श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 256
☆ अधर्म ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
दुष्काळाच्या झळा पाहुनी पाझर होऊ
हसवायाचे व्रत घेऊनी जोकर होऊ
*
धर्म आपला माणुसकीचा एकच आहे
सांग कशाला हवी दुष्मनी मैतर होऊ
*
कसा पहावा अधर्म येथे या डोळ्यांनी
तिसरा डोळा उघडू आणिक शेखर होऊ
*
पिझ्झा बर्गर नको व्हायला आता आपण
गरिबाघरची कायम आता भाकर होऊ
*
रस्त्यावरती पोर कुणाचे उघड्यावरती
थंडी आहे त्याच्यासाठी लोकर होऊ
*
माझ्यासाठी कायम झाला बाप फाटका
त्याच्यासाठी आता कोरे धोतर होऊ
*
पोट मारुनी पैसा पैसा जोडत गेला
त्याच्यासाठी भक्कम आपण लॉकर होऊ
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈