सौ. ज्योती कुळकर्णी `

🌸  विविधा  🌸

माझी अंतराळ सफर☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

त्यादिवशी सकाळी सगळी कामं आटपून रोजच्या प्रमाणे पेपर हाताळायला घेतला तर ही मोठ्या ठळक अक्षरात जाहिरात दिसली….

अंतराळवीरांसोबत जायला मेड पाहिजे. अंतराळात पण प्रदूषण वाढायला नको व त्यांना ताजे अन्न मिळायला हवे म्हणून काहीही शिजवलेले अन्न न नेता कुकिंग करू शकणारी मेड न्यावयाचे ठरले आहे. भारतीय असल्यास प्राधान्य

वाचूनच माझ्या तर मनातल्या मनात लाडू फुटायला लागले. डॉ. जयंत नारळीकर माझ्या दूरच्या नात्यात होते. माझी आई नेहमी सांगायची, फार पूर्वी त्यांच्या व आपल्या बैलगाडीचे चाकं एकाच बोरीच्या झाडापासून बनवले होते म्हणून. मी ठरवलं! त्यांच्याकडूनच थोडा वशिला लावायचा आणि जायचंच. ह्यांना तसं सांगितलं व मुलीला विचारून, मी जाऊन येईपर्यंत त्यांना मुलीकडे ठेवायचे ठरलं.

हे बोललेच मध्ये…..

“सुनिता विल्यम्स सारखी अडकून पडली म्हणजे? ”

मी म्हटले..

“काही अडकत नाही. आणि ती अडकली तरी आलीच ना वापस? आधी मला अर्ज तर करू द्या. त्याच्यानंतर सिलेक्शन होईल. मग मी जाईल”

मी अर्ज केला ठरल्याप्रमाणे वशिला पण लावला आणि एक दिवस गंमतच झाली चक्क नासा मधून फोन वाजला….

“My name is John, I’m speaking from NASA. Are you Jyoti Kulkarni? “

मी म्हटले…

“Yes, but I can’t speak English and I don’t understand it. Can you arrange for someone who speaks Marathi? “

तो म्हणाला…

“There is no need for that. We have developed an app that translates from speech. If I speak English, you will hear it in Marathi, and if you speak in Marathi, I will hear it translated into English. “

चलाबाई माझा मोठा प्रश्न मिटला तेवढं इंग्लिश मध्ये बोललेलं समजलं मला पण पुढचं कसं समजलं असतं इतकं सगळं?

तो पुढे म्हणाला….

“अभिनंदन मॅडम तुमचे अंतराळवीरांसोबत मेड म्हणून जाण्यासाठी तुमचं सिलेक्शन झालं आहे. ” बापरे! मला तर काही सुचतच नव्हतं आनंदाने! यांना म्हटलं….

“अहो माझं सिलेक्शन झालं आहे अंतराळवीरांसोबत जाण्यासाठी” आता ह्यांना कुचकं बोलल्याशिवाय राहवलं नाही…

“मेड म्हणूनच ना! ” बडबडलेच ते

स्वतःला यायला मिळणार नाही म्हणून जळकुकडेपणा आहे येवढंही कळत नाही का मला! मी साफ दुर्लक्ष केलं आणि म्हंटलं ;

“हो पण म्हणून काय झालं! त्यांना माझ्या कष्टांची, चांगला स्वयंपाक करण्याची किंमत आहे म्हणून माझं सिलेक्शन झालं बरं”

तितक्यात तो म्हणाला,

“आधी माझं ऐकून घ्या मॅडम! मग तुम्ही आपसात भांडा! ” मी तोंडावर हात ठेवून त्याला तोंड वाकडं केलं. व्हिडिओ काॅल होता नं!

मनातच म्हंटलं “सगळे पुरुष इथून तिथून सारखेच! हो न्नं तं काय! ”

आणि त्याच्याशी बोलू लागले..

पुढे तो म्हणाला..

“तुम्हाला कपडे आमच्यातर्फे अंतराळ यानात घालता येतील असे मिळतील. खाणं अर्थातच आमच्या सोबत मिळेलच आम्हाला महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी छोले भटूरे, असे सगळे पदार्थ खाऊ घालावे लागतील”

मी म्हंटले…

“अय्या हो ss त्यात काय एवढं पुरणपोळी पासून सगळं खाऊ घालेन. नाही तरी आता सगळे सणवार तिकडेच होतील नं! “

“माझ्या काही शंका मी विचारू शकते का? ” त्याला पुढे बोलूच न देता मी मध्येच बोलले.

“शुअर! “. तो म्हणाला….

“तिथे नैसर्गिक विधी कसे उरकायचे? आणि झोपायचे कसे? “

मला नेहमी अंतराळवीरांबद्दल पडलेला प्रश्न विचारूनच टाकला.

“त्याचे ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊच नं मॅडम. आता आम्ही नवीन शोध लावला आहे. आता अंतराळयाना मध्येच पृथ्वीवर असते त्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण निर्माण करता येते! तुम्ही काही तरंगणार नाही इथे. त्यामुळे यानात पृथ्वीपेक्षा खूप काही निराळं तुम्हाला वाटणार नाही. शिवाय काही अडचण आली तर आम्ही आहोतच”… तो म्हणाला.

“शिवाय आम्ही असाही शोध लावला की सगळ्या वेस्ट प्रॉडक्टचं विघटन अंतराळातच करून टाकता येईल. तिकडे प्रदूषणाला सुरुवातच होणार नाही. तुम्हाला अंतराळ यानाची खिडकी उघडून सारखा कचरा टाकायचं कारणच नाही” हॅ हॅ हॅ करत त्यांनी जास्तीची माहिती पुरवली.

“मेल्या भारतीय बायकांना एवढे बुद्धु समजतोस का? मला माहिती आहे, विमानाप्रमाणेच यानाची पण खिडकी उघडता येणार नाही ते! गधड्या मला ‘भ’वरच्या सगळ्या देता येतात. अस्सल वऱ्हाडी आहे मी! त्याचं भाषांतर तुझ्या इंग्लिश मध्ये काय होईल माहिती नाही”

मनातच म्हटलं मी.

त्याच्याबरोबर जायचं असल्याने मोठ्याने कशाला बोलू? त्याच्या हॅ हॅ हॅ तर माझंही दात विचकणं मिसळून टाकलं मी!

सगळ्या फाॅर्मॅलिटीज् पूर्ण झाल्यावर आमचे जायचे नक्की ठरले आणि आम्ही ठरल्याप्रमाणे यानात बसलो. आणि यान उडालं. माझ्या बाकीचे कोणी ओळखीचे नव्हते. पण जॉन असल्याने काळजी नव्हती.

बापरे! यानात दिशा समजायचं काही कारणच नव्हतं! जाॅनला ते माझ्या चेहऱ्यावरूनच समजलं की काय! तो म्हणाला….

“अंतराळात दिशा नसते पृथ्वीवर आपण सोयीसाठी दिशा ठरवलेल्या आहेत”

“बरं! बरं!” मी म्हंटले

मग मी चहा ठेवायला उठले तरंगायलाच लागले. जॉनला म्हटले…

“तू तर म्हणाला होतास की आम्ही इथे पृथ्वीवरचं वातावरण तयार केलं आहे म्हणून! “

तो म्हणाला.. “ओह् सॉरी” त्यांनी कसंबसं उठून प्लग लावलं व बटन ऑन करून पृथ्वी सारखं वातावरण तयार केलं.

नंतर मी चहा व स्वयंपाक केला सगळ्यांसाठी. असे दिवस खूप छान गेले. मेड असले तरी सगळ्यांनी सामावून घेतले मला. भाषांतराच्या ॲपमुळे भाषेची अडचण आलीच नाही. खेळी मेळीने, हसत खेळत दिवस जात होते.

एक दिवस रात्री खूपच लवकर झोप लागली मला. हो अंतराळात झोपेची सवय नेहमीप्रमाणेच राहते बरं का! आपण नेहमीप्रमाणेच झोप घेऊ शकतो. आता थोडी थोडी माहिती मलाही व्हायला लागली होती.

मी झोपले. अर्ध्या रात्री मला वॉशरूम मध्ये जायचं होतं. खूप शोधत होते टॉयलेट. पण सापडतच नव्हते. काही केल्या बाथरूम सापडली नाही. खूपच अस्वस्थ झाले मी.

शेवटी झोपेतल्या झोपेतच माझ्या लक्षात आले की खूप झोपेत असले की स्वप्नात आपल्याला वॉशरूमची जागा सापडत नाही. मला हे झोपेतही लक्षात आले की आपण यानात नसून खूप झोपेत आहोत म्हणून! मग ताडकन उठले व घरातल्या वॉशरूम मध्ये जाऊन आले.

हुश्य! बापरे जागी झाले नसते अन अंतराळयानातली वॉशरूम सापडली असती तर…. 😛

वाचता वाचता केव्हा झोप लागली कळलंच नाही बाबा मला.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted