं चुलीवरून उचलून वैलावर ठेवलं आणि चुलीवर तवा ठेवत, बसल्या जागेवरूनच फडताळाजवळचा भाकरीच्या पिठाचा डबा आणि परात जवळ ओढली..परातीत पीठ घेऊन तवलीतले पाणी घेऊन पीठ मळायला सुरवात केली.. चुलीतील जाळ कमी झालेला पाहताच फुंकणीने जाळ केला आणि भाकरी थापायला घेतली..

पहिली भाकरी तव्यात टाकून दुसरी मळायला घेतली. तेवढ्यात बाहेर कसलातरी गलका ऐकू आला.. कसला गलका झाला ते  सुरू असलेल्या पावसामुळे नीट ऐकू येईना.. नकळत तिचं काळीज हरणीवानी झाले तशी परात बाजूला सारून ती उठली.  सोप्यावर आली.. पण नेमका कशाचाच अंदाज येईना. उगा काळजी मनाला पोखरू लागली. जीव काही राहिना.. ती मागे परतली तोवर तव्यातली भाकरी करपली होती.. तिने तवा खाली उतरून ठेवला..चुलीतील लाकडं इस्तू झाडून बाजूला सारली आणि कसेबसे दार लोटून घेत पळतच गलक्याच्या दिशेने धावतच सुटली.  मारुतीच्या देवळाकडनं गलका ऐकू येत होता. तिचं घर गावाच्या एका टोकाला तर मारुतीचे देऊळ दुसऱ्या टोकाला होतं. ती जसजशी देवळाजवळ जात होती तसे गलका जास्तच ऐकू येऊ लागला होता पण पावसानं नीटसं ऐकू येत नव्हतं. पळता पळता मध्येच कुठून तरी  ‘ पान लागलं..’ असे शब्द तिच्या कानावर आले.. तिचं काळीज लख् कन हाललं… गावंदरीच्या रानात नाग-सापाचा वावर होता हे तिला ठाऊक होतं.. मनातल्या शंका-कुशंकांनी तिच्या पायातले त्राणच गेले होते… पण तरीही ती जिवाच्या करारावर पळत राहिली होती.

मारुतीच्या देवळाजवळ सारा गाव गोळा झाल्यागत दिसत होता. ती पावसात चिंब निथळतच देवळाजवळ आली.. तिला पाहताच दोघी तिघी बायका तिच्या जवळ आल्या तिला थोपवलं. तिला जवळ धरतच हळूहळू देवळाच्या मंडपाकडे सरकू लागल्या.. तिला नेमकं काय होतंय तेच समजेना.. तेवढयात एकीने विचारलं..

“रामा कुनीकडे गेलाय ?”

ही बाई नवऱ्याची चौकशी का करतेय ? आपल्या हातांना असे का धरलंय ? तिला काहीच समजत नव्हतं.. पण त्यामुळे तिच्या मनाला पुन्हा आशंकांनी घेरलं. तिला पुढं जायचे होते..पण तिला थांबवत एक म्हातारी  पाणावल्या डोळ्यानं म्हणाली,

“आगं, रखमीला पान लागलं..”

आपल्या सासूला पान लागलंय हे ऐकून तिच्या पायातील त्राणच गेले. ती मटकन तिथंच खाली बसली.

तोवर मंडपाच्या दाराशी असणारी गर्दी हटवण्यासाठी पाटील ओरडले,

“ये चला रं, सरका बाजूला.. आन कुणीतरी रामा कुठाय ती बघून त्येला म्होरं घालून तेच्या घरला घेऊन या जावा..”

गर्दी मागं सरली.. रखमा गेली ते जाणत्या बाया माणसांनी ओळखले होते. त्यातली एक तिच्या भोवतीच्या बायकांना म्हणाली,

“हिला घरला जावा घिऊन..”

बायका तिला घरी घेऊन निघाल्या..पण एवढ्या सगळ्या बायकांत तिला तिची सासू दिसली नव्हती.. तिला रडावं, ओरडावं, आक्रोश करावा असे वाटत होतं पण ती स्तब्ध होती.. दगडाच्या मूर्ती सारखी, भान हरपल्यासारखी.. बायका तिला घेऊन घराकडे निघाल्या होत्या.  त्यांच्या डोळ्यात पाणी होतं… पण तिचे डोळे ठक्क कोरडे होते. नाही म्हणायला पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे थेंब तिच्या चेहयावरून ओघळत होते…कुणीतरी छत्री धरली होती तरीही..

तिची सासू, रखमा पान लागून गेली होती तेंव्हापासून रात्रभर पाऊस नुसता कोसळत होता.

क्रमशः ——–  भाग 3

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments