श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🙊😱 वयाचा दाखला ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
☆
फोन वाजता घरातला
उचलला पेन्शनर पंतांनी,
बोलत होते पलीकडून
बँक मॅनेजर गायधनी !
*
“तुमचा हयातीचा दाखला
या वर्षीचा तो मिळाला,
पण गेल्या वर्षीचा तुम्ही
विसरलात पाठवायला !
*
तरी कृपया आम्हांला
तो पाठवा बरं लवकर,
बसलाय बघा खनपटीला
बँकेचा खडूस ऑडिटर !”
*
आता हसावे का रडावे
काहीच कळेना पंतांना,
उत्तर तर द्यावे लागणार
या गायधनी साहेबांना !
*
“वय झाले आता साहेब
विसरायला होते कालचे,
विचारता गेल्या वर्षीचे
ते कसे काय आठवायचे?
*
होतो का जिवंत गेल्यावर्षी
मलाच प्रश्न पडलाय खरा,
ऑडिटरचे ऑब्जेक्शन
आपणच कसे ते निस्तरा !”
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





