सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 224
☆ तपस्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
पहाट ओली धुक्यातील ही, धुंद गारवा,सभोवती
वृक्षवल्लरी सुखात गाती, मधुमिलिंदही गुणगुणती
*
गाव कोणते, कुठली वस्ती, सारे काही, अनोळखी
तुझ्यासवे मी इथवर आले, आत्म्यामधली, ही तलखी
*
तहान माझी युगायुगांची, तू माझा रे स्वप्नसखा
या देहावर त्या देहाचा, जणू घातला, अंगरखा !
*
मैथुनातले सुख अनुभवती, मनुष्यप्राणी-पशुपक्षी
या आत्म्यावर, देहावर ही, गोंदवलेली, ही नक्षी!
*
तृप्त जाहले, तव स्पर्शाने, मिटली सारी मम तृष्णा
ओढ, वासना, आसक्तीही, असे तपस्या… रे कृष्णा !
☆
© प्रभा सोनवणे
२ एप्रिल २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈