श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 244
☆ प्रीतिची शिल्लक ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वार एवढे नको करू तू पाठीवरती
अनेक जखमा तुझ्याच आहे नावावरती
*
हृदय वाहुनी तुला टाकले नको काळजी
वार झेलण्या मीही तत्पर छातीवरती
*
जुने वाद ते नकोच आता उकरुन काढू
बोलत जा ना कधीतरी तू प्रेमावरती
*
साक्षर नव्हती बहिणाबाई तरी प्रतीभा
बहिणाईला ओव्या सुचल्या जात्यावरती
*
युद्धासाठी तो आलेला रणांगणावर
शर नाही तर गुलाब दिसले भात्यावरती
*
नको वल्गना नकोच चिंता नकोच संशय
शुद्ध भावना डाग नसावा नात्यावरती
*
नको बंगला नकोच गाडी प्रेम असावे
मज प्रीतिची शिल्लक दिसुदे खात्यावरती
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈