कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 184 – विजय साहित्य
☆ रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
रूपं सावळे सुंदर
उभे आहे विटेवरी
पांडुरंग हरी रूप
ठेवी कर कटेवरी….!
नाम संकीर्तनी हरी
माळ तुळशीची गळा
वैष्णवांचा मायबाप
लावी पंढरीचा लळा…!
अष्टगंध अबीराने
दिसे खुलूनीया रुप
मत्स्य कुंडले किरीट
मोहवीते निजरूप…!
राजा पंढरीचा माझा
मागे रखुमाई राणी
पितांबर आणि शेला
गाई कैवल्याची गाणी….!
रूप सावळे सुंदर
कंठी वैजयंती माला
संकटात धावे विठू
सखा वैष्णवांचा झाला..!
संत साहित्यात शोभे
विविधांगी पांडुरंग
पहा आषाढीची वारी
विठू दर्शनात दंग….!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈