श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “टांग…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
खरतर टांग म्हटल्यावर नानाची टांग हेच आठवतं. असं म्हणणं सभ्यतेला धरुन नसले तरी सभ्यपणे राग व्यक्त करण्यासाठी या पेक्षा सभ्य शब्द नाहीत. टांग हा असभ्य शब्दातला त्यातल्यात्यात सभ्य वाटतो. दगडापेक्षा वीट मऊ………
झालं असं…. परवा सहज म्हणून मुलांची सायकल चालवावी असं वाटलं म्हणून सायकलवर टांग टाकावी म्हणून सायकलीसह बाहेर पडलो……. सायकलवर टांग टाकावी अस म्हटल्यावरच चालवायच फील येतं. पण आज तो योग दिसत नव्हता.
सायकल घेऊन थोडे पुढे जाऊन टांग टाकणार तोच एका ओळखीच्यांनी हात दाखवला…. टांग टाकतांना कोणी हात दिला तर बरं वाटत, पण दाखवला तर वाईट वाटतं हे तेव्हा मला चांगलं जाणवल. त्यांनी वर करून दाखवलेल्या हातामूळे माझी वर गेलेली टांग खाली आणावी लागली, आणि सायकलवर टांग टाकणे राहिले. थोड्या गप्पा झाल्यावर त्यांचा कल पाहून मी सायकल घेऊन पुढे निघालो……. आजकाल कोणतीही गोष्ट कल पाहून करावी लागते. नाहीतर उगाच कलकल होते.
परत पाय टाकणार, तोच शेजारचे रस्त्यात दिसले. काय? सायकल चालवायला सुरुवात करणार का? छान… आजकाल आपला पाहिजे तसा व्यायाम होत नाही. अधुनमधून चालवणे गरजेचे आहे. सध्या व्यायाम करायला सायकल हाच उत्तम उपाय आहे. उपाय यावर ते इतके बोलले की मला बऱ्याचदा तिथून काढता पाय घ्यावा आणि सायकलवर टाकावा असे वाटले. पण उपायावर ते इतके घट्ट चिकटले होते की मला थांबून ऐकणे हाच उपाय होता. इतका त्यांचा उपाया वरचा पाया भक्कम होता.
एकदाचा त्या (उ)पायातून सुटलो. परत पुढे जाऊन सायकलवर पाय टाकून बसणार…… तोच परत ओळखीचा आवाज. कसे काय? आज एकदम सायकल? नाही, चांगलेच आहे ते. पण सांगतो आजकालच्या सायकल फक्त दिखाऊ….. आपल्या वेळी कशा टिकाऊ होत्या. यावर त्यांनी नाजूक, दणकट, दिखाऊ, आणि टिकाऊ यावर त्यांचे मन मोकळं करण्यास सुरुवात केली. (अगदी घंटागाडीत कचऱ्याची टोपली झटकून रिकामी करावे तसे. ) मी त्याच्या टिकाऊ आणि दिखाऊ यावर खाऊ की गीळू या नजरेने बघत ऐकत राहिलो. आणि परत एकदा सायकलवर बसण्याऐवजी त्यांचे ऐकत ऊभा राहीलो.
चला आता आरामात सायकल चालवू, असा विचार केला तोच परत आणखीन एकदा थांबावे लागले. कारण परत ओळख हेच होते. अहो आजकाल तुमच्या सारख्याचे काम एक. सी. मधे आरामात बसून करायचे. त्यामुळे अस सायकल चालवणं गरजेचे आहे. तुमच्या सारख्यांचे आणि आरामात बसून यावर त्यांचा इतका जोर होता की थोडावेळ मी काहिही काम न करता दिवसभर नुसता बसून (फुकटचा) पगार घेतो असच मला वाटलं.
आज बहुतेक सगळ्याच राशी माझ्या राशीला भेटण्याचा योग दिसत होता. कारण यात बराच वेळ खर्च झाला होता. (आपण स्व:ताहून बोललो तर आपण वेळ देतो. आणि दुसरा आपल्याशी बोलला तर आपला खर्च होतो. हे मला नव्याने समजले. ) आता इतकावेळ गेल्यावर सायकलवर टांग टाकायची या विचारालाच टांग मारावी असे वाटले आणि घराकडे परतलो. ते देखील सायकल हातात धरुनच…..
पण परतीच्या प्रवासात देखील परतीच्या पावसासारखे अवेळी एकाने मला गाठलेच. आणि विचारले…… झाली का रपेट मारुन…… किती लांब गेला होता. सकाळची वेळ छान असते बघा….. आपण बदल बदल म्हणतो तो हाच. आपण मुलांची सायकल चालवतो, आणि मुलांना वडिलांची गाडी चालवायची असते……. चालायचेच, चालवा असे म्हणाले. मी मनातच म्हटले तुझ्या नानाची…….. आणि सायकलवर टांग न टाकताच घरी परतलो. एखादी जागा (खूर्ची) मिळाल्यावर तेथून पायउतार होण्याचे दु:ख काय असते ते मी सायकलवर न बसता पायउतार होऊन अनुभवले. आणि सायकल जागेवर ठेवून पायऱ्या चढायला म्हणून टांग उचलत होतो.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




