(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी गजल यात्रा का एक और पड़ाव “कवितेवरची कविता“। अब आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं । )
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 3 ☆
☆ कवितेवरची कविता☆
कवितेमधला गझल हा प्रकार मनाला खुप भावला. १९९२ साली अनिल तरळे या अभिनेत्याने बालगंधर्व परिसरात गझलकार इलाही जमादार यांची ओळख करून दिली, कॅफेटेरियात आमची कविता-गझल अशी मैफल जमली,इलाहींच्या गझलांनी मी खुपच भारावून गेले, असे वाटले कविता लिहिणं सोडून द्यावं,वरचेवर इलाहींशी भेटी होत होत्या, इलाहींनी गझलतंत्र, गझलची बाराखडी या विषयी काहीच सांगितलं नाही, ते म्हणाले तुम्ही, “आपकी नजरोने समझा प्यारके काबील मुझे”.. ही ओळ गुणगुणत रहा, त्या मीटर मध्ये तुम्हाला गझल सुचेल! पण तसं काही झालं नाही!
बरेच दिवसांनी अचानक शब्द आले…गझल पूर्ण झाली! शरद पाटील हा कवी त्या काळात झपाटल्यासारखी गझल लिहित होता, त्याला दाखवली,त्यानी सांगितलं होतं पहिल्या शेरात गडबड आहे बाकी सगळे शेर बरोबर आहेत, पहिला शेर मी सुरूवातीला असा लिहिला होता,
“यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
ओळखीचा एकही पहेराव नाही”
काय गडबड आहे हे त्यालाही सांगता आलं नाही आणि मलाही समजलं नाही, एका खाजगी मैफलीत इलाही, दीपक करंदीकर यांच्या समोर सादर केली,त्यांनी ही ईस्लाह वगैरे केलं नाही, माझ्या पहिल्या संग्रहात मी तशीच छापली आहे, पुढे डाॅ. राम पंडितांचे लेख वाचून गझलची लगावली समजली मग मी सानी मिसरा बदलला….घेतलेले राज्य अन तो डाव नाही…आणि लक्षात आलं हे मंजुघोषा वृत्त आहे, अचानकच हातून लिहिलं गेलेलं!
पुढे गझलेवरची गझल ही झाली… *आज अचानक लेखणीस गवसली गझल, स्नेहभराने काळजात उतरली गझल*
माझी पहिली गझल
यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
घेतलेले राज्य अन तो डाव नाही
आज मज हाका नका मारू कुणीही
जे तुम्ही घेताय माझे नाव नाही
का असे डोळ्यात पाणी पावलांनो
स्वैर आभाळी तुम्हा का वाव नाही
जायचे वस्तीत चोरांच्या कशाला
सोबती येथे कुणीही साव नाही
सोनियाचे मुकुट डोई देवतांच्या
भक्तिला आता कुठेही भाव नाही
जाहल्या जखमा किती या काळजाला
मारणारा एकही मज घाव नाही
झुरत अंधारात आहे एकटी मी
सावलीला ही इथे शिरकाव नाही
संपता आयुष्य माझे भेटण्या ये
मरणयात्रेला कुणा मज्जाव नाही
(१९९३ साली रचलेली गझल आहे )
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503
Excellent Marathi Gazal!
Thank you very much sir