श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

 ☆ सुगी… भाग-२ ☆ श्री आनंदहरी 

 (बाईच्या जातीला डाग लावायला तिळाएव्हढं निमित्त पुरतं इथं तर हरभऱ्याएवढा डाग होता. वडाची साल पिंपळाला लावण्याच्या लोकांच्या वृत्तीमुळे सुमीचं लग्न नाही झालं तर रमीचं लग्न ठरण्यात अनंत अडचणी येणार होत्या हे त्याला जाणवत होतं. हीच काळजी त्याला रात्रंदिवस खात होती. कुठंही असला तरी तो आपल्याच विचारात असायचा. बायकोने कितीदा तरी त्याला सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यात फरक पडला नव्हता.. त्या बिचारीला ती आणखी एक काळजी लागलेली होतीच.) – – इथून पुढे — 

“आबा, तुमास्नी रंगातात्यांनी बोलीवलंय… लगुलग.. ”

डेरीला दूध घालून आलेली सुमी घरात शिरता शिरता गोठ्याच्या सपरात खाटेवर बसलेल्या भिवाला म्हणाली. विचाराच्या तंद्रीत असलेल्या भिवाच्या कानापर्यंत आपला आवाज गेलेला नाही हे सुमीला जाणवलं.. आपल्या काळीजमुळे वडिलांची ही स्थिती असते हे तिला माहीत होते. तिला त्याचं खूप वाईट वाटायचं.. त्या क्षणीही तिचे डोळे पाणावले. पापण्यांच्या काठावर दाटलेले पाणी झटकन पुसत ती सपरात गेली.

“ आबा, तुमास्नी रंगातात्यांनी लगूलग बोलीवलंय.. ”

“हां ss हां !”

विचारातून भानावर येत भिवा म्हणाला.

“ जावा मग…”

“ कुणिकडं.. ?”

“ अवो, सांगितलं न्हवं, रंगातात्यांनी बोलीवलंय ती.. ”

“ मला.. ? “

“ मंग कुणाला.. ? तुमास्नीच.. जावा लगूलग.. ”

“ कशापायी.. ? “

“ ती मला काय ठावं ? उठा, जावा लगूलग.. ”

भिवा उठला, घरात शिरून त्याने खुंटीवरली टोपी अन टॉवेल घेतला. टॉवेल खांद्यावर टाकत स्वतःशीच पुटपुटल्यासारखा बायकोला म्हणाला,

“ कशापायी बोलीवलं आसंल तात्यांनी ? “

“ थांबा वाईच, मी जात्ये आन ईचारून येत्ये.. ”

हसत हसत बायको म्हणाली.

‘बायकाच्या जातीला काळजात काटं खुपत आसलं तरी व्हटावर हासू ठेवाय लागतं.. ‘ आईच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून सुमीला कधीतरी आई म्हणालेली वाक्य आठवलं. ती नकळत आईच्या चेहऱ्याकडं पहातच राहिली.

‘ तसं नव्हे गं.. ’ म्हणत भिवा बाहेर पडला.

थोड्यावेळाने भिवा परतला तसे बायकोने उत्सुकतेने विचारलं. ,

“ कशापाय बोलीवलंवतं तात्यांनी ? “

“ त्यी शेवतंकराचं रान न्हाय का त्येंच्या इवायपावण्यांनं घेतल्यालं.. ती वाट्यानं कर म्हणीत हुतं. तुज्या सवंवलं हाय. त्येवडं कर. “

“ मंग.. ? “

“ आगं, आपल्या आडीनडीला तात्या कवाबी हुबं अस्त्यात.. न्हाय कसं म्हणायचं.. घरात ईचारून बघतो म्हणलं. “

“ न्हाय कशापाय म्हंतायसा.. ? सवंवलं रान हाय.. करूया वाट्यानं… पर आसं आदी-मदीच ?

“ आगं, ह्येवार मागल्या म्हैन्यात झाला न्हवंका.. ! तवापास्नं पाऊस तुटलाय वी.. औंदा गहू-हरबरा कर म्हणलं. “

“ मंग लगोलग व्हय म्हणायचं न्हाय व्हय ?”

“ आगं पर तुला ईचाराय नगं.. ? “

“ आजपातूर सम्दं काय ईचारूनच केलंयसा व्हय ? “

भिवानं चमकून इकडं-तिकडं, बायकोकडं पाहिले. सुमी, रमी तिथं न्हवत्या. बायकोने त्याच्याकडे तिरप्या नजरेने पहात फुकणी घेऊन चुलीतल्या इस्तवावर फुंकर मारली तसा भकदिशी जाळ झाला.. लाकूड पेटलं…

भिवानं रंगातात्यांना होकार दिला होता. त्यांच्या ईवाय पावण्याचं रान अर्ध्या वाट्यानं करायचं म्हणजे तसं त्रासाचेच होतं. दोन वर्षे रान पडीक होतं. त्यामुळं तण तण मायंदळ माजलवतं. पण एक बरं होतं, पावण्याचा ट्रॅक्टर होता.. तात्यांच्या जावयाचा धाकला भाऊ, जयसिंग शेतीत होता. भादव्याच्या उन्हानं कडाका दिला तसा तो ट्रॅक्टर घेऊन आला.. मशागतीचं दिस नसलं तरी त्यानं रान उभं-आडवे नांगरून दिलं. आणि तात्यांच्या दारात ट्रॅकटर ठेवून माघारी वळला.. त्या रानासाठनं चार-आठ दिस पाऊस लागला नाही तर बरं होईल असं भिवाला वाटत होतं. तसंच झालं. आठ दिवसांनी ट्रॅक्टरनं रान कुळवायला जुपी केली. नांगरानं निघालेलं तण भसासा मोकळं व्हायला लागलं. कुळवामागं भिवा, त्याची बायको आणि सुमी तण गोळा करत होते.. बांदावर ढीग टाकत होते.. सुमीला बघितल्यापास्नं पावण्याची चोरटी नजर सुमीकडं सारखी वळत होती. तो ट्रॅकटर चालवताना कधी आरशातनं, कधी तिरक्या नजरेने सुमीला न्याहाळत होता. तिचे देखणेपण, तिच्या कामाचा झपाटा त्याला भावला होता.

दिवसात सगळे रान कुळवून झालं होतं. तणाचा ढीग बांदावर पडला होता.

“ मामी, बसा, सोडतो घरला. “

“ नगं, आमी वाईच ऱ्हायल्यालं तन गोळा करून येतो.. तुम्ही व्हा म्होरं, तुमास्नी वखुत हुईल जाया.. ”

“ ए, तू न सुमी जावा घरला.. मी येतो उरकून. “

भिवा म्हणाला तशी त्या दोघीजणी ट्रॅक्टरवर बसल्या. पावण्यांनं दाराम्होरं ट्रॅकटर उभा केला.

“ वाईच च्या घेऊन जावा.. ” सुमीची आई उतरता उतरता म्हणाली.

“ नगं, तात्यांकडं जाऊन जायाचं हाय, लगूलग.. ”

“ जाशीला की.. फटफटीवनं तर जायाचं आसतंय.. ”

“ खरंच उशीर हुईल.. ”

“ आगं आये, आपला गुळाचा च्या गुळमाट लागत नसंल त्यास्नी. ” सुमी त्याच्याकडं तिरक्या नजरेने पहात म्हणाली. तो काहीसा गडबडला

“ बरं मामी, तुमी येवडं म्हंतायसा तर ठेवा पटदिशी.. ”

तो सुमीकडं बघत, मामी शब्दावर जोर देत म्हणाला.

त्यानं ट्रॅक्टर बाजूला घेऊन बंद केला.

चहा घेतानाही, सुमीच्या आईबरोबर बोलतानाही त्याची नजर अधूनमधून सुमीकडेच वळत होती.. घरात आल्यावर सुमीचं हिकडचे -तिकडचे काम सुरू होतंच. चहा पिऊन बाहेर पडल्यावर.. काहीतरी आठवल्यासारखा माघारी वळला. चौकटीवर दोन हात ठेवून तोंड आत करत सोप्यातल्या सुमकडे बघत त्याने जराशा मोठ्या आवाजात सुमीच्या आईला सांगितलं,

“ मामी, मामास्नी सांगा आठ-धा दिसात सवडीन ईन.. “

“ बरं, सांगत्ये आबास्नी.. या सवडीनं. “

मामीच्या ऐवजी सुमीनंच त्याच्याकडं बघत उत्तर दिलं. सुमी पहिल्यांदाच त्याच्याशी बोलली होती. गडी मनात सुखावला. रेंगाळतच ट्रॅक्टर जवळ गेला. काहीशा अपेक्षेने वळून दाराकडे पाहिलं. सुमी दारात, अंगणात नव्हती.. पण ‘या सवडीने ‘ वाक्य आठवून खुषीतच ट्रॅकटर चालू करून तो निघून गेला.

हरभऱ्याला पीक चांगलंच आलं होतं. जयसिंगची, रंगातात्यांच्या पाहुण्याची आठ-दहा दिवसांनी फेरी असायचीच. सुरवातीला काहीतरी निमित्त काढून सुमीशी बोलणारा जयसिंग संधी मिळाली की काहीतरी बोलत होता. संधी शोधत होता. सुमी काहीसं अंतर राखून पण मोकळेपणाने आपल्याशी बोलतेय हे त्याला जाणवत होतं. तिच्या मनाचा अंदाज लागत नव्हता.

घरी जमीन-जुमला, बागायची शेती होती, दारात ट्रॅक्टर, चारचाकी, दोनतीन फटफटी होत्या. तसे तालेवार घर होतं तरीही गेली चार वर्षे लग्न जमत नव्हतं. शेतकरी आहे म्हणल्यावर पोरीचं नव्हे तर त्यांच्या घरचे काही बघायच्या आधीच नकार देत होते. गावा-खेड्यातल्या रीती-रिवाजानुसार त्याचं लग्नाचे वय उलटून चाललं होतं. ही एकट्या जयसिंगची समस्या नव्हती तर शेतकऱ्यांची, शेती करणाऱ्या पोरांची लग्नच होत नव्हती. मुलींच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांना शहराची ओढ होती.. नोकरदार हवा होता.. त्याच्या दस पटीने मिळवणारा शेतकरी नको होता.

सुमीला रानात काम करताना पाहिली तेंव्हापासून त्याला ती आवडली होती.. तिच्याशी लग्न करून संसार करण्याची स्वप्नं तो पहात होता. पण अनेक नकार पाहिलेल्या जयसिंगला त्याबाबत तिच्याशी बोलण्याचे, आपलं मन तिच्यापाशी मोकळे करण्याचं धाडस झालं नव्हतं.. ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होती, चेष्टा -मस्करी करत होती. त्याने केलेल्या मस्करीका लाजून, हसून दाद देत होती पण त्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता.. एखाद्याचा तसा मोकळा स्वभाव असतो हे जयसिंग जाणून होता. तरीही मनात खळबळ माजली होती. मन सुमीसाठी हुरहूरत होतं. तिचा होकार असो वा नकार.. पण त्याला तिच्याशी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं… पण बोलण्यासाठी ती एकटी अशी भेटतच नव्हती..

सुमी आणि तिची आई रानात काम करत होत्या. भिवा तालुक्याला गेला होता.. दिवस मावळत आला तशी सुमीची आई तिला म्हणाली,

“ ऱ्हाउदे, ऱ्हायल्यालं बघू उद्याच्याला.. ह्येनीबी न्हायती.. धारा काडाय पायजेत.. चल जाऊया. “

“ तू हो म्होरं, येवडी कड लावून येत्ये. “

“ लय वखुत करू नगो.. ”

“ न्हाय, आल्येच मागनं.. ”

वर खोपीजवळ आल्यावर त्या जयसिंगला म्हणाल्या,

“ मी जात्ये म्होरं.. धारा -बिरा काडायच्या हायती.. सुमी हाय. तुमी या च्या प्याला. “

जयसिंग ‘बरं ! ‘ म्हणाला. सुमीची आई ग्येली तसं त्याचं मन हारखून टूम झालं होतं.. सुमी एकटी होती.. तिच्याशी बोलता येणार होतं. मन मोकळं करता येणार होतं… तो तडक हरभऱ्याच्या वावरात गेला.

“ सुमा ss !”

कामात गर्क असणारी सुमी दचकली अन पटकन मागे वळली. जयसिंगला पाहताच धिरावली.

“ तुमी हायसा व्हय.. ”

“ मला तुज्यासंगं वाईच बोलायचं हाय.. ”

“ हूं.. ”

“ मनातलं बोलतूय.. राग मानू नगं.. ईचार करून काय ते सांग.. तरीबी न्हाईच पटलं तर हितलं हितंच सोडून दे.. ”

“ हूं.. ”

जयसिंगने सगळा धीर गोळा केला आणि पटकन म्हणाला,

“ सुमा, लगीन करशील माज्यासंगं ? मला तू लै आवडतीस. “

सुमाला तो काय बोलणार याचा अंदाज होता. तरीही ती लाजली, गप्प झाली.

“ गप का झालीस ? “

जयसिंग मनातून जरासा खट्टू झाला होता. तिनं जयसिंगकडं पाहिलं. त्याच्या मनातली निराशा चेहऱ्यावर पावसाचं पाणी ओघळावं तशी ओघळली होती..

“ लय भोळं हायसा तुमी.. आसं लगीच खट्टू कशापायी हुतायसा.. मी न्हाय कवा म्हणलंय.. ? “

जयसिंगचा चेहरा खुलला.

“ आसं, लग्नाचं ईचारल्याव लगीच बोलता येतं व्हय पोरीस्नी.. तुमचं मन मी कवच वळखलं हुतं… तुमी चांगलं हायसा, मलाबी तुमांगतच वाटतं पर तुमाला काय बी ठावं न्हाय.. ”

“ तुला वाटतंय न्हवं का ? मग बास झालं, बाकी मला काय ठावं करून घ्याचं न्हाय. “

“ पर मला बोलायचं हाय.. तवर माज्यासंगं जी बोललाय ती मनात ठ्येवा.. कुणालाबी बोलू नगासा.. माजी आण हाय तुमास्नी.. ”

“ सुमा, आत्ता बोल की काय हाय ती.. काय बी आसलं तरीबी मला तुज्यासंगंच लगीन करायचं हाय.. ”

पुढं होऊन सुमीचा हात हातात घेत म्हणाला. हात सोडवून घ्यायचा प्रयत्न न करता त्याच्या डोळ्यांत पहात हसत सुमी म्हणाली,

“ धीर धरवना व्हय हो.. पर धीर धराय पायजेल. उद्या मी माळवं तोडाय येरवाळी आमच्या रानात जाणार हाय.. येकलीच.. तवा सांगत्ये. “

जयसिंग सुखावला..

“ आतातरी सोडा हात.. का.. ?”

काहीसं लाजून हसत सुमा म्हणाली. तसे भांबावून जयसिंग नुसताच ‘अं ss !” म्हणाला…तसे सुमीने नजरेनेच त्याने धरलेल्या तिच्या हाताकडं इशारा केला.. जयसिंगने गडबडून हात सोडला.

“ चला, तुमच्या लाडक्या मामीनं तुमाला च्या प्याला बोलीवलंय न्हवंका.. ”

“ लाडक्या ? “

जयसिंगने मिश्कीलपणे तिच्याकडे पहात विचारलं..

“ न्हाय व्हय ? मला आपलं वाटलं.. नसंल तर ऱ्हाऊदेल.. ”

सुमा त्याच्या डोळ्यांत पहात म्हणाली.. तो गडबडला. ते पाहून हसत म्हणाली,

“ सजागती गंमत केली तुमची. चला, आय वाट बगीत आसंल.. ”

— क्रमशः भाग दुसरा

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments